पाच वर्षांत आम्ही करून दाखविले ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:41 PM2019-03-06T22:41:25+5:302019-03-06T23:32:07+5:30

विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची येथील नागरिकांमध्ये भावना होती. मागील ५० वर्षांत जे विदर्भाला मिळाले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढत विदर्भात औद्योगिक क्रांती होईल, असे प्रतिपादन केले. उपराजधानी तसेच विदर्भाशी निगडित विविध विकासकामांचे बुधवारी ‘ई’ भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.

We did it in five years! Chief Minister blow to opposition | पाच वर्षांत आम्ही करून दाखविले ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

पाच वर्षांत आम्ही करून दाखविले ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Next
ठळक मुद्देविदर्भात औद्योगिक क्रांती होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची येथील नागरिकांमध्ये भावना होती. मागील ५० वर्षांत जे विदर्भाला मिळाले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढत विदर्भात औद्योगिक क्रांती होईल, असे प्रतिपादन केले. उपराजधानी तसेच विदर्भाशी निगडित विविध विकासकामांचे बुधवारी ‘ई’ भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.
फुटाळा तलावाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, आ.अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, विभागीय आयुक्त संजीव कुमार, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय, मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार प्रामुख्याने उपस्थित होते. मागील पाच वर्षांत नागपूरचा चेहरा बदलला आहे. याचे श्रेय जनतेला जाते. शहराला पर्यटनाची राजधानी करण्याचा प्रयत्न आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या सर्वेक्षणानुसार २०३५ मध्ये वेगाने प्रगती करणाऱ्या जगभरातील शहरांत नागपूरचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणाचेही नाव न घेता आघाडी सरकारला चिमटे काढले. अगोदर दोन कोटी रुपयांच्या निधीसाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागायची. मात्र आता नागपुरात ७२ हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत. आघाडी सरकारच्या काळात दोनदा नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वे योजनेचे उद्घाटन झाले. मात्र हजार कोटींच्या योजनेसाठी केवळ हजार रुपये टोकन निधी म्हणून देण्यात आले. आम्ही पूर्ण रकमेची तरतूद करून कामाला सुरुवात केली. नागपूरला भविष्यात पाण्याची टंचाई होणार नाही तसेच एकही सेकंद वीज जाणार नाही, यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. रेणुका देशकर यांनी संचालन केले.
विदर्भाचा विकास जास्त महत्त्वाचा
वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी ही या परिसराच्या विकासासाठीच होते व विदर्भ समृद्ध झाला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे. वेगळ्या राज्यापेक्षा विकास जास्त महत्त्वाचा आहे. आम्ही पाच वर्षांत विदर्भाचा कधी नव्हे तेवढा विकास केला आहे, असे नितीन गडकरी यांनी प्रतिपादन केले.
विदर्भवाद्यांच्या घोषणा
दरम्यान, वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीवरून विदर्भवाद्यांनी कार्यक्रमादरम्यान घोषणा दिल्या. नितीन गडकरी भाषणाला उभे झाले आणि काही विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच त्यांनी उपस्थितांमध्ये वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा लिहिलेली पत्रकेदेखील भिरकाविली. पोलिसांनी त्वरित सर्वांना ताब्यात घेतले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कामांचे ‘ई’ भूमिपूजन व लोकार्पण

  • फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे व मल्टीमीडिया शोच्या कामाचे भूमिपूजन
  • अंबाझरी उद्यान येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शो कामाचे भूमिपूजन
  • नागपूर-नागभीड गेज कन्व्हर्शन योजनेचे भूमिपूजन
  • अजनी रेल्वे स्थानकातील ‘एस्केलेटर’ बांधकामाचे भूमिपूजन
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेल्वे आरक्षण केंद्राचे लोकार्पण
  • गोधनी येथे होणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च’चे भूमिपूजन
  • नागपूर शहरातील केंद्रीय मार्ग निधीच्या विविध कामांचे भूमिपूजन
  • मनपाच्या ४२ मेगावॅट सोलर प्रकल्पाचे भूमिपूजन
  • शहरातील पथदिवे ‘एलईडी’मध्ये परिवर्तित करण्याच्या कार्याचा आरंभ
  • जागृती कॉलनी, शास्त्री ले आऊट-खामला येथील उद्यानांचे लोकार्पण
  • नागपूर शहर सिमेंट रस्ते प्रकल्प ३ चे भूमिपूजन
  • प्रधानमंत्री आवास योजनेकरिता नोंदणीअर्ज मागविण्यासाठी संकेतस्थळाची सुरुवात
  • सिम्बॉयसिस विद्यापीठ ते तरोडी (खुर्द) मार्गावरील १८ मीटर रुंद कॉंक्रीट रस्त्याचे भूमिपूजन
  • खामला येथील टेलिकॉम इंजिनिअरींग को.ऑप सोसायटीच्या मोकळ्या जागेवर इन्डोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाच्या कामाचे भूमिपूजन

Web Title: We did it in five years! Chief Minister blow to opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.