अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा निवाडा आता मत विभाजनावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:15 AM2017-11-16T11:15:34+5:302017-11-16T11:19:32+5:30

बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.

Now divisions of votes may decide President of Marathi Sahitya Sammelan | अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा निवाडा आता मत विभाजनावरच

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा निवाडा आता मत विभाजनावरच

ठळक मुद्देयंदा एकतर्फी चित्र नाहीचपाचही उमेदवारांनी प्रतिष्ठा लावली पणाला

शफी पठाण।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र अशी त्रिकोणी लढत होत आहे. निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.
या मत विभाजनाचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी पाचही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून जिथे डॅमेजची प्रबळ शक्यता आहे तिथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. किशोर सानप विदर्भाचे, राजन खान व रवींद्र गुर्जर पश्चिम महाराष्ट्राचे तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुण्यातूनही अर्ज भरला असला तरी ते मराठवाड्याचेच उमेदवार आहेत, हे उघड सत्य आहे. संभाव्य मत विभाजनाचा धोका लक्षात घेता विदर्भातून एकच उमेदवार या निवडणुकीला उभा रहावा, यासाठी जोरदार प्रयत्न झाले. पण, दोन्ही उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने व दोघांचेही साहित्य क्षेत्रातील मित्रमंडळ सारखे असल्याने येथे मत विभाजन अटळ आहे. अगदी सारखी स्थिती पश्चिम महाराष्ट्रातही आहे. राजन खान, लक्ष्मीकांत देशमुख व रवींद्र गुर्जर हे तिघेही उमेदवार पुण्यातच राहणारे आहेत. पुणेकरांसोबत मुंबईकर मतदारांचा ओढाही आपल्या जवळचा उमेदवार म्हणून पुण्यातील उमेदवारांकडे आहे. राजन खान व लक्ष्मीकांत देशमुख यांच्या मित्र परिवाराचे परीघही जवळपास सारखे आहे. याचा अर्थ येथेही विभाजन टाळता येणे कठीण आहे.
लक्ष्मीकांत देशमुख हे मूळचे मराठवाड्यातील असल्याने तेथील संपूर्ण मते त्यांनाच मिळतील, असेही अजिबात नाही. राजन खान, डॉ. शोभणे व डॉ. सानप या तिघांच्याही चाहत्यांचा कमी-अधिक गोतावळा मराठवाड्यात असल्याने येथेही मते विभागली जाणार आहेत. हे चित्र बघता विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल असा अंदाज आहे.
या वास्तवाची जाणीव पाचही उमेदवारांना असल्याने मागच्या वर्षीसारख्या एकतर्फी विजयाची आशा सगळ्यांनीच सोडून दिली आहे.

बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर मदार
महाराष्ट्रात जिथे जिथे विभाजनाचा फटका बसेल त्या ठिकाणची संभाव्य हानी भरून काढण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील अपेक्षित मते मिळाली नाही तर किमान बृहन्महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मते तरी आपल्याकडे वळवता यावी, यासाठी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांना साकडे घातले जात आहे. परंतु बृहन्महाराष्ट्रातसुद्धा यातील प्रमुख तीनही उमेदवारांचा कमी-अधिक प्रभाव असल्याने येथील मतांचा प्रवाहही एकाच दिशेने वळेल, याची अजिबात शक्यता नाही. याचा अर्थ महाराष्ट्राप्रमाणेच बृहन्महाराष्ट्रातही वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये मते विभागली जाणार असून उमेदवाराच्या विजयामध्ये मत विभाजनाचा फॅक्टर येथेही महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: Now divisions of votes may decide President of Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.