सर्वधर्मसमभावासाठी त्याचे सायकलवर भारतभ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:05 AM2019-06-01T00:05:00+5:302019-06-01T00:05:01+5:30

वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.

Traveling India on his bicycle for secularism | सर्वधर्मसमभावासाठी त्याचे सायकलवर भारतभ्रमण

सर्वधर्मसमभावासाठी त्याचे सायकलवर भारतभ्रमण

Next
ठळक मुद्देआठ राज्य फिरून नागपूरला आगमन : कर्नाटकच्या ज्येष्ठाची दीड वर्षापासून यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.
नागराज हे मूळचे कर्नाटकमधील हासन येथील रहिवासी. बालपणापासून बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड आवड. तरुणपणी मनात विचार आला आणि घरदार सोडून त्यांनी मुंबई गाठली. चित्रपटात मात्र काम मिळाले नाही. एक दिवस कुणाच्या तरी ओळखीने चित्रपटांच्या शुटींगच्या वेळी गर्दी दिसावी म्हणून त्यांना काम मिळाले. त्यासाठी मोबदलाही मिळाला. पुढे त्यांनी हेच काम स्वीकारले. चित्रपटात काम मिळाले नाही पण गर्दीचा भाग म्हणून स्थान मिळाले. गर्दीत उभे राहायचे व काम नसले की चित्रपट बघायचे हाच त्यांचा नित्यक्रम. नागराज थोडे धार्मिक प्रवृत्तीचे. त्यामुळे धार्मिक, सामाजिक संदेश असलेले आणि देशभक्तिपर चित्रपट त्यांच्या आवडीचे. पाहता पाहता अनेक वर्षे उलटली. लग्न झाले नाही व मुंबईत एकट्याचेच बस्तान.
एक दिवस सायकलवर भारत भ्रमण करण्याचा विचार मनात आला आणि डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईवरून ही स्वारी सायकलवर निघाली. सनातन धर्माच्या आधारावर देशात सर्वधर्मसमभाव नांदावा, मानवता रहावी, गोरक्षा, देशभक्ती, विश्वशांती तसेच पाणी वाचवा-वृक्ष जगवा हा संदेश देत ते गुजरातकडे रवाना झाले. पुढे राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड होत दिल्ली गाठली. या प्रवासात अनेक राजकीय नेत्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उत्तरप्रदेश व मध्य प्रदेश प्रवास करीत ते गुरुवारी नागपूरला पोहचले. यादरम्यान त्यांनी विविध राज्यांच्या वेगवेगळ्या शहरात मुक्काम ठोकला. नुकताच अलाहाबादला कुंभमेळा सुरू असताना २० दिवस या शहरात थांबल्याचे त्यांनी सांगितले. जेवणाची फिकीर नाही. कधी मठात, कधी मंदिरात तर कधी गुरुद्वारामध्ये जेवण केल्याचे त्यांनी सांगितले.
दररोज ८० ते ९० किमीचा सायकलवर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा. मिळालेल्या लोकांना आपला संदेश सांगायचा आणि पुढच्या प्रवासाला लागायचे. असे करीत दीड वर्षापासून त्यांची भटकंती सुरू आहे. यापुढे महाराष्ट्रातील शहरे फिरून ते कर्नाटकला रवाना होतील. पावसाळा आपल्या गावी काढून पुन्हा दक्षिण भारताच्या प्रवासाला निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Traveling India on his bicycle for secularism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.