तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:32 AM2017-08-23T01:32:33+5:302017-08-23T01:32:55+5:30

बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली.

Sampark Kranti Express run on broken routes | तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस

तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस

Next
ठळक मुद्देरेल्वे कर्मचाºयाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली : तातडीने दुरुस्तीचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून तुटलेल्या रुळांवरून संपर्कक्रांती एक्स्प्रेस रवाना झाली. या रेल्वेचे शेवटचे तीन डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असल्याचे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाºयाच्या लक्षात आले. त्याला शंका आल्याने त्याने पुढे जाऊन पाहिले असता रूळ तुटला असल्याचे आढळून आले. त्याने त्वरित याची माहिती स्टेशन व संबंधित कर्मचाºयांना दिली. यानंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ही बाब कर्मचाºयाच्या त्वरित निदर्शनास आली नसती तर प्रसंगी या रुळावरून जाणाºया इतर रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५.४५ वाजता संपर्कक्रांती एक्स्प्रेस नागपूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून रवाना होत होती. प्लॅटफॉर्मच्या इटारसी दिशेच्या टोकाकडे उभे असलेले दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ टीटीई जीतेंद्र कुमार हत्थेल यांनी पाहिले की, संपर्कक्रांती एक्स्प्रेसचे मागचे डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असून उसळी घेत आहेत. झटकेही खात आहेत. त्यांना संशय आला. त्यांनी जात असलेल्या रेल्वेचे बारकाईने निरीक्षण केले. रेल्वे जाताच हत्थेल यांनी रुळांची पाहणी केली असता त्यांना रूळ तुटला असल्याचे दिसून आले. हे पाहताच त्यांनी उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) कार्यालयाकडे धाव घेतली. तेथे रूळ तुटल्याची माहिती दिली. उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) राजू इंगले, प्रवीण रोकडे, अरुण श्रीवास्तव, आर.एस. तायडे यांनी लगेच हालचाली केल्या. काही वेळापूर्वीच अहमदाबाद एक्स्प्रेसला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येण्याचा सिग्नल देण्यात आला होता. इंगळे यांनी लगेच आऊटर डिप्टी एसएस आॅफिसला प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याची सूचना दिली. कंट्रोल रुमलाही कळवले. श्रीवास्तव, तायडे यांनी मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रशासनालाही याची माहिती दिली. याची दखल गेत रेल्वे स्टाफ त्वरित घटनास्थळी पोहचला व दुरुस्तीचे काम सुरू केले. तासभरात रुळाची दुरुस्ती करण्यात आली.
अहमदाबाद एक्स्प्रेस आऊटरवर थांबविली
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील रुळ तुटला असल्याची माहिती मिळताच आऊटर डिप्टी एसएस कार्यालयाने प्लॅटफॉर्म ब्लॉक केला. त्यामुळे अहमदाबाद एक्स्प्रेसला बराच वेळ आऊटरवर थांबविण्यात आले. नंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ही गाडी लावण्यात आली.
अशा घटना होत असतात : गुप्ता
या घटनेबाबत मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक बृजेश कुमार गुप्ता यांनी संपर्क केला असता ते म्हणाले, केवळ नागपूर मंडळातच नाही तर संपूर्ण भारतीय रेल्वेत फॅ्रक्चरच्या घटना होत असतात. रेल फॅ्रक्चर झाल्याची माहिती मिळताच त्वरित दुरुस्ती केली जाते.

Web Title: Sampark Kranti Express run on broken routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.