नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीसांच्या जल्लोषाची चित्रफीत व्हायरल; कुटुंबियांना धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:23 AM2017-12-09T10:23:22+5:302017-12-09T10:25:39+5:30

सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

police shooting of Naxalites video clip viral; Risky for families? | नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीसांच्या जल्लोषाची चित्रफीत व्हायरल; कुटुंबियांना धोका?

नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीसांच्या जल्लोषाची चित्रफीत व्हायरल; कुटुंबियांना धोका?

Next
ठळक मुद्देचित्रफीत पोहचू शकते नक्षल्यांपर्यंतधोक्याची घंटा

नरेश डोंगरे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलग्रस्त भागातील पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची ओळख गोपनीय ठेवणे आवश्यक ठरते. मात्र, जल्लोषाच्या नादात पोलीस विभागाकडून ही गंभीर चूक झाली आहे. पोलिसांच्या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे. तो सहजपणे नक्षलवादी संघटना आणि समाजातील विविध क्षेत्रात वावरणाऱ्या नक्षलवादी समर्थकांपर्यंतही पोहचला आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून नक्षलवाद्यांसोबत दोन हात करणारे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ पातळीवरून गोपनीयतेच्या खास सूचना दिल्या जात असताना त्या दुर्लक्षित झाल्याने पोलिसांचे फोटो (व्हिडीओ) नक्षलवाद्यांपर्यंत पोहचल्याने सुरक्षा यंत्रणांमध्येही चर्चेला आले आहे.
नक्षलग्रस्त भागात कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची (खास करून कर्मचाऱ्यांची) ओळख सार्वत्रिक होऊ नये, यासाठी खास काळजी घेण्याचे अलिखित आदेश आहेत. कारण नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक २४ तास जंगलात नसतात. अनेकदा ते शहरात, गावात गर्दीच्या ठिकाणी सहज वावरतात. आवश्यक चीजवस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात, दुकानात सर्वसामान्य माणसासारखे येतात, जातात. अनेकदा ते पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी, ओळख काढण्यासाठी त्यांच्या मागावर असतात. कारण पोलीस आणि पोलिसांच्या खबऱ्यांना नक्षलवादी सर्वात मोठे शत्रू मानतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवून त्यांचा घात करण्यासाठी, ईजा पोहचवण्यासाठी ते २४ तास संधीची वाट बघत असतात.
भरबाजारात पोलीस आणि पोलिसांच्या खबऱ्यांच्या हत्या करण्याच्या अनेक घटना गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी घडल्यादेखील आहेत. त्यामुळे पोलिसांची नक्षल्यांना ओळख पटू नये म्हणून, खास काळजी घेतली जाते. त्याचमुळे पोलीस दलात कार्यरत कर्मचारी, अधिकारी जेव्हा जंगलात नक्षल्यांविरुद्ध आॅपरेशन करायला निघतात, तेव्हाच ते गणवेशात (डांगरी घालून) असतात. इतर वेळी कर्तव्यावर असूनदेखील साध्याच कपड्यात सर्वसामान्य माणसासारखे वावरण्याची, दाढी-मिशी वाढलेल्या अवस्थेत फिरण्याची पोलिसांना, जवानांना मुभा असते. बाहेर वावरताना हा पोलीस आहे, हे लक्षात येऊ नये आणि त्यांना धोका होऊ नये, हाच त्यामागे उद्देश असतो. बुधवारी गडचिरोलीतील खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच या उद्देशाला हरताळ फासला आहे. आनंदाने बेभान होऊन आत्मघात करावा, तसा प्रकार केला आहे. जंगलात सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या आनंदाने बेभान झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोलीत आणल्यानंतर जल्लोष साजरा केला.


धोक्याची घंटा
नक्षलवाद्यांना टिपणाऱ्या सी-६०, पोलीस आणि नक्षलविरोधी अभियानातील अधिकारी, जवान आणि पोलीस असे सर्व मैदानात एकत्र झाले. त्यांना महिलांनी विजयाचा टिळा लावून गुलाबपुष्प दिले. त्यांचे स्वागत, अभिनंदन करण्यात आले. संदल (बॅण्ड) वाजविण्यात आला. बजरंगबली की जय, तुकाराम बाबा की जय, अशी घोषणाबाजीही करण्यात आली. येथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, खरा धोका पुढे आहे.
या सर्व आनंदोत्सवाचा, बेभान जल्लोषाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. हा व्हिडीओ गडचिरोली-गोंदियातील गावागावात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला. क्षणात तो (छत्तीसगड)सह अनेक प्रांतात पोहचला. मध्यप्रदेश, झारखंड आणि अबुझमाडकडच्या नक्षल्यांकडे आणि त्यांच्या हजारो समर्थकांकडेही हा व्हिडीओ पोहचल्याची भीती सूत्रांकडून व्यक्त होत आहे.


डीजीपी म्हणतात, चौकशी करतो
विशेष म्हणजे, पोलीस महासंचालक (डीजीपी) सतीश माथुर यांनी गुरुवारी सायंकाळी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गडचिरोली एन्काऊंटरसंबंधाने ते भरभरून बोलले. नक्षलविरोधी रणनीतीवर बोलताना त्यांनी गोपनीयता आणि सुरक्षेचा मुद्दा पुढे करून अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले. लोकमतकडे हा व्हिडीओ आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रस्तुत प्रतिनिधीने डीजीपी माथुर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला हा प्रकार माहीत नाही. जर तसे झाले असेल तर आपण त्याची चौकशी करू, असे माथुर म्हणाले.

पोलिसांसोबत कुटुंबीयांच्याही सुरक्षेचा प्रश्न
पोलिसांनी मोठी कारवाई केल्यानंतर सूडाने पेटलेले नक्षलवादी आक्रमक होऊन घातपाती कृत्य घडवितात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या व्हिडीओने वेगळाच धोका निर्माण केला आहे. त्या व्हिडीओत नक्षल्यांविरुद्ध आॅपरेशन यशस्वी करणारे पोलीस, जवान आणि अधिकारी-कर्मचारी, त्यांना समर्थन देणारे शेकडो पोलीस समर्थक, महिला कर्मचारी दिसत आहेत. या व्हिडीओने संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठीही मोठा धोका निर्माण केला आहे. या सर्वांचीच तोंडओळख जगजाहीर झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: police shooting of Naxalites video clip viral; Risky for families?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.