नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:10 AM2018-01-02T11:10:44+5:302018-01-02T11:12:20+5:30

जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला.

Private accountant murdered in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून

नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून

Next
ठळक मुद्देमृतदेह पोत्यात बांधलेला माथनी शिवारातील कन्हान नदीत गवसला

आॅनलाईन लोकमत
नागपूर: जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह राजू गिरधारीलाल नारंग (५४, रा. देवकृपा हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर) यांचा असल्याचे तसेच ते व्यापाऱ्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ते बुधवारपासून (दि. २७) बेपत्ता होते. त्यांचा खून करण्यात आला असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून या भागात फेकला असल्याची माहिती तपास अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली.
राजू नारंग यांचा मृतदेह पोत्यात भरला असून, तो पिवळ्या रंगाच्या साडी आणि मळकट चादरीत गुंडाळलेला होता.
त्यांचा आधी साडीने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह पोत्यात भरून तो माथनी शिवारातील पुलावरून खाली फेकला असावा, असा अंदाज प्रमोद मडामे यांनी व्यक्त केला. त्यांच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटल्याचेही पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह राजू नारंग यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले.
ते गेल्या १८ वर्षांपासून नागपूर शहरातील व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करायचे. ते शांत स्वभावाचे असून, त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने त्यांच्या रामदासपेठ (नागपूर) येथील कार्यालयात जायला निघाले. मात्र, १.३० वाजेपर्यंत ते कार्यालयात न पोहोचल्याने त्यांचे मालक वाधवानी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहितीही कुटुंबीयांनी दिली.
ते कार्यालयात पोहोचले नसल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी लकडगंज (नागपूर) पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तेव्हापासून पोलीसही त्यांचा शोध घेत होते.

मोबाईल लोकेशनची तपासणी
तक्रार दाखल होताच लकडगंज पोलिसांनी राजू नारंग यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यांचा मोबाईल बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कळमना व डिप्टी सिग्नल भागात तर रात्री लोकमत चौकात कार्यरत असल्याचे आढळून आले. रात्री ८ नंतर त्यांच्या फोनचे लोकेशन वाडी येथे मिळाले. त्यानंतर त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत होता. त्यांच्याकडे बुधवारी २५ ते ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नव्हती, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अपहरणात परिचित व्यक्तीचा सहभाग असून, अपहरणासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

साडी व चादर महत्त्वाचे पुरावे
राजू नारंग यांचा मृतदेह साडी व चादरीत गुंडाळलेला होता. त्यांच्या गळ्याला साडी गुंडाळलेली होती. मृतदेह भरण्यासाठी वापरण्यात आलेले पोते हे मिरचीचे होते. त्यामुळे साडी, चादर व पोते या तीन वस्तू तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जाते.

Web Title: Private accountant murdered in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा