श्रुतीमधूर वादन आणि रसिल्या गायनाची मैफिल

By admin | Published: August 21, 2014 01:16 AM2014-08-21T01:16:29+5:302014-08-21T01:16:29+5:30

प्रतिभावंत कलावंतांना कला सादरीकरणासाठी प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणाऱ्या गुणिजान संगीत महोत्सवाचे आयोजन आजपासून सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. या संगीत महोत्सवाचे

Shritimadhoor playing and Rasilya singing concert | श्रुतीमधूर वादन आणि रसिल्या गायनाची मैफिल

श्रुतीमधूर वादन आणि रसिल्या गायनाची मैफिल

Next

नागपूर : प्रतिभावंत कलावंतांना कला सादरीकरणासाठी प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणाऱ्या गुणिजान संगीत महोत्सवाचे आयोजन आजपासून सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. या संगीत महोत्सवाचे आयोजन सप्तक आणि ललित कला निधी, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले. हा महोत्सव संगीततज्ज्ञ पं. सी. आर. व्यास यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला. या द्विदिवसीय महोत्सवाचा आरंभ आज करण्यात आला.
मूळ नागपूर येथील पण सध्या मुंबई येथे स्थायिक असलेल्या निनाद मुळावकर यांच्या बासरीवादनाने महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. अंगभूत वादनक्षमता, घराणेदार तालीम व शास्त्र नियमांच्या चौकटीत राग स्वरूपाची सौंदर्यात्मक मांडणी करण्याचे वादकाचे कौशल्य या वैशिष्ट्यांसह त्यांचे वादन प्रारंभापासूनच श्रुतीमधूर ठरले. निनाद यांनी वादनाचा प्रारंभ राग यमन कल्याणने केला. मधाळ आलापीसह विलंबित व द्रुत गत वादनासह वादकाने केलेला रागविस्तार त्यांच्या कुशल वादनाला अधोरेखित करणारा होता. सुरेल, मधाळ व भरीव फुंक हे बलस्थान असलेल्या या कलावंतांने रागाचे सौंदर्य व प्रासादिकता स्वरांकित करीत स्वरसंगीत प्रवाही असते, याची प्रचिती दिली. यमन तर सर्व रागांचा राजाच समजला जातो. राग सादर करताना मिंड, गमक, पुकार हे कठीण प्रकार श्वासावर कमालीचे नियंत्रण ठेवीत त्यांनी सादर केले. राग मिश्र पिलू सादर करून त्यांनी वादनाचे समापन केले. ओजस आडिया यांनी त्यांना प्रशंसनीय सहसंगत केली. यानंतर सुविख्यात गायिका मिता पंडित यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग भूपने गायनाला प्रारंभ केला. गायिकेचा गाजदार अनोखा आवाज, स्वरबंध आणि अर्थभावपूर्ण बंदिश, तराण्यासह झालेल्या रागविस्ताराने त्यांचे गायन रसिकांना आनंद देणारे ठरले. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी आणि तानपुऱ्यावर मोनिका देशमुख व मानसी देशपांडे यांनी साथसंगत केली. निवेदन रेणुका देशकर यांनी केले. याप्रसंगी पं. व्यास यांचे पुत्र पं. सतीश व्यास यांनी मनोगत व्यक्त केले. कलावंतांचे स्वागत सप्तकचे विलास मानेकर, उदय गुप्ते आणि हरजिंदरसिंग यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Shritimadhoor playing and Rasilya singing concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.