नागपूरच्या अजनी येथील वाईन शॉपमधून ६ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 21:49 IST2017-11-27T21:44:08+5:302017-11-27T21:49:41+5:30
अजनीतील एका वाईन शॉपचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी ६ लाखांची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही धाडसी चोरी उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

नागपूरच्या अजनी येथील वाईन शॉपमधून ६ लाखांची रोकड लंपास
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अजनीतील एका वाईन शॉपचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी ६ लाखांची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही धाडसी चोरी उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
फिर्यादी मयूर मदन जयस्वाल (वय ३४) यांचे अजनीच्या रामेश्वरी चौकात किसनलाल वाईन शॉप आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी रविवारी रात्री १० च्या सुमारास ते बंद केले. शनिवार आणि रविवार असल्यामुळे दोन्ही दिवसांच्या व्यवहाराची ६ लाखांची रोकड त्यांनी घरी नेण्याऐवजी वाईन शॉपच्या काउंटरच्या ड्राव्हरमध्येच ठेवली. सोमवारी सकाळी ते वाईन शॉप उघडण्यासाठी आले असता त्यांना चॅनल गेटचे लॉक तुटलेले दिसले. चोरट्यांनी चॅनल गेट तोडल्यानंतर शटर उचकवून आत प्रवेश केला आणि ड्रॉव्हरमधील ६ लाखांची रोकड लंपास केल्याचे उघड झाले. या धाडसी चोरीची माहिती कळताच परिसरात खळबळ उडाली. अजनी पोलीस पोहचण्यापूर्वीच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकासह पोहचलेल्या अजनी पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून चोरट्यांचा काही सुगावा मिळाला नाही. अजनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून चोरट्यांना शोधण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत. सहा लाखांची रोकड लंपास करणा-या चोरट्यांनी शॉपमधील महागड्या दारूच्या बाटल्याही लंपास केल्याचे समजते. मात्र, पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळू शकला नाही.