चार वर्षांत १८ ‘ब्रेन डेड’दात्यांची नोंद

By admin | Published: June 20, 2017 02:12 AM2017-06-20T02:12:14+5:302017-06-20T02:12:14+5:30

उपराजधानीतील शासकीय व खासगी रुग्णालये मिळून आठवड्यातून तीन ते पाच ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णांची नोंद होते.

Record of 18 'brain dead' donors in four years | चार वर्षांत १८ ‘ब्रेन डेड’दात्यांची नोंद

चार वर्षांत १८ ‘ब्रेन डेड’दात्यांची नोंद

Next

अध्यादेशानंतरही इस्पितळांकडून उदासिनता : जनजागृती व सोर्इंची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील शासकीय व खासगी रुग्णालये मिळून आठवड्यातून तीन ते पाच ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णांची नोंद होते. महिन्याकाठी हा आकडा १२ ते १६वर जाऊ शकतो. मात्र, काही जण ही माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवतात. परिणामी, विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (डीटीसीसी) सुरू होऊन चार वर्षे होत असताना केवळ १८ ‘ब्रेन डेड’ दात्याचे अवयव प्रत्यारोपण होऊ शकले आहे.
एक ‘ब्रेन डेड’ व्यक्ती मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाचा झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा आदी दान करून १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकतात. परंतु उपराजधानीत अवयव दानाला घेऊन रुग्णालयांकडून व रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अवयव दानाची चळवळ केवळ अजूनही बाल्यावस्थेतच आहे.
१९९४ च्या ‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट’ कायद्याला घेऊन १३ सप्टेंबर २०१२ रोजी नव्या नियमांचा अध्यादेश जारी करण्यात आले. यात ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची माहिती ‘डीटीसीसी’ला देणे बंधनकारक केले. असे न केल्यास तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली. याशिवाय नव्या आदेशात इस्पितळातील २५ खाटांचा नियम शिथिल केला. यामुळे ज्या इस्पितळामध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्रे नाही, परंतु त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया कक्ष आहे त्यांना ‘नॉन आॅर्गन ट्रान्सप्लांट सेंटर’ (एनओटीसी) म्हणून मान्यता देण्यात आली. शहरातील आठ-दहा रुग्णालयांनी यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्यापही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अनेक रुग्णालयाला परवानगी दिली नसल्याची माहिती आहे. यामुळे ‘ब्रेन डेड’ रुग्ण असलातरी त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून वेळीच अवयव काढणे अद्यापही कठीणच आहे.

या वर्षी सहा ‘ब्रेन डेड’दात्यांकडून अवयव दान
शहरामध्ये पाच रुग्णालयांना अवयव प्रत्यारोपणाला मंजुरी आहे. ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयव दानासाठी समुपदेशन करता यावे, यासाठी या इस्पितळात प्रशिक्षित समुपदेशक नियुक्तही करण्यात आले आहे. मात्र शासकीयसह इतर खासगी रुग्णालयांकडून ‘ब्रेन डेड’ रुग्णाची फार कमी माहिती दिली जाते. यामुळे २०१३ मध्ये एक, २०१४ मध्ये दोन, २०१५ मध्ये चार, २०१६ मध्ये सहा तर २०१७मध्ये आतापर्यंत सहा ब्रेन डेडदात्यांकडून अवयव दान होऊ शकले आहे.

व्यापक जनजागृतीने चित्र पालटेल
२०१३ मध्ये वर्षभरात केवळ एका ‘ब्रेन डेड’दात्याची नोंद होती. यात हळूहळू वाढ होऊन २०१७ मध्ये आतापर्यंत दर महिन्याला ‘ब्रेन डेड’ दात्याची नोंद होत आहे. हे सकारात्मक चित्र आहे. मात्र, यात वाढ होण्याची गरज आहे. अवयव दानाची व्यापक जनजागृती झाल्यास हे चित्र पालटेल. ‘ब्रेन डेड’ रुग्णांची जास्तीत जास्त नोंद होण्यासाठी लवकरच अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आहे.
-डॉ. रवी वानखेडे
सचिव, विभागीय
प्रत्यारोपण समन्वय समिती

Web Title: Record of 18 'brain dead' donors in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.