Old currency of 98 lakhs seized in Nagpur | नागपुरात चलनातून बाद झालेले ९८ लाख जप्त

ठळक मुद्देपिस्तूलही सापडलेयवतमाळच्या लॉन संचालकासह पाच गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळच्या एका कथित फायनान्सर आणि लॉन संचालकासह पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून चलनातून बाद करण्यात आलेल्या ९८ लाखांच्या नोटा तसेच पिस्तूल जप्त केले. आरोपींमध्ये चंद्रपूर तसेच छत्तीसगडमधीलही आरोपींचा समावेश आहे.
रहाटे कॉलनी परिसरात एक टोळी मोठ्या प्रमाणात रोकड अदलाबदल करण्याच्या तयारीत असल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून शनिवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून रहाटे कॉलनीतील उज्ज्वल अपार्टमेंट (प्लॉट २०२) जवळ छापा घातला. पोलिसांनी तेथे संतोष जयवंतराव कदम (वय ३६, रा. संभाजीनगर, यवतमाळ), राजेश देवीदास चांडक (वय २५, रा. इमामवाडा) दीप महानगू मार्शल (वय ३५, रा. अनंतनगर), राधेलाल बेनीराम लिल्हारे (वय २७, रा. खैरी कुमरी, बालाघाट, छत्तीसगड) आणि संतोष लक्ष्मीकांत कैकरयार (वय ३८, रा. भद्रावती, चंद्रपूर) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या एकूण ९८ लाखांच्या नोटा, एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस तसेच रोख ९६० रुपये आढळले. पोलिसांनी ते जप्त केले.
त्यांची प्राथमिक चौकशी केली असता यवतमाळचा संतोष कदम हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले. संतोषचे यवतमाळात लॉन असल्याचे आणि त्याने अनेक वित्तीय संस्था तसेच खासगी व्यक्तींकडून लाखोंचे कर्ज घेतले. तो स्वत:ची ओळख फायनान्सर म्हणून सांगत होता. त्याने अनेकांना चेक दिले. ते बाऊंस झाल्यामुळे त्याच्यामागे कर्जदाराचा तगादा असल्याने त्याने यवतमाळ सोडल्याचेही चौकशीत पुढे झाले.

नोट अदलाबदल की ...?
सद्यस्थितीत कोणतेही मोल नसलेल्या ९८ लाखांच्या जुन्या नोटा संतोष आणि त्याच्या साथीदारांजवळ आढळल्या. त्यामुळे तो आणि साथीदार नोटा अदलाबदलीच्या गोरखधंद्यात सहभागी असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये त्याच्यासह नागपूर, चंद्रपूर आणि बालाघाटमधीलही आरोपींचा समावेश असल्याने नोटा अदलाबदलीच्या गोरखधंद्याचा संशय घट्ट झाला आहे. मात्र, आता त्या नोटा कुणी स्वीकारत नसल्याने त्याने अनेक महिन्यांपूर्वीच त्या जमवून ठेवल्या आणि आता त्या बदलवून घेण्यासाठी ग्राहक शोधत असावा, असाही संशय आहे. दुसरे म्हणजे, या टोळीने एखाद ठिकाणी लुटमार केली असावी त्यात या जुन्या नोटा त्यांच्या हाती लागल्या असाव्या, असाही संशय आहे.

लुटमारीच्या होते तयारी
आरोपींजवळ पिस्तुलासह दोन जिवंत काडतूसही सापडले. त्यामुळे ते मोठी लुटमार करण्याच्या तयारीत असावे, असाही पोलिसांना संशय आहे. पिस्तुलासंदर्भात आरोपीने ते आपल्याला लॉनमध्ये सापडल्याची बतावणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, त्याचे हे कथन बनवाबनवीचा प्रकार असल्याचे पोलिसांचे मत आहे. दरम्यान, या टोळीतील आरोपींना कोर्टात हजर करून पोलिसांनी रविवारी त्यांचा २८ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळवला. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, प्रशांत चौगुले, संजय चव्हाण, उपनिरीक्षक श्रीनिवास मिश्रा, हवालदार अफसर खान, रमेश उमाटे, नरेश रेवतकर, नरेश सहारे, अमित पात्रे, आशिष ठाकरे, रवींद्र बारई, राहुल इंगोले, मंगेश मड़ावी, आशीष देवारे, राजेंद्र सेंगर, देवीप्रसाद दुबे, अविनाश तायड़े आणि नीलेश वाड़ेकर यांनी ही कामगिरी बजावली.

 


Web Title: Old currency of 98 lakhs seized in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.