सहगल प्रकरणाची घेतली जबाबदारी : श्रीपाद जोशी यांचा राजीनामा, विद्या देवधर यांच्यावर धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 07:44 PM2019-01-09T19:44:45+5:302019-01-09T23:32:57+5:30

यवतमाळ येथे नियोजित ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ख्यातकीर्त साहित्यिक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून नामुष्की ओढविल्यानंतर आणि राज्यभरातील साहित्यिकांच्या टीकेचे लक्ष्य ठरल्यामुळे अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वादग्रस्त ठरलेल्या यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या तोंडावर त्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे. महामंडळाच्या घटनेनुसार उपाध्यक्ष या नात्याने अध्यक्ष पदाची सूत्रे विद्या देवधर यांच्याकडे आली आहेत.

Taken Sehgal's responsibility : Shripad Joshi resigns | सहगल प्रकरणाची घेतली जबाबदारी : श्रीपाद जोशी यांचा राजीनामा, विद्या देवधर यांच्यावर धुरा

सहगल प्रकरणाची घेतली जबाबदारी : श्रीपाद जोशी यांचा राजीनामा, विद्या देवधर यांच्यावर धुरा

googlenewsNext
ठळक मुद्देकाहींनी केले जोशी यांचे अभिनंदन तर काहींनी म्हटले राजकारणाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ येथे नियोजित ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ख्यातकीर्त साहित्यिक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून नामुष्की ओढविल्यानंतर आणि राज्यभरातील साहित्यिकांच्या टीकेचे लक्ष्य ठरल्यामुळे अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वादग्रस्त ठरलेल्या यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या तोंडावर त्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे. महामंडळाच्या घटनेनुसार उपाध्यक्ष या नात्याने अध्यक्ष पदाची सूत्रे विद्या देवधर यांच्याकडे आली आहेत.
लोकमतने आधीच याबाबत वृत्त प्रकाशित करून साहित्य जगताची भूमिका मांडली होती. डॉ. श्रीपाद जोशी यांनी साहित्य महामंडळाला ई-मेलवरून आपल्या राजीनाम्याचा निर्णय कळविला आहे. सहगल यांना ‘संमेलनाला येऊ नका’, असे ज्यांनी कुणी पत्र पाठविले असेल, त्याची महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत असून आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी ई-मेलद्वारे कळविले आहे. या ई-मेलमध्ये त्यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभारही मानले आहेत. डॉ. जोशी यांच्या राजीनाम्याचा ई-मेल महामंडळाला प्राप्त झाल्याचा दुजोरा महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी दिला आहे. दरम्यान, अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर महामंडळाच्या घटनेनुसार उपाध्यक्ष या नात्याने अध्यक्ष पदाची सूत्रे विद्या देवधर यांच्याकडे आली असून त्या यवतमाळच्या नियोजित संमेलनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी रवाना झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नयनतारा सहगल यांच्यावरून निर्माण झालेला वाद, आयोजक संस्थेमधील अंतर्गत कलह व डॉ. जोशी यांचा राजीनामा, यामुळे दोन दिवसावर आलेले संमेलन पार पाडण्याची मोठी जबाबदारी देवधर यांच्यावर आली असून आयोजक आणि महामंडळ त्याला कशाप्रकारे सामोरे जाते, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचे पदाधिकारी, घटक संस्थांचे पदाधिकारी तसेच आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीमध्ये संमेलनाच्या तयारीसह महामंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी आणि साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
याचवेळी डॉ. श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यावरून साहित्य विश्वात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे कारण आयोजकांकडून सांगण्यात येत असले तरी सहगल यांच्या भाषणाची प्रत प्राप्त झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या राजकीय दबावामुळे ऐनवेळी त्यांना नकार ऐनवेळी त्यांना नकार देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आयोजकांच्या कृतीचा साहित्य जगताकडून निषेध केला जात आहे.
अशात डॉ. श्रीपाद जोशी यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तर काहींनी राजकारणामुळे त्यांचा बळी गेल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी उशिरा सुचलेले शहाणपण संबोधले आहे तर काही त्यांच्या भूमिकेचाच विरोध करीत आहेत. सहगल यांच्या प्रकरणात आधीच आयोजक व साहित्य महामंडळाने मोठी चूक केली असून संमेलन आणि मराठीच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता यवतमाळच्या संमेलनाची रया गेली असून आता राजीनामा देऊन काही निष्पन्न होणार नाही, असाही टीकात्मक सूर काहींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.

महामंडळ अध्यक्षाविना पार पडेल संमेलन?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. महामंडळाचे कार्यालय सध्या विदर्भ साहित्य संघाकडे असल्याने नियमानुसार वि.सा. संघाच्याच सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड होणे क्रमप्राप्त आहे. डॉ. जोशी यांची कारकिर्द मार्च २०१९ मध्ये संपणार होती. त्यानंतर महामंडळाचा कार्यभार मराठवाडा साहित्य परिषदेकडे जाणार आहे. त्यामुळे होणाऱ्या नव्या अध्यक्षाला केवळ अडीच महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. आलेल्या स्थितीनुसार वि.सा. संघाला अध्यक्षाचे नाव सुचविणे आवश्यक ठरणार आहे. त्यानुसार सध्या महामंडळात विदर्भ संघाचे प्रतिनिधी असलेल्या इंद्रजित ओरके व डॉ. विलास देशपांडे यांच्यासह वामन तेलंग यांच्या नावाचीही चर्चा केली जात आहे. मात्र याबाबत वि.सा. संघाची भूमिका कळू शकलेली नाही. विदर्भ संघाने नाव सुचविले नसेल तर यवतमाळचे साहित्य संमेलन अध्यक्षाविनाच पार पडेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान गुरुवारी संमेलन आयोजक संस्थेसह महामंडळ आणि घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यानंतरच अध्यक्षांच्या निवडीबाबत अंतिम निर्णय समजू शकेल. 

Web Title: Taken Sehgal's responsibility : Shripad Joshi resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.