उत्साहाला उधाण, आगमनाची प्रतीक्षा

By admin | Published: August 29, 2014 01:06 AM2014-08-29T01:06:49+5:302014-08-29T01:06:49+5:30

बाप्पांच्या आगमनामुळे शहर गणरायांच्या मिरवणुकीने गजबजले होते. शहरात जवळपास दोन लाख घरगुती गणपतीची स्थापना केली जाते. अनेक घरगुती गणेशमूर्तींची निवड आधीच

Sparkling enthusiasm, waiting for arrival | उत्साहाला उधाण, आगमनाची प्रतीक्षा

उत्साहाला उधाण, आगमनाची प्रतीक्षा

Next

‘ओम गं गणपतये नम:’ : आज होणार प्राणप्रतिष्ठा
नागपूर : बाप्पांच्या आगमनामुळे शहर गणरायांच्या मिरवणुकीने गजबजले होते. शहरात जवळपास दोन लाख घरगुती गणपतीची स्थापना केली जाते. अनेक घरगुती गणेशमूर्तींची निवड आधीच करून ठेवण्यात आली होती. पण शुक्रवारच्या स्थापनेचा दिवस पाहता अनेक गणेशभक्तांनी कार आणि दुचाकीवर श्रींना नेले. आराध्य दैवताला १० दिवसांसाठी घरी घेऊन जाण्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यात चिमुकल्यांचा उत्साह तर वाखाणण्यासारखा होता.
सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे देशातील विविध लोकप्रिय मंदिरांच्या प्रतिकृती गेल्या काही वर्षांपासून उभारण्यात येतात. उंच आणि भव्य गणेशमूर्तीसाठी मंडळांचा आग्रह असतो. त्यासाठी चितार ओळीतील मूर्तिकारांना महिनाभरापूर्वीच आॅर्डर दिली जाते. आता बाप्पांची स्थापना आज रीतसर होणार असली तरी, स्थापनेच्या दृष्टीने सोईचे व्हावे म्हणून सार्वजनिक मंडळाच्या विशाल गणेशमूर्ती गुरुवारीच नेण्यात आल्या. त्यात भरीसभर आज दुपारपासून पाऊस कोसळत होता. पण गणरायाच्या आगमनासह गणेशभक्तांनी पावसाचेही आनंदाने स्वागत केले. पाऊस येत असताना भव्य गणेशमूर्ती न्यायची कशी...? याचा विचार मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. पण यातून तो विघ्नहर्र्ताच मार्ग काढेल, असा विश्वासही या भक्तांना होताच. याशिवाय पाऊस जोरात आला तर ताडपत्री आणि इतर सामानांचीही तजवीज करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्ते ‘नो टेन्शन’च्या मूडमध्ये बिनधास्त होते.
घरगुती गणेशमूर्तींचे आगमन
साधारणत: दुपारी २ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत या विशाल मूर्ती वाजतगाजत नेण्यात आल्या. चितार ओळीतील चिंचोळ्या जागेतून या मूर्ती हलविण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. पण बाप्पाच्या भक्तीपुढे सारेच नतमस्तक असल्याने शिस्तबद्धतेत सारे पार पडले. एकदा मूर्ती वाहनांवर ठेवण्यात आल्यावर मात्र गणपती बाप्पा मोरया म्हणून गणेशभक्त जोरात घोषणा देऊन आपला उत्साह जाहीर करीत होते. विशेषत: यंदा युवकांसोबतच मोठ्या प्रमाणात युवतीही बाप्पांचे स्वागत करण्यासाठी आल्या होत्या. अत्यंत उत्साहात युवतीही पावसात भिजत घोषणांमध्ये सहभागी झाल्याने वातावरणात आनंद होता. बाप्पांच्या आगमनामुळे शहर गणरायांच्या मिरवणुकीने गजबजले होते. शहरात जवळपास दोन लाख घरगुती गणपतीची स्थापना केली जाते. अनेक घरगुती गणेशमूर्तींची निवड आधीच करून ठेवण्यात आली होती. पण शुक्रवारच्या स्थापनेचा दिवस पाहता अनेक गणेशभक्तांनी कार आणि दुचाकीवर श्रींना नेले. गणेशमूर्ती घेण्यासाठी अख्खे कुटुंबच औत्सुक्याने आले होते. आराध्य दैवताला १० दिवसांसाठी घरी घेऊन जाण्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यात चिमुकल्यांचा उत्साह तर वाखाणण्यासारखा होता.
