नागपुरात निष्काळजी आॅटोचालकाने घेतला चिन्मयचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:12 AM2018-01-20T10:12:26+5:302018-01-20T10:24:14+5:30

अत्यंत हुशार अन् मनमिळावू स्वभावाच्या चिन्मयचा बळी एका आॅटोचालकाच्या निष्काळजीपणामुळे गेला.

The victim of Chinmaya took the negligent autocrat in Nagpur | नागपुरात निष्काळजी आॅटोचालकाने घेतला चिन्मयचा बळी

नागपुरात निष्काळजी आॅटोचालकाने घेतला चिन्मयचा बळी

Next
ठळक मुद्देअखेर मृतदेहच घरी परतलाहिस्लॉप कॉलेजजवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आई येतो ग कॉलेजमधून, असे म्हणत हसतच चिन्मय घरून निघाला. त्यावेळी साधारणत: सकाळचे ८ वाजले होते. १० ते १५मिनिटांनंतर चिन्मयची आई जया यांना फोन आला. चिन्मयला अपघात झाला... त्याला सीताबर्डीतील म्यूर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे... असे फोन करणाऱ्याने सांगितले. पायाखालची वाळू सरकवणारा हा फोन ऐकून जया यांनी चिन्मयचे आजोबा राजा नारायण भास्करे (वय ६९) यांना माहिती कळविली. काही वेळातच भास्करे परिवार आणि त्यांचे हितचिंतक म्यूरमध्ये पोहचले. चिन्मयची स्थिती गंभीर होती. भास्करे परिवाराने त्याला सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुपारी १२.२० च्या सुमारास चिन्मयचा मृत्यू झाला. अत्यंत हुशार अन् मनमिळावू स्वभावाच्या चिन्मयचा बळी एका आॅटोचालकाच्या निष्काळजीपणामुळे गेला.
कल्याणी ट्रेडर्सचे संचालक आणि व्हेटरनरी डॉक्टर विनोद भास्करे यांचा चिन्मय (वय १६) हा मुलगा. त्याला कल्याणी (सीए) आणि गायत्री (डॉक्टर) या दोन बहिणी आहे. आई जया या कल्याणी ट्रेडर्सचे काम बघतात. अंबाझरीच्या टिळक नगरातील साफल्य या निवासस्थानी ते राहतात. सुखवस्तू कुटुंबातील चिन्मय हा सर्वांचाच लाडका. अत्यंत हुशार अन् मितभाषी. सिव्हील लाईन्समधील बी. पी. भवन्स विद्यामंदिरचा तो अकरावीचा विद्यार्थी होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी चिन्मय आपल्या अ‍ॅक्टीव्हाने (एमएच ३१/ ईझेड ८१२९) कॉलेजला जायला निघाला. सीताबर्डीतील हिस्लॉप कॉलेज चौकात त्याला एका भरधाव आॅटोचालकाने जोरदार धडक दिली. त्यामुळे चिन्मय गंभीर जखमी झाला. या मार्गाने जाणाऱ्यांनी पोलिसांना कळवून त्याला म्यूर मेमोरियलमध्ये दाखल केले. माहिती कळताच सीताबर्डीचे पोलीस पोहचले. त्यांनी जखमी चिन्मयची ओळख पटविल्यानंतर त्याच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केला. भास्करे परिवाराला चिन्मयचा अपघात झाल्याचे कळाल्याने जबर धक्का बसला. ते धावतपळतच म्यूर हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी तेथून चिन्मयला सिम्समध्ये हलविले. मात्र, फायदा झाला नाही. दुपारी १२.२० च्या सुमारास डॉक्टरांनी चिन्मयला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने भास्करे परिवारावर जबर मानसिक आघात झाला आहे.

Web Title: The victim of Chinmaya took the negligent autocrat in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात