नागपुरातील ७० लाखांच्या लूटमार प्रकरणातील १० आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 07:22 PM2018-07-06T19:22:10+5:302018-07-06T19:24:46+5:30

कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या १५ पैकी १० लुटारूंना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५२ लाखांची रोकड तसेच अन्य साहित्यांसह एकूण ५६ लाख, ५४, ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Ten accused in the robbery of Rs 70 lakh in Nagpur, arrested | नागपुरातील ७० लाखांच्या लूटमार प्रकरणातील १० आरोपी गजाआड

नागपुरातील ७० लाखांच्या लूटमार प्रकरणातील १० आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्दे५६ लाखांचा मुद्देमाल जप्तपाच आरोपी फरार, पोलिसांची शोधमोहिम तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या १५ पैकी १० लुटारूंना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५२ लाखांची रोकड तसेच अन्य साहित्यांसह एकूण ५६ लाख, ५४, ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांनी या संबंधाने शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली.
विदर्भातील मोठे कोळसा व्यापारी म्हणून कैलास अग्रवाल यांचे नाव आहे. त्यांचे भंडारा मार्गावरील पॉवर हाऊस चौकात शिवम् टॉवरमध्ये डी. के. अ‍ॅन्ड कंपनी तसेच आयाती मिनरल्स नावाने कार्यालय आहे. २९ जूनच्या रात्री ८.१० वाजता कैलास अग्रवाल यांचा मुलगा सचिन तसेच रोखपाल राजेश भिसीकर सुमारे ७० लाखांची रोकड घेऊन कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. ते कारजवळ येताच अचानक समोर आलेल्या लुटारूंनी सचिन आणि राजेशच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि राजेशपासून नोटांनी भरलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. राजेशने बॅग घट्ट पकडून ठेवल्यामुळे लुटारूंनी प्रारंभी पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर धारदार शस्त्राने राजेशच्या हातावर घाव मारले आणि नोटांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढला. या धाडसी लुटमारीने व्यापा-यांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. परिमंडळ तीन मधील सहा तसेच गुन्हे शाखेची सहा अशी १२ पोलीस पथके या लुटमारीचा समांतर तपास करीत होती. गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाला या लुटमारीतील आरोपीचा छडा लावण्यात यश मिळाले. पोलिसांनी लुटमार करणा-या १० आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५२ लाख, ८४ हजारांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह ५६ लाख, ५४, ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरार असलेल्या पाच आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यांनाही लवकरच अटक करू, असे उपायुक्त माकणिकर यांनी सांगितले.

१५ दिवस केली रेकी
या धाडसी लुटमारीचा सूत्रधार प्रफुल्ल मतलाने एका कोळसा ट्रान्सपोर्टरकडे काम करतो. त्याचे कोळश्याच्या वाहतूकीच्या अनुषंगाने कैलास अग्रवाल यांच्या कार्यालयात जाणे-येणे होते. त्यामुळे त्याला अग्रवाल यांच्याकडे रोज ६० ते ७० लाखांचा रोखीने व्यवहार होतो आणि ही रोकड ते रोज घरी नेत असल्याची माहिती होती. ती रोकड सहजपणे लुटू शकतो, असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने प्रारंभी मंगेश बोंडे याला सोबत घेऊन नंदनवनमधील कुख्यात गुंड सचिन भाऊराव देशभ्रतार याला सांगितले. त्याने आणि प्रफुल्ल मतलानेने लुटमारीचा कट रचला. नंतर गुन्हेगारांची जुळवाजुळव केली. देशभ्रतार याने सांगितल्याप्रमाणे प्रफुल्ल आणि मंगेशने तब्बल १५ दिवस अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर रेकी केली. त्यानंतर त्यांनी लुटमार केली. ही रोकड घेऊन आरोपी वेगवेगळ्या भागात रवाना झाले. काही जण नागपूरबाहेर पळाले. गुन्हा करण्यासाठी आरोपींना १५ दिवस लागले. तर, त्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांना सहा दिवस लागले. विशेष म्हणजे, २९ जुनच्या रात्री ही घटना घडली. त्या रात्री पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांचा नाईट राऊंड होता. त्यांनी त्याच रात्री आरोपींना लुटण्यासाठी शहरातील विविध भागात ठिकठिकाणी छापेमारी केली होती.

आॅटोत दडवून ठेवली होती रोकड
या संबंधाने माहिती देताना पोलीस उपायुक्त माकणिकर यांनी सांगितले की, रोकड लुटल्यानंतर १५ पैकी कुख्यात कुणाल समुद्रे सरफराज खान हमिद खान (रा. जरीपटका), नादिर पठाण (पडोळेनगर, वाठोडा), त्याचा मित्र शाहरूख आणि अन्य एक या पाच जणांनी १५ ते १७ लाख रुपये स्वत:जवळ घेतले आणि ते नागपूर बाहेर निघून गेले. उर्वरित रोकड मतलाने आणि देशभ्रतार या दोघांनी शेख शाहरूखचा भाऊ अशरफ सय्यद याच्या आॅटोत दडवून ठेवली. पोलिसांनी लुटलेल्या रकमेपैकी ५२ लाख,८४,८५० रुपये, गुन्ह्यात वापरलेली बजाज डिस्कव्हर, टीव्हीएस अपाचे, रक्कम लपविण्यासाठी वापरलेला आॅटो असा एकूण ५६ लाख, ५४, ८५० रुपयांचा मुद्देमाल लकडगंज पोलिसांच्या हवाली केला आहे.
प्रफुल्ल गजाननराव मतलाने (वय २७, रा. पावनगांव रोड, कळमना), मंगेश ताराचंद बोंडे (वय २७, रा. कांद्री-कन्हान), रवी मनोज महातो (वय २०, रा. अशोक चौकाजवळ कोतवाली), मंगेश मदन पसेरकर (वय २६, रा. आमदार निवासामागे, सीताबर्डी), अमित उर्फ दादू विजय बनकर (वय २१), सचिन भाऊराव देशभ्रतार (वय २६), मयूर बाबाराव गौरकर (वय १९), शूभम अविनाश गजभिये (वय २०, सर्व रा. न्यू पँथरनगर, वाठोडा, नंदनवन), शेख शाहरूख सय्यद अकरम (वय २०) आणि त्याचा भाऊ सय्यद अशरफ सय्यद अकरम (वय २५, दोघेही रा. हसनबाग, नंदनवन) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या निर्देशानुसार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संभाजी कदम, पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर (परिमंडळ तीन), सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, योगेश चौधरी, उपनिरीक्षक मंगला कोकाशे, हवलदार शत्रूघ्न कडू, रफिक खान, शैलेष ठवरे, सुरेश हिंगणेकर, शैलेष पाटील, अनिल दुबे, विठ्ठल नासरे, नायक अरुण धर्मे, श्याम कडू, अतुल दवंडे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, हरिश बावणे, मिलींद नारसन्ने, सूरज भोंगाडे, राजू पोतदार, फिरोज शेख, शरिफ शेख, सत्येंद्र यादव आणि अमोल पडघण यांनी ही कामगिरी बजावली.

 

 

Web Title: Ten accused in the robbery of Rs 70 lakh in Nagpur, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyदरोडा