वंश यादवचा मारेकऱ्याची सुधारगृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:21 AM2018-04-07T00:21:58+5:302018-04-07T00:22:13+5:30

खामल्यातील जुनी वस्तीत राहणारा वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या आरोपीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाने खामला जुनी वस्तीत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vansh Yadav's assassin's sent remand home | वंश यादवचा मारेकऱ्याची सुधारगृहात रवानगी

वंश यादवचा मारेकऱ्याची सुधारगृहात रवानगी

Next
ठळक मुद्देगुन्ह्याची कबुली : म्हणतो रागाच्या भरात घडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खामल्यातील जुनी वस्तीत राहणारा वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या आरोपीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाने खामला जुनी वस्तीत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
२७ मार्चला वंश अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे, असा संशय पालकांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. प्रतापनगर पोलिसांनी अपहरणाची नोंद केली, मात्र फारसा गांभीर्याने तपास केला नाही. या भागातील सीसीटीव्ही लगेच तपासले गेले असते तर तक्रार दाखल झाल्याच्या काही तासातच आरोपीचा छडा लागला असता मात्र तसेच झाले नाही. तपासाच्या नावाखाली पोलिसांनी वेळकाढू धोरण अवलंबले आणि अखेर ५ एप्रिलला सकाळी ७ च्या सुमारास सोनेगाव पोलिसांना तलावात मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. २७ मार्चला वंश बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी वंशच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर तो मृतदेह वंशचा असल्याचे उघड झाले. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले. तो वंशचा मावसभाऊच निघाला. त्याला प्रतापनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. जनावरांचे दूध काढताना पायाला बांधलेल्या दोरीची गाठ बांधून आरोपीने वंशचा गळा आवळल्याची कबुली दिली. रागाच्या भरात हे कृत्य झाल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला आज न्यायालयात सादर केले. नवीन कायद्यानुसार, त्याची कस्टडी मिळावी अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने तो १७ वर्षांचा (अल्पवयीन) असल्याचे सांगून त्याला सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले.
सोशल मीडियावरही पोस्ट
विशेष म्हणजे, वंशचा मारेकरी, त्याचा मावसभाऊ शीघ्रकोपी आणि असला तरी एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा थंड डोक्याचा आहे. गेल्या दहा दिवसात आरोपी अनेकदा पोलिसांच्या समोर आला. तातडीने वंशचा शोध घ्या, वंशवर आपला खूप जीव असल्याचे आणि तो बेपत्ता झाल्याने आपल्याला खूप दु:ख होत असल्याचे प्रत्येकवेळी तो दाखवत होता. त्याने वंश बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून संपर्कासाठी इतरांसोबत स्वत:चाही मोबाईल नंबर दिला होता.
अर्थात अपहरणाचा गुन्हा दाखल करून संबंधिताचा तातडीने कसून शोध घेण्यात यावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, वंश यादवच्या प्रकरणात प्रतापनगर पोलिसांनी कमालीचा हलगर्जीपणा दाखवून वरिष्ठ अधिकारीच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही तिलांजली दिली.
२७ मार्चला वंश बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी दाखल केली. प्रतापनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, वंश कसा बेपत्ता झाला, कुणी बेपत्ता केला, त्याचा शोध घेण्यात फारसे गांभीर्य दाखवले नाही. पोलिसांची उदासीनता लक्षात आल्याने पालकांनी वंशला शोधण्यासाठी शक्य होईल ते सर्व प्रयत्न केले. मात्र, वंश राहिलाच नव्हता तर मिळणार कसा.
का दाखवली नाही तत्परता ?
