Rage of Railway employees with dead bodies | मृतदेह घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांचा संताप
मृतदेह घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांचा संताप

ठळक मुद्दे‘डीआरएम’कार्यालयात तणाव : अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या ट्रॅक मेन्टेनरने आत्महत्या केल्याची घटना घडली. ५ मार्चला आत्महत्या केल्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवलेला मृतदेह घेऊन संतप्त रेल्वे कर्मचारी ‘डीआरएम’ कार्यालयात पोहोचले. त्यांनी जोरदार नारेबाजी करीत दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली.
मृतदेह घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पारस किसनलाल मीना (३५) हा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील हिंगणघाटच्या चित्तोडा युनिट नंबर १ मध्ये ट्रॅक मेन्टेनर पदावर कार्यरत होता. पारसला वरिष्ठ विभाग अभियंता आर. के. रंजन, बंडू तेलंग हे नाहक त्रास देत होते. १ मार्चला ड्युटी संपल्यानंतर त्यांनी पारसकडून अधिक वेळ काम करून घेतले. पारसने ३ ते ५ मार्चपर्यंत सुटी घेऊनही त्यास गैरहजर असल्याचे दाखविले. त्याची तक्रार पारसने वरिष्ठ अधिकारी (एडीईएन) यांच्याकडे केली. परंतु त्याचे कुणीच न ऐकल्याने अखेर पारसने आपल्या घरी फाशी घेतली. आत्महत्येपूर्वी पारसने एक चिठ्ठी लिहिली. त्यात अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला. पारसचे मोठे भाऊ चंदालाल मीना यांनी सेवाग्राम पोलिसांना पारसने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून त्यात अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. गुरुवारी सायंकाळी मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेने ‘डीआरएम’ कार्यालय परिसरात आणला. तेथे त्यांनी दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी जोरदार नारेबाजी केल्यामुळे बराच वेळ ‘डीआरएम’ कार्यालय परिसरात तणाव होता. संतप्त कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरही प्रश्नांचा भडीमार करून मृताच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली.
अधिकाऱ्यांचे निलंबन : ‘डीआरएम’
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या प्रकरणात संबंधित अधिकारी आर. के. रंजन, बंडू तेलंग यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मृताचे कुटुंबीय मृतदेह राजस्थानला घेऊन जात असल्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकरीबाबत नियमानुसार जे शक्य होईल ती मदत करण्यात येईल.’
दहा लाख भरपाईची मागणी
‘डीआरएम’ कार्यालयाच्या परिसरात नारेबाजी करीत असलेल्या संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्याची तसेच मृताच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये भरपाई आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांना केली. गुप्ता यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन रेल्वे कर्मचाऱ्यांना दिले.


Web Title: Rage of Railway employees with dead bodies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.