समाजातून जातीभेद दूर करा, जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय ?

By योगेश पांडे | Published: December 19, 2023 10:56 AM2023-12-19T10:56:52+5:302023-12-19T10:57:07+5:30

हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली.

Remove caste discrimination from the society, what is the need for caste-wise census? | समाजातून जातीभेद दूर करा, जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय ?

समाजातून जातीभेद दूर करा, जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय ?

योगेश पांडे

नागपूर : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. पुढील वर्षी देश व राज्यात नाहीत निवडणूक असल्याने संघातर्फे काय मार्गदर्शन करण्यात येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु सर्वांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यावरच भर राहिला. संघातर्फे जास्त ‘बौद्धिक’ टाळण्यात आले असले तरी जनतेसोबत नाळ जोडून ठेवा आणि समाजातील जातीभेद दूर करा, असे सांगत हवा तो संदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय असा सवाल संघातर्फे उपस्थित करण्यात आला.

सकाळच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश होता. यावेळी सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली. संघातर्फे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, कार्यवाह अतुल मोघे, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जातीव्यवस्था कालबाह्य आहे. जर जनगणनेमुळे विषमता व तेढ वाढत असेल तर त्याची गरज नाही. समाजात सामाजिक समरसता वाढली पाहिजे यावरच भर द्यायला हवा असे श्रीधर गाडगे यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. जिल्ह्याजिल्ह्यात आमदारांनी जनतेसोबत समन्वय जास्तीत जास्त कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे. नागरी कर्तव्य, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी या सुत्रांसाठी लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे, असेदेखील यावेळी श्रीधर गाडगे यांनी सांगितले.भाजप आमदारांना मंथन या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या.

- काही आमदारांची दांडी

रेशीमबागेत सर्व भाजप आमदारांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती.मात्र विधानसभा व विधान परिषदेतील काही आमदार  अनुपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील पोहोचू शकले नाही.

- मंत्र्यांचा ‘दक्ष’ पवित्रा

एरवी मंत्री तसेच नितेश राणे यांच्यासारखे सदस्य प्रसारमाध्यमांना सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र संघभूमीत त्यांनी ‘दक्ष’ पवित्रा घेतला. येथे बोलणे योग्य होणार नाही व ती येथील परंपरा नाही, असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

- शिवसेनेचे आमदार उपस्थित

यावेळी शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे गट) देखील उपस्थित होते. त्यात मंत्री दीपक केसरकर, मनीषा कायंदे, भरत गोगावले, आशिष जैस्वाल यांचा समावेश होता.

Web Title: Remove caste discrimination from the society, what is the need for caste-wise census?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.