भाजपच्या विजयरथाला संघाचे बळ; मतदानाच्या मोहिमेचे मिळाले फळ

By योगेश पांडे | Published: December 4, 2023 05:12 AM2023-12-04T05:12:00+5:302023-12-04T05:12:38+5:30

भाजप समर्थनार्थ मतदान वाढावे, यासाठी राबविली मोहीम

RSS contributed to BJP's victory, campaign was taken to increase voter turnout | भाजपच्या विजयरथाला संघाचे बळ; मतदानाच्या मोहिमेचे मिळाले फळ

भाजपच्या विजयरथाला संघाचे बळ; मतदानाच्या मोहिमेचे मिळाले फळ

नागपूर : मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीनही राज्यांतील निवडणुकांमधील भाजपच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येत आहे. परंतु, पडद्यामागून भाजपाच्या निवडणुकांच्या ‘मिशन’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण ताकदीने बळ दिले होते. २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे स्वयंसेवकांनी ‘शत - प्रतिशत’ मतदानासाठी स्वयंसेवकांनी व्यापक मोहीम चालविली. याचाच परिणाम म्हणून विचारांनी भाजपचे समर्थन करणारे, मात्र एरवी मतदानासाठी न निघणारे मतदार बुथपर्यंत पोहोचले व भाजप उमेदवारांना कौल दिला.
सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला होता. तर २०१९मध्ये संघातर्फे मार्गदर्शकाची भूमिका घेण्यात आली. भाजपाचा उघडपणे प्रचार तर संघाने टाळला. मात्र, भाजपाच्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांकडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी मोहीमच राबविली.

निवडणुकांची घोषणा होण्याअगोदरच संघातर्फे मोहिमेचे नियोजन झाले होते. संघातर्फे तीनही राज्यांत प्रांतनिहाय बैठकी घेण्यात आल्या. अगदी शाखास्तरावरही मतदार संपर्काचा आराखडा तयार करण्यात आला. या मोहिमेमुळे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपाला मोठी मदत झाली. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते.

सरसंघचालकांच्या आवाहनानंतर वाढला प्रतिसाद

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात विजयादशमीच्या भाषणादरम्यान मतदानासंदर्भात आवाहन केले होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न होतील. मात्र, अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवत मतदानासाठी नागरिकांनी गेले पाहिजे, असे ते म्हणाले होते. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करावे, असे सूचक आवाहन त्यांनी केले होते. यानंतर स्वयंसेवकांनी आणखी सखोल नियोजन करत भाजपचे कुठेही नाव न घेता अदृश्य प्रचारावर भर दिला होता.

भाजपासाठी थेट आवाहन नाही, पण...

तीनही राज्यांत संघ स्वयंसेवक जनतेमध्ये जात होते. मात्र, प्रत्यक्ष भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता जनता व विशेषत: तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. देशाच्या प्रगतीसाठी चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे, तसेच मतदान करणे किती आवश्यक आहे व एका मतामुळे काय फरक पडू शकतो, इत्यादी मुद्द्यांवर भर देण्यात येत आला होता.

‘सोशल मीडिया’चा पुरेपूर वापर

संघाने या मोहिमेसाठी ‘सोशल मीडिया’चा अतिशय नियोजनपूर्वक वापर केला. केंद्रीय पातळीवरून येणारे संदेश काही मिनिटांत शाखा पातळीवर पोहोचावे, यासाठी व्यवस्था उभारण्यात आली होती. ‘फेसबुक’, ‘ट्वीटर’चाही मोठ्या प्रमाणावर वापर झाला.

Web Title: RSS contributed to BJP's victory, campaign was taken to increase voter turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.