वासनिकांना राऊत यांचे आव्हान, मुत्तेमवारानाही स्पर्धक वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:58 PM2019-01-16T23:58:24+5:302019-01-17T00:02:07+5:30

रामटेक लोकसभेच्या जागेवर अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा करून एकप्रकारे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना पक्षांतर्गत आव्हान दिले आहे तर नागपूर लोकसभेतही माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांची डोकेदुखी वाढली आहे. नागपुरात तब्बल सहा उमेदवारांनी तिकीट मागितले आहे.

Raut challenged to Wasnik , Muttemwar's contestants also increased | वासनिकांना राऊत यांचे आव्हान, मुत्तेमवारानाही स्पर्धक वाढले

वासनिकांना राऊत यांचे आव्हान, मुत्तेमवारानाही स्पर्धक वाढले

Next
ठळक मुद्देनागपूरसाठी सहा तर रामटेकसाठी तीन अर्ज : काँग्रेस कमिटी प्रदेशकडे देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभेच्या जागेवर अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा करून एकप्रकारे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना पक्षांतर्गत आव्हान दिले आहे तर नागपूर लोकसभेतही माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांची डोकेदुखी वाढली आहे. नागपुरात तब्बल सहा उमेदवारांनी तिकीट मागितले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार यावेळी पहिल्यांदाच शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीतर्फे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. बुधवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मुकुल वासनिक हे रामटेक व मुत्तेमवार हे नागपूर लोकसभेचे गेल्यावेळचे उमेदवार असल्यामुळे त्यांना अर्ज करण्यातून सूट देण्यात आलीहोती. रामटेकसाठी नितीन राऊत यांच्यासह महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी जी.डी. जांभुळकर व महादेव नगराळे या तिघांचे अर्ज आले. राऊत यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसकडे अर्ज करून एकप्रकारे वासनिकांची खासदारकीची जागा मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. राऊत यांना लढायचे नसते तर त्यांनी अर्जच केला नसता. ते पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे त्यांना आता देशाच्या राजकारणात सक्रिय व्हायचे आहे, असा दावा राऊत यांचे समर्थक करीत आहे. राऊत यांच्या उमेदवारी अर्जामुळे वासनिक समर्थकांमध्ये मात्र धुसफूससुरू झाली असून जिल्ह्यातही काँग्रेस दोन गटात विभागण्याची चिन्हे आहेत.
नागपूर लोकसभेसाठी मुत्तेमवार स्वत: इच्छुक आहेत. दिल्लीत काही गडबड झाली तर आपल्याच गटाकडे उमेदवारी कशी ठेवता येईल, याचेही प्रयत्न सुरू आहेत. असे असताना तब्बल सहा जणांनी शहर काँग्रेसकडे अर्ज करून उमेदवारीवर दावा केला आहे. मुत्तेमवार विरोधी गटाचे माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आ. अशोक धवड यांनी उमेदवारी अर्ज सादर करीत एकप्रकारे मुत्तेमवार विरोध कायम ठेवला आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आ. आशिष देशमुख यांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतला होता. माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक यांच्यासह माजी शहर अध्यक्ष शेख हुसैनही मैदानात उतरले आहेत. ओबीसी समाजाची मोट बांधून वाटचाल करीत असलेले डॉ. बबनराव तायवाडे यांनीही अर्ज सादर करीत पक्षापुढे पेच निर्माण केला आहे तर काहींचा थेट दिल्लीतून उमेदवार निश्चित होईल, असा दावा आहे. विशेष म्हणजे शहर अध्यक्ष विकास ठाकरे व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांची नावे समर्थकांकडून पुढे केली जात आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्यामुळे नागपूरच्या उमेदवारीसाठी जोरात रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा निवड मंडळाची आज बैठक
 लोकसभेच्या उमेदवारीसाठी आलेल्या अर्जांवर आज, गुरुवारी जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. देवडिया काँग्रेस भवनात नागपूर लोकसभेसाठी तर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात रामटेकसाठी बैठक होईल. बैठकीनंतर शहर व जिल्हा अध्यक्ष आपला अहवाल १८ जानेवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुआ यांनी बोलाविलेल्या बैठकीत प्रदेश काँग्रेसकडे सादर करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेश काँग्रेस २५ ते ३० जानेवारीदरम्यान अ.भा. काँग्रेस समितीकडे राज्याचा अहवाल सादर करणार आहे.

 

Web Title: Raut challenged to Wasnik , Muttemwar's contestants also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.