उपराजधानीत पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया झटपट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 09:59 PM2018-02-06T21:59:26+5:302018-02-06T22:00:48+5:30

पासपोर्ट मिळविण्यापूर्वीची प्रक्रिया पार पाडताना अर्जदाराला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्याची सहज सोप्या पद्धतीने पडताळणी व्हावी म्हणून अवघ्या सहा दिवसात पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणारे नागपूर पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकाचे पोलीस दल ठरले आहे.

Passport Verification Process Immediate in sub-capital ! | उपराजधानीत पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया झटपट !

उपराजधानीत पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया झटपट !

Next
ठळक मुद्देचार महिन्यांपूर्वी एम पासपोर्ट अ‍ॅप कार्यान्वित : राज्यात नागपूर पोलीस अग्रस्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पासपोर्ट मिळविण्यापूर्वीची प्रक्रिया पार पाडताना अर्जदाराला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्याची सहज सोप्या पद्धतीने पडताळणी व्हावी म्हणून अवघ्या सहा दिवसात पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणारे नागपूर पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकाचे पोलीस दल ठरले आहे.
राज्य पोलीस दलाने एम पासपोर्ट पोलीस अ‍ॅप कार्यान्वित करून काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणी तातडीने पासपोर्ट मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहर पोलीस दलाने मात्र गेल्या चार महिन्यांपूर्वीच नागपुरात ही प्रक्रिया सुरू करून पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्याला अवघ्या सहा दिवसात पासपोर्ट मिळावा म्हणून प्रयत्न चालविले आहेत.
पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा अर्ज करून पासपोर्ट हातात येईपर्यंत अर्जदाराला यापूर्वी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. खास करून अर्जदाराच्या पोलीस पडताळणीची प्रक्रिया क्लिष्ट, वेळखाऊ आणि मनस्ताप देणारी आहे. ती सहजसोपी, सुटसुटीत आणि कमीतकमी वेळेची व्हावी म्हणून राज्य पोलीस दलाने नुकतेच एम पासपोर्ट पोलीस अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून पासपोर्टची मागणी करणाऱ्याची पडताळणी प्रक्रिया गतिशील आणि पारदर्शी व्हावी म्हणून राज्य पोलीस दलाने प्रत्येक मुख्यालयी आवश्यक त्या साधनसुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ देण्याचेही प्रयत्न चालविले आहे. आजघडीला ही प्रणाली मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली असून, येत्या सहा महिन्यात राज्यभरात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कसलीही अडचण येऊ नये म्हणून पोलीस महासंचालकांनी राज्यात एमअ‍ॅप्सच्या अंमलबजावणीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभातकुमार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, या सर्वांवर नागपूर पोलिसांनी यापूर्वीच मात केली आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी चार महिन्यांपूर्वीच एमअ‍ॅप्स कार्यान्वित केला. येथे पासपोर्टची मागणी करणाऱ्याला   मनस्ताप सहन करावा लागू नये म्हणून त्यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.
दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले. त्यांच्याजवळ टॅब असल्यामुळे जागच्याजागी एकाच वेळी संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता आणि गुन्हेगारी अभिलेखाची आॅनलाईन पडताळणी हे कर्मचारी करून घेतात. त्यामुळे नागपूरकरांसाठी शहर पोलिसांचा हा उपक्रम प्रशंसेचा विषय ठरला होता.
विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी नागपुरात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलीस दलाला स्मार्ट
करण्यासंबंधीच्या अनेक उपक्रमांची माहिती दिली होती. पोलीस दलाला विविध सोयीसुविधा जाहीर करतानाच पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया सहज सोपी करावी, असे आवाहनवजा सूचना केली होती. गुन्हेगारांचा अहवाल सीसीटीएनएसमुळे एका क्लीकवर उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त दहा दिवसात पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया पार पडावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी त्याला प्रतिसाद देत १० नव्हे तर अवघ्या ६ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याची किमया साधली.
उगाच त्रास होऊ नये : पोलीस आयुक्त
हा कागद आणा, तो कागद आणा, असे म्हणून उगाच अर्जदाराला ताटकळत ठेवू नये, त्याची पडताळणी तातडीने व्हावी, असा आपला उद्देश होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात झटपट पडताळणी प्रक्रियेची सुरुवात करून दिली. त्याचा चांगला परिणाम समोर आला. गेल्या चार महिन्यात हजारावर पासपोर्ट अर्जदारांची नागपुरातील विविध पोलीस ठाण्यात पडताळणी झाली आहे. पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता आणि त्याच्याविरुद्धचा गुन्हेगारी अभिलेख तातडीने तपासला जातो. टॅबमध्येच त्याचे छायाचित्र काढून संबंधित व्यक्तीचा अहवाल पासपोर्ट अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.

Web Title: Passport Verification Process Immediate in sub-capital !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.