व्हॉटसअपवर मैत्री करून विद्यार्थ्याचे केले अपहरण; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:12 PM2018-03-01T14:12:21+5:302018-03-01T14:12:35+5:30

व्हॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला एका युवतीने भेटायला बोलवले. तो भेटायला जाताच कथित युवतीच्या दोन भावांनी त्याचे अपहरण केले.

Student kidnapped; Whats app friendship; Event in Nagpur | व्हॉटसअपवर मैत्री करून विद्यार्थ्याचे केले अपहरण; नागपुरातील घटना

व्हॉटसअपवर मैत्री करून विद्यार्थ्याचे केले अपहरण; नागपुरातील घटना

Next
ठळक मुद्देसंशयित युवती आणि तिच्या साथीदारांचा शोध सुरूविद्यार्थ्याने संधी साधून करून घेतली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला एका युवतीने भेटायला बोलवले. तो भेटायला जाताच कथित युवतीच्या दोन भावांनी त्याचे अपहरण केले. नंतर त्याला तब्बल साडेचार तास वेठीस धरून त्याच्या वडिलांना त्याची सुटका करण्याच्या बदल्यात १ लाख, २० हजारांची खंडणी मागितली. गंभीर परिणामाची धमकीही दिली. प्रसंगावधान राखत पीडित विद्यार्थ्याने संधी मिळताच आरोपींना गुंगारा देऊन पळ काढला. ही नाट्यमय घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी घडली.
अशोक गणपतराव देवकर (वय ५३, रा. तुकारामनगर) यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा मयूर (वय १७) बारावीचा विद्यार्थी आहे. त्याला आठ दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलवर एका युवतीचा व्हॉटस्अ‍ॅप कॉल आला. मुलीने आपले नाव काजल बावणे सांगितले. त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर रोज आॅनलाईन चॅटिंग सुरू झाली. मयूरचा एक मित्र पाचपावलीतील लष्करीबागेत राहतो. त्याला भेटण्यासाठी मयूर २७ फेब्रुवारीला दुपारी १.१० वाजता गेला. तेथे त्याला काजलच्या मोबाईलवरून फोन आला. तिने त्याला सेंट्रल एव्हेन्यूवर भेटण्यासाठी बोलवले. ठरलेल्या ठिकाणी काजलला भेटण्यासाठी गेलेल्या मयूरजवळ दोन तरुण आले. आम्ही काजलचे भाऊ आहोत, तू तिला फोनवरून का सारखा त्रास देतो, असे म्हणत आरोपी मयूरच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसले. त्यांनी त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला सेंट्रल एव्हेन्यू, सदर, झिंगाबाई टाकळी, गिट्टीखदान परिसरात जबरदस्तीने फिरवू लागले. या दरम्यान आरोपींनी मयूरच्याच मोबाईलवरून त्याचे वडील अशोक देवकर यांना फोन केला. मयूरचे अपहरण केले असून, त्याची सुखरूप सुटका करून घ्यायची असेल तर १ लाख, २० हजारांची खंडणी द्यावी लागेल, असे म्हटले. पोलिसांना माहिती दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशीही धमकी दिली. तब्बल ४ तास मयूर त्यांच्या ताब्यात होता. सायंकाळी ५.३० ला आरोपींचे काही वेळेसाठी दुर्लक्ष झाल्याचे बघून मयूरने गिट्टीखदानमधील एका स्थानावरून आपली दुचाकी घेऊन धूम ठोकली. त्याने घरी पोहचल्यानंतर वडिलांना आपबिती सांगितली.

पोलिसांकडे तक्रार
वडिलांनी या प्रकरणाची तक्रार पाचपावली पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी अपहरण करून खंडणी मागणे, धमकी देणे आदी आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पी. मोहेकर गुरुवारी दुपारी आपल्या सहका-यासह गिट्टीखदानमध्ये पोहचले होते. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे स्पष्ट झालेली नव्हती.

रॅकेटचा संशय
फेसबुक किंवा व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मैत्रीच्या नावाखाली युवकांनाच नव्हे तर लब्धप्रतिष्ठीतांना जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनेक टोळ्या नागपुरात सक्रीय आहेत. या संबंधाने यापूर्वीही अनेक प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचली आहेत. मात्र, बदनामीच्या धाकाने नंतर त्यांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्या आहेत. सक्रीय असलेल्या रॅकेटमधील आरोपींपैकीच कुणी तरी मयूरचे अपहरण केले असावे, असा संशय आहे.दरम्यान, ती काजल बावणे कोण, कुठली, मयूरला ज्या मोबाईलनंबरवरून कॉल, मेसेज आले, तो मोबाईल आणि सीमकार्ड कुण्याच्या नावावर आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

 

Web Title: Student kidnapped; Whats app friendship; Event in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.