नागपूरसह १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:12 AM2018-02-25T00:12:32+5:302018-02-25T00:12:49+5:30

नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

'Startup Echo System' in 12 districts including Nagpur | नागपूरसह १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’

नागपूरसह १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : डिजिटल अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या अमाप संधीफॉर्च्युन फाऊंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरज ही शोधाची जननी आहे. स्टार्टअपसंदर्भात राज्याचे नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. या अनुषंगाने येत्या पाच वर्षांत मटेरियल अर्थव्यवस्थेपेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेला जास्त महत्त्व असून, यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे फॉर्च्युन फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपप्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार विकास महात्मे, आ. प्रा. अनिल सोले, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राजेश बागडी, संदीप जाधव, विक्की कुकरेजा, नवनीतसिंग तुली, प्रा. कुणाल पडोळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज तरुणाईसमोर बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे, तर दुसरीकडे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही. फॉर्च्युन फाऊंडेशनद्वारे आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिट हा या दोघांमधील सेतू आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. राज्यात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ होत असून महाराष्ट्र आता यामध्ये अग्रेसर आहे. देशात होणाºया एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाली आहे. या माध्यमातून ३५ लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे.
आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एकप्रकारची मंदी पाहावयास मिळते. मात्र आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ७ टक्क्यांची वाढ दिसते आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही आपली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. जीडीपीमध्ये झालेली वाढ ही वाढत्या रोजगाराच्या संधींचे द्योतक आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा विकासदर अव्वल आहे. राज्यात रोजगाराच्या संधीमध्येही वाढ होत आहे. २०२९ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. सेवाक्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी असून याद्वारे हे उद्दिष्ट २०२५ पर्यंतच साध्य होऊ शकते, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जिल्हा अग्रणी बँकेचे अयुब खान तसेच जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सत्कार केला. पर्यावरण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल सुरभी जयस्वालला गौरविण्यात आले. तसेच विविध उद्योगसमूहातील अधिकारी आणि महाविद्यालयातील प्रतिनिधींचाही सत्कार यावेळी करण्यात आला. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाद्वारे उमेश शामराव गणवीर यांना बीजभांडवलासाठी एक लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. मनपाच्या समाजकल्याण विभागाद्वारे दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा देण्यात आल्या. तसेच विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रा. अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रा. कुणाल पडोळे यांनी आभार व्यक्त केले.
मिहानमध्ये संरक्षण क्षेत्रात ३०० कोटीचा कौशल्य विकास पार्क
मेक-इन-महाराष्ट्रमध्ये नागपूर डिफेन्स क्लस्टरला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. राफेल विमाने आता पूर्णपणे आपल्या देशातच तयार होणार आहेत. यासाठी आपल्याला कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर द्यावा लागेल. त्याअंतर्गत मिहान येथे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील डिफेन्स पार्क तयार होत असून, कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी टाटासोबत ३०० कोटी रुपये गुंतवणुकीचा संरक्षण क्षेत्रातील कौशल्य विकास पार्क सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. मिहान व ड्रायपोर्टमध्येही मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होत आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने नागपूर लॉजिस्टिक हब बनू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कद्वारे वस्त्रोद्योगाला चालना देण्यात आली आहे. वर्धा, यवतमाळ व नागपूरमध्येही टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
समृद्धी एक्स्प्रेसद्वारे ३० लाख रोजगार
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही मोठ्या रोजगार संधी असल्याने राज्यात पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविण्यात आली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या निर्मितीद्वारे ३० लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. बंदरे असलेल्या शहरांचा व पर्यायाने राज्यांचा अधिक वेगाने विकास होताना दिसतो. समृद्धी महामार्गाद्वारे राज्यातील २४ जिल्हे बंदरांशी जोडून विकास साधण्यात येणार आहे. त्यामुळे आता उद्योग आणि रोजगारासाठी विशेष क्षेत्र किंवा ठराविक गावेच महत्त्वाची ठरतील, असे राहणार नाही. राज्यातील सर्व ठिकाणच्या उद्योगांना यामुळे एकसमान फायदे मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तीन हजार युवकांना रोजगार, मुद्रा योजनेत ५०० स्वयंरोजगार
प्रास्ताविकात फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले म्हणाले, युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून एकाच छताखाली युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतात. यंदा या मेळाव्यात मुद्रा योजनेअंतर्गत ५०० जणांना लाभ देण्यात आला आहे. तीन हजार युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. यामध्ये अनेक अपंगांनाही रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. शेवटच्या दिवशी ज्या युवकांचे रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही, त्यांनी निराश होऊ नये. वर्षभर आमचे काम सुरू असते. युवकांनी थेट कंपन्यांमध्ये आपला बायोडाटा सादर करावा, त्यानंतरही काही अडचणी आल्या तर मला येऊ भेटावे, असे आवाहनही अनिल सोले यांनी केले.
३० हजारावर युवकांचे रजिस्ट्रेशन
तीन दिवस चाललेल्या युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये तब्बल ३० हजारावर युवकांनी भेट देऊन आपली नोंदणी करून घेतली. शनिवारी शेवटच्या दिवशी ही संख्या अधिक होती. केवळ नागपूरच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर व भंडारा येथूनही मोठ्या प्रमाणावर युवक आले होते. एकाच छताखाली रोजगार व स्वयंरोजगाराची संधी तरुणांना उपलब्ध होते. त्यामुळे अशाप्रकारचे युथ एम्पॉवरमेंट समिट प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, अशी अपेक्षा अनेक युवकांनी व्यक्त केली.
उद्योजक होण्याचा विचार करावा - राजकुमार बडोले
सामाजिक न्याय विभाग आपल्यासोबत नेहमीच आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ आपणास मिळेलच. पण भविष्यात आपण उद्योजक कसे व्हाल, यावर नक्की विचार करा. आपले प्रशिक्षण पूर्ण करून उद्योगांना सुरुवात करा, असा हितोपदेश महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला. महात्मा फुले विकास महामंडळाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तब्बल ६०० विद्यार्थ्यांना त्यांच्या उपस्थितीत विद्या वेतन प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
हंसराज अहिरांची युथ समिटला भेट
सकाळच्या सत्रात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी युथ एम्पॉवरमेंट समिटला भेट दिली. यादरम्यान त्यांनी समिटच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि याचा युवकांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

Web Title: 'Startup Echo System' in 12 districts including Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.