पावसातही गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण
पावसाच्या येण्यानेही गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गणेशमूर्ती पावसात भिजू नये म्हणून संपूर्ण काळजी घेत गणेशभक्त पावसात भिजण्याचा आनंद घेत होते. काहींनी वाजतगाजत श्रींना नेण्यासाठी संदल आणि वाजंत्रीची व्यवस्था केली होती. पण पावसाने बॅण्ड ओले झाल्याने त्यांचा आवाज थिजला होता. पण गणेशभक्तांनी श्रींचा जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला. आवडते दैवत असलेल्या गणेशाचे स्वागत करताना सारेच हरखले होते. पावसामुळे चितार ओळीत चिखल झाला. जागोजागी गणेशमूर्ती ठेवलेल्या होत्या आणि पावसात त्या ओल्या होऊ नयेत म्हणून मूर्तिकारांचीही धावपळ सुरू होती. गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या गर्दीने अख्ख्या महाल परिसराला जत्रेचेच स्वरूप आले होते.
श्रींच्या स्वागतासाठी बाजारही सजला
श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर सजावटींचा बाजार सजला आहे. यात थर्माकोलचे मखर, थर्माकोलची शोभिवंत देव्हारे, शोभेच्या दिव्यांच्या माळा, रंगीबेरंगी विद्युत दिवे, मोत्यांच्या माळा, गणरायांचे मुकुट, सॅटीन रिबिनपासून केलेल्या फुलांचे हार आदींचा सहभाग आहे. मिठाईची दुकाने भाविकांना खुणावत आहेत अन् श्रींच्या भजनांच्या, अभंगांच्या सीडीची रेलचेल आहे.
वीज वितरणाची विशेष व्यवस्था
गणेशोत्सवाच्या काळात वीज खंडित होऊन गणेशभक्तांना मनस्ताप होऊ नये म्हणून महावितरण आणि एसएनडीएलने विशेष उपाययोजना केल्या आहेत. शहरात सध्या भारनियमन करण्यात येत नाही. पण काही तांत्रिक कारणाने वीज खंडित होऊ नये आणि गणेशोत्सवात विघ्न येऊ नये म्हणून एसएनडीएलने विशेष योजनेंतर्गत सर्व सेवा योग्य आणि चोख ठेवण्याचा बंदोबस्त केला आहे. या काळात काही समस्या निर्माण झालीच तर त्यावर तत्काळ उपाय करण्यासाठी एक स्वतंत्र चमू कार्यरत असणार आहे. याशिवाय अनेक सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सवासाठी अनधिकृत वीज वापरतात. यामुळे विजेचे नुकसान होते. अशा गणेश मंडळांना तत्काळ अधिकृत विजेचे मीटर आणि वीजपुरवठा करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या १० दिवसांसाठी मंडळांना अस्थायी वीज मीटर देण्यात येणार असून, १० दिवसांचे बिल भरून हा गणेशोत्सव आनंदात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात सर्वत्र गणेशमूर्तीचा प्रवास
चितार ओळ आणि महाल परिसर तर गणेशभक्तांनी गजबजला होताच, पण शहराच्या इतर भागातही आज गणेशोत्सवाचीच धूम होती. शहरात वर्धमाननगर, धरमपेठ, प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर, हुडकेश्वर रोड, म्हाळगीनगर, अयोध्यानगर चौक, रामेश्वरी चौक, मेडिकल चौक, सक्करदरा चौक, नंदनवन चौक, पारडी, कोराडी मार्ग, मानकापूर येथेही गणेशमूर्तींची विक्री करण्यात आली. अनेक मूर्तिकार सध्या शहराच्या विविध भागात स्थायिक झाले आहेत. या नव्या दमाच्या मूर्तिकारांकडेही भाविकांनी त्यांना हव्या तशा मूर्तींची आॅर्डर आधीच दिली होती. साधारणत: शास्त्राप्रमाणे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच्या