ज्येष्ठ पत्रकार जैमिनी कडू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:04 PM2018-03-17T22:04:30+5:302018-03-17T23:44:33+5:30

ज्येष्ठ पत्रकार आणि बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचे शनिवारी रात्री नागपुरात निधन झाले.

Veteran journalist Jamini Kadu dies | ज्येष्ठ पत्रकार जैमिनी कडू यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार जैमिनी कडू यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देबहुजन चळवळीला जबर धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार आणि बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचे शनिवारी रात्री नागपुरात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शैल जैेमिनी, मुलगा संघर्ष आणि मोठा आप्त परिवार आहे. विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. ५ मार्च रोजी झालेल्या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी उपचारादरम्यानच त्यांची मृत्यूसोबत असलेली झुंज संपली. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीसह अन्य सामाजिक चळवळींना धक्का बसला. लोकमतच्या सुरुवातीच्या काळात ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. प्रा.जैमिनी कडू हे ५ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास घरी जात असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात कडू यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले होते.

वादळाची झुंज अखेर संपली :   आज मेडिकलला करणार देहदान

मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे आंदोलन असेल किंवा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निर्मितीचा संघर्ष. पत्रकारितेतील झुंजार कारकीर्द असेल किंवा अध्यापनाचा प्रदीर्घ प्रवास. ते कधी झुकले नाहीत की थकले नाहीत. पण, एका बेसावध क्षणी काळाने डाव साधला आणि प्रा. जैमिनी कडू नावाचे हे वादळ शमले. रुग्णालयात दाखल व्हावे लागले. येथे या लढवय्या कार्यकत्र्याने आपल्या स्वभावानुसार तब्बल १३ दिवस मृत्यूशी संघर्ष केला. पण, अखेर या वादळाची झुंज संपली अन् शनिवारी संध्याकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 
ज्येष्ठ पत्रकार आणि बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचा विविध सामाजिक संघटनांशी जवळचा संबंध होता. लोकमतच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पत्रकारिताही केली.प्रा. जैमिनी कडू यांचा विविध सामाजिक चळवळीत सहभाग होता. यात मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, १९७१ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्माण आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या समाजविधायक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते. यामध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचा राष्ट्रीय प्रचारक, अधिवेशनांमध्ये महनीय वक्ता म्हणून सहभाग आणि सत्यशोधक सन्मान, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रातर्फे देण्यात येणारा गुणवंत पुरस्कार आदींचा समावेश आहे. यासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांचे ते पदाधिकारी होते. यात विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखेचे सचिव, भारतीय श्रमिक पत्रकार संघ नवी दिल्लीचे कार्यकारी सदस्य, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड नागपूरचे सल्लागार आणि कुणबी समाज दर्पण या मासिकाचे ते संपादक होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बहुजन चळवळीतील अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. शनिवारी नागपुरात आयोजित ओबीसी महा हुंकार परिषद रद्द करण्यात आली. प्रा. जैमिनी कडू यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव मेडिकलच्या शवविच्छेदनगृहाजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला सोपविण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

Web Title: Veteran journalist Jamini Kadu dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.