नागपूरच्या ग्रामीण भागात व्यसनी मुलाचा पित्याने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:23 AM2018-02-07T11:23:03+5:302018-02-07T11:23:15+5:30

पारशिवनी तालुक्यातील खंडाळा (डुमरी) येथील कॅनललगत आढळलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. कोणताही कामधंदा न करता दारूच्या व्यसनात पैसे उडविणाऱ्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचे उघडकीस आले आहे.

In the rural areas of Nagpur, the addicted youth was killed by father | नागपूरच्या ग्रामीण भागात व्यसनी मुलाचा पित्याने केला खून

नागपूरच्या ग्रामीण भागात व्यसनी मुलाचा पित्याने केला खून

Next
ठळक मुद्देलाखो रुपयांचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
पारशिवनी तालुक्यातील खंडाळा (डुमरी) येथील कॅनललगत आढळलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. कोणताही कामधंदा न करता दारूच्या व्यसनात पैसे उडविणाऱ्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. जयवंता ऊर्फ पिंटू गिरीधर शिर्के (२९, रा. वॉर्ड क्र. ३, गोरोबा काका मंदिराजवळ, कोराडी, जि. नागपूर) असे मृताचे तर गिरीधर दत्तूजी शिर्के (५९, रा. वॉर्ड क्र. ३, कोराडी, जि. नागपूर) असे आरोपी वडिलांचे नाव आहे.
पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा (डुमरी) शिवारातील कॅनलजवळ ३० जानेवारीला अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शी आढळले. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर मृत हा जयवंता ऊर्फ पिंटू शिर्के असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पारशिवनी पोलिसांनी तपासाला दिशा दिली. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करीत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जयवंताबाबत माहिती घेतली असता त्याला दारूचे व्यसन होते. त्यात त्याने लाखो रुपयांचा चुराडा केल्याचे समजले. त्या दिशेने तपास करीत असताना त्याच्या वडिलांनीच खून केल्याचे समजले.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पथकाने आरोपीला अटक करून पारशिवनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, पोलीस हवालदार सूरज परमार, नीलेश बर्वे, शिपाई प्रणय बनाफर, चालक पोलीस हवालदार भाऊराव खंडाते यांनी पार पाडली.

लाखो रुपयांचा चुराडा
मृत जयवंता हा कोणतेही काम न करता दारूत पैसे खर्च करायचा. त्याचे वडील गिरीधर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेले पैसेही त्याने दारूतच खर्च केले. त्याने साधारणत: ८ ते १० लाख रुपये दारूच्या व्यसनात खर्च केल्याचे त्याच्या वडिलाचे म्हणणे आहे. दारूचे व्यसन करण्यासाठी तो पैशाचा तगादा लावायचा. त्यातून तो कुटुंबातील आई-वडील, पत्नी व मुलांना मारहाण करायचा. त्यामुळे अख्खे शिर्के कुटुंब त्याच्या जाचाला कंटाळले होते. त्यातूनच त्याच्या वडिलाने त्याचा ‘काटा’ काढण्याचे ठरविले. त्यानुसार गिरीधरने एमएच-४०/एम-०५७० क्रमांकाच्या मोटरसायकलवर जयवंताला बसवून खंडाळा (डुमरी) शिवारातील कॅनलजवळ नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजली आणि त्याच्याच गळ्यातील दुपट्ट्याने त्याचा गळा आवळला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कॅनालजवळ फेकून दिला, अशी कबुली त्याच्या वडिलाने पोलिसांकडे दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: In the rural areas of Nagpur, the addicted youth was killed by father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा