ऑनलाईन रक्कम लंपास करणाऱ्या ठगबाजाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:54 AM2018-12-19T10:54:12+5:302018-12-19T10:56:38+5:30

डेबिट, क्रेडिट कार्ड रिन्यूव्हल करण्याच्या नावाखाली कार्ड तसेच बँक खात्याची माहिती घेऊन अनेकांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या झारखंडमधील ठगजबाजाचा शोध लावण्यात अंबाझरी पोलिसांनी यश मिळवले.

The robbers of online money are arrested in Nagpur | ऑनलाईन रक्कम लंपास करणाऱ्या ठगबाजाचा छडा

ऑनलाईन रक्कम लंपास करणाऱ्या ठगबाजाचा छडा

Next
ठळक मुद्देकोलकाता येथील साथीदार गजाआड झारखंडमधील सूत्रधार फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेबिट, क्रेडिट कार्ड रिन्यूव्हल करण्याच्या नावाखाली कार्ड तसेच बँक खात्याची माहिती घेऊन अनेकांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या झारखंडमधील ठगजबाजाचा शोध लावण्यात अंबाझरी पोलिसांनी यश मिळवले. या ठगबाजाकडून कमिशन घेऊन त्याला आपल्या नातेवाईकांचे बँक खाते उपलब्ध करून देणारे आरोपी प्रदीपकुमार मंडल (वय २२) आणि महावीर मंडल (वय २३) या दोघांना पोलिसांनी अटक केली. मुख्य सूत्रधार टाटानगर (झारखंड) येथे दडून बसला असून, त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस पथक लवकरच तिकडे रवाना होणार आहे.
बँकेचा अधिकारी बोलतो, असे सांगून ‘तुमचे डेबिट, क्रेडिट कार्ड जुने झाले. ते रिन्यूव्हल करायचे आहे,तातडीने माहिती सांगा अन्यथा तुमचे कार्ड ब्लॉक करण्यात येईल, अशी धमकी दिली जाते. कार्ड ब्लॉक झाल्यास आर्थिक व्यवहारात अडचण येईल, असा विचार करून घाईगडबडीत फोन उचलणारी व्यक्ती आपली माहिती पलिकडून बोलणाऱ्या कथित बँक अधिकाऱ्याला देते. ही माहिती दिल्याच्या काही क्षणानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचा मेसेज येतो. तेव्हा कुठे आपण फसवलो गेलो, याची कल्पना संबंधित व्यक्तीला येते.
अशा प्रकारे फोन करून फसवणूक करणाऱ्या ठगबाजाची टोळी दिल्ली, नोएडा, झारखंडसह विविध राज्यात सक्रिय आहे. ४ डिसेंबरला भारतीय वनसेवेचे अधिकारी डॉ. श्रवण श्रीवास्तव यांनाही असाच फोन आला होता. श्रीवास्तव यांनी ठगबाजाला डेबिट कार्डची माहिती दिल्याच्या काही वेळेनंतर त्यांच्या खात्यातून दीड लाखांची रक्कम काढल्याचा मेसेज आला होता. त्यामुळे डॉ. श्रीवास्तव यांनी अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
ठाणेदार भीमराव खंदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या बँक खात्यातून ही रक्कम काढली ते बँक खाते कोलकाता जवळच्या आसनसोल येथील एका व्यक्तीचे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्यामुळे अंबाझरीच्या पोलीस पथकाने कोलकाता येथे जाऊन संबंधित खातेधारकाची चौकशी केली. सदर खातेधारकांनी प्रदीपकुमार आणि महावीर मंडलची नावे सांगितली. ते आसनसोल येथे असल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यामुळे रविवारी पोलिसांनी या दोघांना अटक केली.

Web Title: The robbers of online money are arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.