रेल्वेतून गोल्ड तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 9 किलो सोनं जप्त

By नरेश डोंगरे | Published: October 14, 2023 02:44 PM2023-10-14T14:44:14+5:302023-10-14T14:53:56+5:30

या कारवाईमुळे सोन्याची तस्करी करणाऱ्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Two arrested for smuggling gold through railway; 9 kg gold seized in nagpur | रेल्वेतून गोल्ड तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 9 किलो सोनं जप्त

रेल्वेतून गोल्ड तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 9 किलो सोनं जप्त

नरेश डोंगरे 

नागपूर : रेल्वे गाड्यांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना आरपीएफने जेरबंद केले आणि त्यांच्याकडून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे नऊ किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली. नागपूर रेल्वे स्थानकावर ही धाडसी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सोन्याची तस्करी करणाऱ्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, १२ ऑक्टोबरला पुण्याकडे निघण्याच्या तयारीत असलेल्या ट्रेन नंबर १२१३० हावडा - पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती एका खबऱ्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार आर पी एफ च्या पथकाने एस फोर कोच मधील २४ आणि २८ क्रमांकाच्या सीटवर बसलेल्या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. राहुल आणि बालूराम नामक या दोघांकडे असलेल्या पिटू (बॅग)ची तपासणी केली असता त्यात सुमारे साडेआठ ते नऊ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे आढळली. या मौल्यवान बिस्किटांबाबत आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढच्या कारवाईसाठी त्यांना डीआरआय कार्यालयात नेण्यात आले.
प्राथमिक चौकशीतच हे दोघे सोन्याची स्मगलिंग करत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांच्या जवळची सुमारे साडेपाच कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. 

या सोन्याच्या तस्करीत अनेक जण सहभागी असल्याचा संशय असल्यामुळे आर पी एफ, सीआयबी तसेच डी आर आय च्या वरिष्ठांनी सुमारे दोन दिवस ही कारवाई गुप्त ठेवून सोने तस्करीचे नेटवर्क शोधण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, पत्रकारांना या कारवाईची कुनकूण लागल्यानंतर ही कारवाई आज उघड करण्यात आली. आरपीएफ चे निरीक्षक मीना,  हेडकॉन्स्टेबल मदन लाल, कॉन्स्टेबल मोहन लाल दिवांगन, अमोल चहाजगुणे, सचिन सिरसाट,  उपनिरीक्षक (एएसआय) मुकेश राठोड, जसवीर सिंग,  सीआयबी/नागपूरच्या लेडी कॉन्स्टेबल सिरीन यांनी ही कामगिरी बजावली. पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Two arrested for smuggling gold through railway; 9 kg gold seized in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.