बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 10:51 PM2018-01-03T22:51:23+5:302018-01-03T22:56:15+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.

Order to newly prosecute the rape case | बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश

बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश

Next
ठळक मुद्देहायकोर्ट : नागपूरनजीकच्या सावनेर तालुक्यातील घटना

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.
राहुल रामू जनबंधू (२०) असे आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायालयाने खटला चालविताना आरोपीला दोषारोप समजावून सांगितले नाही. त्यामुळे आरोपीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले, ही बाब आरोपीचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी मांडलेल्या मुद्यात तथ्य आढळून आल्यामुळे, उच्च न्यायालयाने हा खटला दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने चालविण्याचा व त्यावर तीन महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला. त्यासाठी प्रकरणाचा रेकॉर्ड विशेष न्यायालयाकडे पाठविण्यात आला. एवढेच नाही तर आरोपीला सशर्त जामीनही मंजूर करण्यात आला. आरोपी अडीच वर्षांपासून कारागृहात होता.
ही घटना ६ मे २०१५ रोजी खापरखेडा पोलिसांच्या हद्दीत घडली. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. ती पिपळा डाकबंगला येथे गुरे चारीत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी पोलीस तक्रार आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी विशेष न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलवरील अंतिम सुनावणीदरम्यान संबंधित त्रुटी उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या.

 

Web Title: Order to newly prosecute the rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.