सूर्यास्तापूर्वी गणेशमूर्ती घरी नेण्यात यावी, असा संकेत आहे. त्यामुळे आज शहराच्या विविध भागात गणेशमूर्ती नेण्यासाठी उत्साहाचे वातावरण होते. अनेकांनी गणेशाला वाजतगाजत नेण्यासाठी कारची ध्वनियंत्रणा उपयोगात आणली. त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. धरमपेठ परिसरातील फुलांची दुकाने आज प्रामुख्याने सजली होती. गणेशासाठी विशेष पुष्पहार तयार करण्यात आले. गणेशाला जास्वंदाच्या फुलांचा हार घालावा, असे मानले जाते. त्यामुळे जास्वंदाच्या फुलांच्या हाराची चढ्या भावाने आज नोंदणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
प्रतिष्ठापना आणि पूजनाची सर्वोत्तम वेळ दुपारी २.५४ पर्यंत
शुक्रवारी २९ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी गणेशाच्या मृण्मय मूर्तीची पूजा होते; परंतु इतरही अनेक स्वरूपात गणेशाचे पूजन केल्या जाते. मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त किंवा वेळ नसतो. साधारणत: मध्यान्हापर्यंत गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. पण २९ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजून ५४ मिनिटांनी भद्रा चालू होत असल्याने, त्यानंतर गणेश स्थापना करू नये. तसेच सकाळी १०.३० ते १२ हा राहू काळ टाळून गणेश पूजन करणे योग्य ठरेल, असे मत ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी व्यक्त केले आहे. गणेश चतुर्थीला डाव्या सोंडेचा गणपती आणून स्थापना आणि पूजन करतात. उजव्या सोंडेचा गणपती कडक सोवळ्याचा तर डाव्या सोंडेचा गणपती सौम्य सोवळ्याचा असतो. हा केवळ गैरसमज आहे. काही कारणांमुळे भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीला गणेश पूजन आणि स्थापना शक्य नसल्यास पुढे शुभदिवस पाहून वगैरे ते करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. गणेश स्थापना झाल्यानंतर सूतकवगैरे आल्यास दुसऱ्या कुणाकडूनही गणेश पूजन साग्रसंगीत करून त्यांच्यामार्फत त्वरित गणेश विसर्जन करावे. घरात गर्भवती स्त्री असल्यास गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याची रुढीदेखील केवळ गैरसमजातून निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले. गणेश चतुर्थी ही भाद्रपद शुक्ल पक्षातील तिथी गणेशोपासनेतील तिथी मानतात. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडची तुरिया अवस्था. तेच जीवाचे परम साध्य होय. यादिवशी चंद्र पाहायचा नाही, कारण चंद्र ही मनाची संतती आहे. ग्रहमालेत चंद्र चंचल तसेच शरीरात मन चंचल आहे. हे मन जेव्हा उन्मन होईल, तेव्हाच तुरियावस्था सिद्ध होईल. या दिवशी चंद्र पाहिल्यास खोटे आळ येतात, असा समज आहे आणि तसे पुराणात नमूदही करून ठेवले आहे. गणेशोत्सवात उत्साह असला तरी श्रद्धा आणि पूजा या दोन गोष्टींचे महत्त्व अबाधित आहे. परंतु काळाच्या ओघात आणि बदलत्या वातावरणातही हातात मूषकध्वज असलेली गणेशमूर्ती ठेवण्याचाच प्रयत्न व्हावा. पूजन शास्त्रीय पद्धतीने केल्यास त्याची चांगली फळे मिळतात, असे डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले आहे.

Web Title: Sparkling enthusiasm, waiting for arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.