नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईने केला आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:56 AM2018-01-01T10:56:11+5:302018-01-01T10:56:51+5:30

मावळत्या वर्षाला सलाम आणि नवीन वर्षाचे शानदार स्वागत... अशा संपूर्ण नित्यनेहमीच्या कार्यक्रमाला छेद देत उमरेडच्या तरुणाईने आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला.

Umrer youth celebrates unique 'Thirty First' In Nagpur district | नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईने केला आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईने केला आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’

Next
ठळक मुद्देआश्रमशाळेतील बच्चेकंपनीला दिल्या भेटवस्तू

अभय लांजेवार/सचिन कुहीकर ।
आॅनलाईन लोकमत
उमरेड : थर्टी फर्स्ट म्हणजे दारूची बाटली... नॉनव्हेज... थंडा थंडा कुल कुल... रात्री उशिरापर्यंत नाचगाणे... पार्टीचा जल्लोष... मावळत्या वर्षाला सलाम आणि नवीन वर्षाचे शानदार स्वागत... अशा संपूर्ण नित्यनेहमीच्या कार्यक्रमाला छेद देत उमरेडच्या तरुणाईने आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. थेट निवासी आश्रमशाळेत जाऊन मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचा भेटवस्तू देत स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मांडलेली ही संकल्पना तरुणाईच्या मनाला स्पर्श करून गेली आणि चक्क आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत मावळत्या वर्षाला मस्तपैकी निरोप देण्याचा निर्णय पक्का झाला. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून उमरेड तालुक्यातील चांपा येथील नवीन देसाई निवासी आश्रमशाळेत सदर कार्यक्रम पार पडला. आपल्या प्रशासकीय कार्याला थोडी बगल देत उमरेडचे तहसीलदार राहुल सारंग यांची ही संकल्पना उमरेड युथ फाऊंडेशन आणि ओम साई स्पोर्टिंग क्लबच्या पदाधिकारी, सदस्यांसमोर मांडण्यात आली.
लागलीच या तरुणाईने होकार देत आश्रमशाळेतील बच्चेकंपनीसोबत ३१ डिसेंबरचे काही क्षण घालविले. यादरम्यान या मुलांच्या चेहऱ्यांवर उमटलेली हास्यलकेर ‘पर्व नवे, स्वप्न नवे’ची नवी चाहूलच देत होती. शिवाय, आश्रमशाळेच्या उपयोगी पडेल अशा भेटवस्तूही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी उमरेड युथ फाऊंडेशनचे संस्थापक अनिल गोविंदानी, सचिव स्वप्निल लाडेकर, नायब तहसीलदार योगेश शिंदे, आनंद पुनवटकर, सौरभ भिवगडे, सचिन जोधे, प्रफुल्ल बावणे, पंकज भिसीकर, रवी मेंढे आदींची उपस्थिती होती. गोलू जैस्वानी, राकेश मूलचंदानी, रितेश राऊत आदींनी सहकार्य केले.

तीस वर्षांचा संघर्ष
सुमारे ३० वर्षांपूर्वी रामभाऊ इंगोले यांनी आईवडिलांचे छत्र हरविलेल्या आणि समाजाने नाकारलेल्या चार चिमुकल्यांना आपल्या घरी आणले. ही मुलं घरी आणताच रामभाऊंना घराबाहेर जाण्याचा कटू अनुभव मिळाला. समाजाने अनेक प्रश्न विचारून रामभाऊंना अस्वस्थ केलं. तब्बल सहा-सात वर्षे अज्ञातवासातच गेली. कालांतराने मुलांची संख्या १६ आणि नंतर ४७ वर पोहोचली. सद्यस्थितीत ३० वर्षाच्या संघर्षानंतर या शाळेत तब्बल ११३ मुले शिक्षण घेत आहेत. कुणाला वडील आहे तर आईची छत्रछायाच नाही. मायमाऊली आहे तर वडील सोबतीला नाही. समाजाने नाकारलेल्यांची मुलेही या आश्रमशाळेत आपल्या नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवीत आहेत.

संडे स्कूल सुरू
समाजात आपल्यापेक्षाही अडचणीत जगणारी मुले आहेत, या विचाराचे शिक्षण या मुलांवर रामभाऊंनी रुजविले. जुने कपडे गोळा करून झोपडपट्टीत वितरण करण्याचे काम सुरू केले. ते कपडे वितरण करताना पाचगाव, चांपा परिसरातील गिट्टीखदान परिसरात रामभाऊ इंगोले पोहोचले. आईवडिल खाणीत आणि मुलं धूळ-मातीत खेळतात हे त्यांच्या लक्षात आले. अक्षरओळख आणि अंक ओळख करून द्यायची असा संकल्प व्यक्त केला. १६ वर्षापूर्वी एका झाडाखाली ‘संडे स्कूल’ सुरू झाली. आशादायी चित्र समोर आले. केवळ रविवारला शिक्षणाचे धडे देऊन उपयोगाचे नाही, ही बाबही समजली. दररोज शिक्षण देण्याचे कामही लागलीच सुरू झाले. समाधानकारक निकालही लागले. यामुळे मुलांचा आणि रामभाऊंचा आत्मविश्वास वाढला. हळुहळु मुलांची संख्या वाढली. शेडखाली शाळा सुरू झाली.

अमेरिकेतून मदतीचा हात
प्रकाशचंद्र देसाई यांच्याशी रामभाऊ इंगोले यांचा परिचय होता. गप्पागोष्टींमधून शाळेचा विषय निघायचा. प्रकाशचंद्र यांचे भाऊ नवीनचंद्र देसाई हे अमेरिकेत फिल्म इंडस्ट्रीजमध्ये होते. त्यांच्या कानावर रामभाऊंचे काम पोहचले. सन २००५ ला नवीनचंद्र भारतात आले. त्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देत अवस्था बघितली. विचारणा केली आणि निवासी शाळा बांधण्याचा संकल्प रामभाऊंजवळ व्यक्त केला. नवीनचंद्र अमेरिकेत परतल्यानंतर २२ दिवसांतच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी या २२ दिवसात नवीनचंद्र यांनी आपल्या मित्रपरिवारात ‘मी एक काम बघितलं, त्या कामाला मोठं करायचं आहे’ ही बाब व्यक्त केली होती. श्रद्धांजली कार्यक्रमात ही संकल्पना पुढे आली. निधी गोळा झाला. प्रकाशचंद्र यांनीही स्वत:जवळचा निधी रामभाऊंकडे पाठविला. साडेपाच एकर शेतजमिन खरेदी करण्यात आली. काम सुरू झाले. संपूर्ण हिशेब पाठविला. पुन्हा अमेरिकेतून मदतीचा हात मिळाला आणि ही शाळा उभी झाली.

Web Title: Umrer youth celebrates unique 'Thirty First' In Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.