नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:56 PM2018-04-30T14:56:05+5:302018-04-30T14:56:16+5:30

जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला.

Rewral gram panchayat in Nagpur district's preserved 'social commitment' | नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’

नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’

Next
ठळक मुद्देगावातील १८ दिव्यांग बांधवांना केले अर्थसाहाय्य : करवसुलीचा निर्धारित टप्पा गाठल्याने राबविला नाविन्यपूर्ण

उपक्रमचक्रधर गभणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेवढा पैसा आला तेवढा कमीच असतो. तो एखाद्या व्यक्तीकडे असो संस्था-कंपनीकडे असो किंवा एखाद्या कार्यालयाकडे असो. पैसे हातचे सुटत नाही, हा मनुष्यजातच स्वभाव आहे. त्यामुळे खिशातून एक रुपया काढून दुसऱ्याला देताना खूप विचार केला जातो. दुसरीकडे समाजशील असलेला मनुष्यच त्याला अपवाद ठरतो. हजारो-लाखोंमध्ये एखादा मनुष्य दुसऱ्याच्या आर्थिक मदतीसाठी हात पुढे करतो. सर्वच ग्रामपंचायतींचेही तसेच काहीसे समीकरण आहे. जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा
ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाची सर्व स्तरातून दखल घेण्यात आली. तब्बल १८ दिव्यांग बांधवांना मदत करून ग्रामपंचायतने इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला.
रेवराल ग्रामपंचायतने यावर्षी करवसुलीचे निर्धारित लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी ९१ टक्क्यांपर्यंत करवसुली करण्यात ग्रामपंचायतला यश आले. करवसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनीही हातभार लावल्यानेच ही उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने करवसुलीतील तब्बल ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग-अंध बांधवांना अर्थसाहाय्य म्हणून देण्याचे ठरविले. दिव्यांग बांधवांना औषधोपचार वा इतर आर्थिक बाबीसाठी तो खर्च करता येईल, असा विचार प्रशासनाने केला. त्यानुसार ग्रामपंचायतने याबाबत सभा घेऊन प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने पारित केला.
ठरल्यानुसार गावातील १८ गरीब, गरजू, दिव्यांग बांधवांची यादी तयार करण्यात आली. त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले. त्या सर्वांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले आणि सर्वांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाने दिव्यांग बांधवांनीही ग्रामपंचायतचे आभार मानले. या कार्यक्रमाला सरपंच चिंतामण मदनकर, उपसरपंच महेंद्र बोरघरे, ग्रामविकास अधिकारी सी. एस. बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील मस्के, रोशन मेश्राम, सुनीता गाढवे, अनिता मोहनकर, रेखा लोणकर, माला सोनेकर, छाया चुटे आदी उपस्थित होते.
यांना केले अर्थसाहाय्य
करवसुलीतील ३ टक्के निधीतून एकूण १८ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये वॉर्ड क्र. १ मधील सुधाकर बिल्लारे, माया आस्वले, रामचंद्र वानखेडे, ईश्वर मेश्राम, बालचंद मस्के, पपिता राऊत, वॉर्ड क्र. २ मधील राहुल मदनकर, प्रभाकर मदनकर, वॉर्ड क्र. ३ मधील टेकचंद लोणकर, बलदेव श्रावणकर, जनार्दन सरोदे, मनोज नेवारे, वॉर्ड क्र. ४ मधील अमर सूर्यवंशी, शोभाराम मते, रामा हरकंडे, गौरव मुळे, आयुष पटले, सुखदेव खांडेकर यांचा समावेश आहे. छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात आले.

Web Title: Rewral gram panchayat in Nagpur district's preserved 'social commitment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.