संतापजनक! महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; कुऱ्हाडीचा धाक दाखवत केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:19 AM2023-10-06T11:19:41+5:302023-10-06T11:39:32+5:30

फोनवर बोलणाऱ्या बहिणीच्या तत्परतेने वाचला जीव

Outrageous! A college going student was assaulted, threatened with an axe | संतापजनक! महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; कुऱ्हाडीचा धाक दाखवत केला हल्ला

संतापजनक! महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; कुऱ्हाडीचा धाक दाखवत केला हल्ला

googlenewsNext

नागपूर : बाहेरगावाहून आल्यानंतर पायीच महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर एका आरोपीने कुऱ्हाडीचा धाक दाखवत अत्याचार केला. विद्यार्थिनी त्यावेळी बहिणीशी फोनवर बोलत होती. हल्ला झाल्यानंतर बहिणीने तत्काळ महाविद्यालय व कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. महाविद्यालयातील कर्मचारी तिचा शोध घेत घटनास्थळी पोहोचले व आरोपी तेथून फरार झाला. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे.

संबंधित १९ वर्षीय मुलगी वर्धा मार्गाजवळ असलेल्या एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती मूळची नागपूरबाहेरील रहिवासी असून बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास ती बसने नागपुरात आली. मुख्य मार्गाने वेळ लागेल म्हणून ती पायवाटेतून महाविद्यालयाकडे निघाली. त्यावेळी ती तिच्या बाहेरगावी राहणाऱ्या बहिणीशी फोनवर बोलतदेखील होती.

महाविद्यालयापासून काही अंतरावरच असताना अचानक निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक काळा तरुण समोर आला व त्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवत तिला अडवले. त्याने तिला शिवीगाळ करत अक्षरश: घासत नेले व कुऱ्हाडीच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केला. तिच्या महाविद्यालयात हा प्रकार कळल्यावर सुरक्षारक्षक धावत तिचा शोध घेत आले. त्यांना पाहताच आरोपी फरार झाला. त्यानंतर महाविद्यालयाने हिंगणा पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. तिच्या पालकांनादेखील कळविण्यात आले. महाविद्यालयातील स्टाफनेच तिला जवळच्या खासगी इस्पितळात दाखल केले. नातेवाईक आल्यानंतर तिला मेडिकल इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तिच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून युद्धपातळीवर त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त अनुराग जैन यांनी दिली.

कर्मचाऱ्यांनी घेतली धाव म्हणून लागला शोध

आरोपीने ज्यावेळी विद्यार्थिनीला अडवले, त्यावेळी ती बहिणीशी फोनवर बोलत होती. फोन खाली पडल्यावर विद्यार्थिनी वाचवा वाचवा म्हणून ओरडली होती. तिच्या बहिणीने अगोदर एका नातेवाईकाला फोन केला व त्यानंतर तिने गुगलवरून महाविद्यालयाचा क्रमांक शोधून संपर्क केला. तुमच्या महाविद्यालयातील संबंधित मुलगी धोक्यात असून ती महाविद्यालयाजवळच कुठेतरी असल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेऊन तिचा शोध घेतला. जर वेळेवर बहिणीने महाविद्यालयात संपर्क केला नसता तर आरोपीने तिच्यावर जीवघेणे वार करायलादेखील मागेपुढे पाहिले नसते.

पोलिसांचे धाबे दणाणले, वरिष्ठ पोलिस घटनास्थळी

भरदिवसा असा प्रकार घडल्याने पोलिस अधिकारीदेखील हादरले. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. गुरुवारी दिवसभर परिसरात आरोपीचा शोध घेण्यात आला. मात्र रात्रीपर्यंत आरोपी सापडला नव्हता. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्यावर वैद्यकीय तपासणी व इतर प्रक्रियानंतर पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकारात संभोग झाला नसला तरी कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीवर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Outrageous! A college going student was assaulted, threatened with an axe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.