संघविस्तारावर शुक्रवारपासून नागपुरात संघाचे मंथन, भाजप नेतृत्वफळीतील नेते राहणार उपस्थित 

By योगेश पांडे | Published: March 12, 2024 05:43 PM2024-03-12T17:43:07+5:302024-03-12T17:44:03+5:30

लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर प्रतिनिधी सभेला महत्त्व.

on union expansion union churning will be held in nagpur from friday leaders from bjp leadership will be present | संघविस्तारावर शुक्रवारपासून नागपुरात संघाचे मंथन, भाजप नेतृत्वफळीतील नेते राहणार उपस्थित 

संघविस्तारावर शुक्रवारपासून नागपुरात संघाचे मंथन, भाजप नेतृत्वफळीतील नेते राहणार उपस्थित 

योगेश पांडे, नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १५ ते १७ मार्चदरम्यान नागपुरात करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूकांच्या अगोदर ही सभा होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष राहणारच आहे. या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले आहे. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असताना संघविस्तारावर यात मंथन होणार असून लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा यावरदेखील चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, देशाच्या विविध भागांतून संघ प्रचारक व जेष्ठ स्वयंसेवक रेशीमबागमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.

संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. ही संघाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठी समिती असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्यअहवाल मांडतात. १५ ते १७ मार्चदरम्यान सभा होणार असली तरी अगोदर संघटनात्मक पातळीवर बैठकांना सुरुवात झाली आहे. यात केंद्रीय टोळी बैठक, कार्यकारी मंडळ बैठक, प्रांत प्रचारकांची बैठक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या सभेला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचार, विभाग प्रचारक यांच्यासह १ हजार ४०० प्रतिनिधी उपस्थित राहतील

केंद्राला देणार शाबासकीची थाप - संघाच्या अजेंड्यावरील राममंदिर, कलम ३७० हटविणे, सीएए लागू करणे हे मुद्दे पूर्ण झाल्यानंतर आता देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यासंदर्भात या सभेत मंथन होऊ शकते. या तीनही महत्त्वाच्या बाबी पूर्ण झाल्याबाबत संघाकडून केंद्र सरकारला शाबासकीची अधिकृत थाप देण्यात येण्याची शक्यता आहे. या तीन दिवसीत सभेदरम्यान समान नागरी कायद्याबाबत संघाचा आग्रह, सामाजिक समरसतेची मोहिम, केरळ-काश्मीरबाबतची संघाची दृष्टी, इत्यादी मुद्द्यांवर या सभेदरम्यान चर्चा होणार आहे. देशभरात एक लाख स्थानांवर शाखा सुरू करण्याचे लक्ष्य प्राप्त करण्याच्या नियोजनावरदेखील मंथन होईल.

सहसरकार्यवाहांमध्ये नवीन चेहरा कोण ?

नागपुरच्या सभेत सर्वसाधारणत: नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा होते. यंदा सहसरकार्यवाहांच्या यादीत नवीन नावाची भर पडू शकते. तसेच अखिल भारतीय पातळीवरील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीतदेखील बदल होण्याची शक्यता आहे. सरकार्यवाहांची निवड झाल्यानंतरच संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येते. नागपुरच्या सभेतच सरकार्यवाहांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. या पदासाठी आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची वेळ आलेली नाही.

सभेची तयारी जोरात - दरम्यान, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसंदर्भात यंदा संघ स्वयंसेवकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. महानगर विभागाकडे विविध व्यवस्थांची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृतिमंदीर परिसरातील तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. वाहतूक, निवास, भोजन व्यवस्था इत्यादींचे वाटप करण्यात आले असून स्थानिक स्वयंसेवक व पदाधिकारी यांच्याकडून बाहेरगावाहून आलेल्या पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.

Web Title: on union expansion union churning will be held in nagpur from friday leaders from bjp leadership will be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.