५ एप्रिलला सकाळी वंशचा मृतदेह सोनेगाव तलावात कुजलेल्या अवस्थेत पोत्यात बांधून दिसला. त्याची हत्या झाल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधासाठी कामी लागले अन् अवघ्या तासाभरातच वंशला गायब करून त्याची हत्या करणारा आरोपी सापडला. त्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांना फारसे परिश्रमही घ्यावे लागले नाही. दाखवावी लागली केवळ तत्परता. ही तत्परता दाखवत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वंशच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् आरोपी त्याचा मृतदेह भरलेले पोते घेऊन सोनेगाव तलावाकडे जात असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेण्यात आले. प्रतापनगर पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर ही तत्परता दाखवली असती तर निरागस वंशचा मृतदेह तब्बल १० दिवस तलावात सडत, कुजत राहिला नसता. त्याच्या आईवडिलांना प्रचंड दगदग आणि मानसिक त्रास सहन करावा लागला नसता अन् आरोपी मोकाट राहिला नसता. प्रतापनगर पोलिसांनी ही तत्परता का दाखवली नाही, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. चौकशी करीत होतो, असे बेजबाबदार उत्तर देऊन प्रतापनगर पोलीस आता सारवासारव करीत आहेत.
प्रतापनगर पोलिसांचा हा नाकर्तेपणा केवळ या प्रकरणात नव्हे तर यापूर्वीही अनेक प्रकरणात उघडकीस आलेला आहे. गेल्या वर्षी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या मैदानात एका गरीब तरुणाला एक गुंड घेऊन गेला. तो त्याला मारत आहे, असे पोलिसांना कळविले होते. मात्र, पोलिसांनी तेथे जाण्याची तत्परता दाखवली नाही. परिणामी दुसºया दिवशी त्या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले. यासोबतच अनेक प्रकरणे आहेत. ती चर्चेलाच आली नाही. या प्रकरणाने मात्र पोलिसांचा नाकर्तेपणा ठळकपणे उजेडात आला. त्यामुळे केवळ प्रतापनगरच नव्हे तर अवघ्या पोलीस दलाच्या प्रतिमेवर काळे फासले गेले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे अत्यंत शिस्तप्रिय तसेच संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते आता काय भूमिका घेतात, त्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
उदासीनता अन् निष्ठूरपणा कशासाठी ?
२ एप्रिलला प्रतापनगर पोलिसांनी असाच निष्ठूरपणाचा परिचय दिला. एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलाचे एका श्रीमंत कुटुंबातील आरोपींनी भरदिवसा अपहरण केले. त्याला आपल्या कारमध्ये कोंबून घरात नेले. तेथे बेदम मारहाण केली. बुटांच्या ठोकरा, लाथाबुक्क्यांनी मारल्याने त्याच्या सर्वांगावर, डोक्यावर सूज आली. तो बेशुद्ध पडल्याचे पाहून आरोपींनी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर बीट मार्शल (दोन पोलीस) आरोपींच्या घरी गेले. तेथून आरोपी आणि निपचित पडलेल्या मुलाला प्रतापनगर ठाण्यात आणण्यात आले. तोपर्यंत त्या मुलाला शुद्ध आली होती. त्यामुळे पोलीस ठाण्यात आरोपींनी पोलिसांदेखत त्या मुलाला पुन्हा मारले. एवढेच नव्हे तर एका महिला कर्मचारी पोलिसानेही त्या मुलाला जोरदार लाथ मारून आरोपींसोबतचा जिव्हाळा दाखवला. त्यानंतर ठाण्यात पोहचलेल्या त्याच्या गरीब आईवडीलांना ‘याला समजावा, आता सोडतो. तो जिवंत घरी पोहचत आहे. सुधारला नाही तर त्याचे प्रेत घरी पोहचेल‘, असे म्हटले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. मुलाच्या आईवडिलांकडूनच एका कागदावर माफीनामा लिहून घेतला. त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. या प्रकरणात अपहरण, पाच पेक्षा जास्त आरोपी असल्यामुळे दरोडा आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मात्र, प्रतापनगर पोलिसांनी आरोपींची पाठराखण चालवली आहे. पोलिसांची ही उदासीनता अन् निष्ठूरपणा कशासाठी ते कळायला मार्ग नाही.

Web Title: Vansh Yadav's assassin's sent remand home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.