नागपुरात बनवाबनवीच्या तीन घटनांनी खळबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:21 PM2018-02-20T14:21:03+5:302018-02-20T14:25:54+5:30

उपराजधानीतील तहसील, बजाजनगर आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणूकीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले.

Senssation : Three incidents of big cheating happened in Nagpur! | नागपुरात बनवाबनवीच्या तीन घटनांनी खळबळ !

नागपुरात बनवाबनवीच्या तीन घटनांनी खळबळ !

Next
ठळक मुद्देतहसील, बजाजनगर आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील तहसील, बजाजनगर आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणूकीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. पहिल्या प्रकरणात नागपूरच्या एका फर्मचे तामिळनाडूतील स्पिनिंग मिल्सच्या संचालकांनी सव्वातीन कोटी रुपये थकविले. बजाजनगरातील एका निवृत वनाधिका-याला २५ लाखांच्या बोनसचे आमिष दाखवून त्यांच्याकडून नोएडातील टोळीने ३९ लाखांचा गंडा घातला. तर, वर्षभरात रक्कम दुप्पट मिळेल, असे आमिष दाखवून अंबाझरीतील एका व्यक्तीला फिरोजपूरच्या ठगबाजांनी ४ लाख रुपयांनी फसवले.
तहसील : सव्वा तीन कोटी थकविले
गांधीबागमधील श्री गोपाल रमेशकुमार प्रा.लि. तर्फे तामिळनाडूतील तिरूनेलवल्ली येथील मेसर्स सुब्बूराज स्पिनिंग मिल्सच्या संचालकांना चार वर्षांपासून रुईच्या गाठी पोहचविल्या जात होत्या. त्या बदल्यात मिल्सचे संचालक तयार केलेला धागा तसेच रोख रक्कम देत होते. २५ जुलै २०१३ पासून नागपूर-तामिळनाडूचा व्यवहार सुरू झाला. तो २०१५ पर्यंत सुरळीत होता. त्यानंतर प्रत्येक वेळी काही न काही कारण सांगून रक्कम थकविणे सुरू झाले. श्री गोपाल रमेशकुमार प्रा. लि. चे उपाध्यक्ष प्रमोद शिवभगवान साबू यांनी तहसील ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तिरूनेलवल्ली येथील मेसर्स सुब्बूराज स्पिनिंग मिल्सचे संचालक व्यंकटस्वामी सुब्बूराज (रा, पराचियाममन, तामिळनाडू), रामस्वामी राघवन (रा. गणपती मेस कॉलनी शंकरनगर नारायणमालपुरन), गुरूस्वामी कृष्णकुमार (रा. मस्केकलाई, हुय्यपायम, कोईम्बतूर) आणि अरुण सुबियाह (रा. त्रीवेणी मायनी, मदुराई रोड, कोईम्बतूर) यांनी २५ जुलै २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत साबू यांच्या फर्मकडून १७ कोटी, ७ लाख, ४४ हजारांच्या रुई गाठींची खरेदी केली. त्याबदल्यात आतापावेतो ३ कोटी, २१ लाख, ५६ हजार रुपये थकित ठेवले. वारंवार मागणी करूनही प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून उपरोक्त आरोपी वेळ मारून नेत होते. ते रक्कम देणार नाही, हे ध्यानात आल्यामुळे फर्मतर्फे साबू यांनी १५ फेब्रुवारीला तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी केल्यानंतर सोमवारी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी तामिळनाडूत राहतात, त्यांच्या अटकेसाठी लवरकच पोलीस पथक तिकडे पाठविले जाणार असल्याची माहिती तहसीलचे ठाणेदार वैभव जाधव यांनी सांगितली.
बजाजनगर : निवृत्त अधिका-याला ३९ लाखांचा गंडा
बजाजनगरात निवृत्त वनाधिकारी सुधीर जयराम गावंडे (वय ७९) राहतात. डिसेंबर २०१५ मध्ये त्यांना सोम्य शर्मा आणि कांबळे नामक व्यक्तीचे दोनदा फोन आले. बिमा लोकपाल योजने अंतर्गत तुम्हाला २५ लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे, असे ते म्हणाले. गावंडे यांना विश्वासात घेतल्यानंतर १ जून २०१७ पर्यंत शर्मा आणि कांबळेने वेगवेगळळ्या सबबी सांगून त्यांना २४ लाख, ५७ हजार रुपये बँक खात्यात जमा करायला लावले. त्यानंतर त्यांच्याच दुस-या साथीदारांनी वेगवेगळळ्या नावाने फोन करून इन्शूरन्स कंपनीत अल्पावधीत मोठी रक्कम मिळणार असल्याचे सांगून गावंडे यांच्याकडून १४ लाख, ४७ हजार रुपये बँक खात्यात जमा करायला लावले. प्रत्येक वेळी आमिष दाखवून रक्कम जमा करायला सांगितली जात होती. मात्र, गावंडेने रक्कम मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी आरोपींकडे आपली रक्कम मिळावी म्हणून तगादा लावला असता त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे गावंडे यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी दिल्ली-नोएडा येथील टोळीचे सदस्य असल्याचा संशय असल्याची माहिती बजाजनगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले. त्यांचा शोध घेतला जात आहे.
अंबाझरी : चार लाखांचा गंडा
पांढराबोडीतील शंकर सदाशिव मेंडके (वय ५३) यांना डिसेंबर २०१६ मध्ये ७०४२६६८७५२ चा आरोपी धारक तसेच त्याच्या साथीदारांनी फोन केला. आमच्या कंपनीत एफडी काढा, अल्पावधीत दामदुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार मेंडके यांनी डिसेंबर २०१६ ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ४ लाख, २,२६५ रुपये आरोपीने सांगितलेल्या एचडीएफसी बँकेच्या फिरोजपूर शाखेतील खात्यात जमा केले. एफडीची मुदत संपल्यामुळे मेंडके यांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेंडके यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अशा प्रकारे आमिष दाखवून फसविण्याचे अनेक गुन्हे नेहमी घडतात. वृत्तपत्रातून त्याची माहितीही वेळोवेळी प्रकाशित होते. तरीसुद्धा पैश्याच्या लोभापोटी कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून आपली रक्कम दुस-याच्या बँक खात्यात जमा करण्याची चूक अनेक जण करतात.

Web Title: Senssation : Three incidents of big cheating happened in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.