Under the Chief Minister Drinking Water Scheme, 46 villages of Nagpur district will be free from scarcity-free | मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ४६ गावे होणार टंचाईमुक्त

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांची माहिती

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी घरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीपोटी यातून १३ गावे वगळण्यात आली. उर्वरित ४६ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला तरी, यातील ८ गावे मोठी असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे नळयोजनेची कामे सुरू आहेत. तसेच ३ गावांमध्ये इतर योजनेतून नळयोजनेची कामे सुरू असल्याने एकूण ११ गावे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वगळण्यात आली. तसेच रामटेक अंतर्गत मौजा पचखेडी येथे प्रकल्पित लोकसंख्या १००० पेक्षा कमी असल्याने ही कामे सादरीकरणात शासनातर्फे रद्द करण्यात आली. अशी १३ गावे कार्यक्रमातून कमी करण्यात आली. या योजनेसंदर्भात ४३ गावांचे सादरीकरण शासन समितीसमोर करण्यात आले आहे. यातील ३० गावांना शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. २४ योजनांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहे. तर मौजा मानेगाव, वाघोडा, खंडाळा खुर्द येथील कामे सुरू करण्यात आली आहेत. मंजूर ३० कामावर १९.५८ लाख रुपये खर्च अंदाजित आहे. उर्वरित १३ कामांवर ७.५२ लाख रुपये अंदाजित खर्च आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनाकडून ५१.४४ लाख निधी जि.प.ला प्राप्त झाला असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.