‘नोगा’चे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनरुज्जीवन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 07:44 PM2017-12-16T19:44:23+5:302017-12-16T20:01:00+5:30

संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के भागीदारी घेतली जाईल. नोगाची उत्पादने देश-विदेशात पोहोचवून आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूरच्या संत्र्याची नवी ओळख प्रस्थापित केल जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

'NOGA' will be rejuvenation on international level | ‘नोगा’चे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनरुज्जीवन करणार

‘नोगा’चे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनरुज्जीवन करणार

Next
ठळक मुद्दे‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  घोषणासंत्रा कलम संशोधनासाठी कृषी विद्यापीठाला दोन कोटीशानदार उद्घाटन, शेतकऱ्यांची गर्दी

ऑनलाईन लोकमत 
नागपूर :
नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी शानदार उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते. याशिवाय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ‘यूपीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजूभाई श्रॉफ, बजाज इलेक्ट्रीकल्स लि.च्या कन्झ्युमर्स प्रॉडक्ट्सचे कार्यकारी अध्यक्ष व कंट्री हेड अतुल शर्मा, आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष पी. जी. जगदीश, कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे, उपाध्यक्ष हरजिंदरसिंग मान, सचिव जगदीश पाटीदार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यांनी सर्व स्टॉलची पाहणी केली. यानंतर ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले. यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), सहप्रायोजक मिनिट-मेड यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हे लोकमत इनिशिएटिव्ह असून १८ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.
याप्रसंगी नितीन गडकरी यांनी उत्कृष्ट प्रतीची उत्पादने तयार करण्यासंदर्भात ओळख असलेल्या ‘नोगा’चा मुद्दा उपस्थित केला. प्रशासकीय अनास्थेमुळे ‘नोगा’च्या उत्पादनाला फटका बसला. यासंदर्भात कृषी मंत्रालयानेदेखील लक्ष दिले नाही. त्यामुळे ‘नोगा’ला नवसंजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. या आवाहनाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘नोगा’ला पुनरुज्जीवन देण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर विसंबून राहण्यापेक्षा ‘मार्केटिंग’तसेच इतर व्यवस्थापनात निष्णात असलेल्या खासगी क्षेत्रासोबत हातमिळवणी करून एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. सोबतच संत्र्यावरील संशोधनासाठी आणि नवीन कलमांच्या निर्मितीसाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला दोन कोटी रुपये अतिरिक्त देण्यात येतील, अशी घोषणादेखील त्यांनी केली.
शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर नियोजनबद्ध ‘क्लस्टर’ उभारावे लागतील, असे गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले. तर पुढील पाच वर्षांत ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ जगातील महत्त्वाचा उत्सव बनेल व जगभरातून येथे लोक येतील, असा विश्वास विजय दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान व्यक्त केला. यावेळी जयकुमार रावल, राजूभाई श्रॉफ, अतुल शर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ जगात नागपूर व येथील संत्र्यांचे नाव पोहोचवेल, असे प्रतिपादन केले. खा.अजय संचेती यांनी आभार मानले.
यावेळी आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. भीमराव धोंडे, आ. आशिष देशमुख, नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, महाआॅरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, सागर कौशिक, सीसीआरआयचे संचालन एम.एस. लदानिया, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, एमटीडीसीच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे आदी उपस्थित होते.

संत्र्याला शाश्वत बाजारपेठ हवी
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी काही विशेष पावले उचलण्याची आवश्यकता आहे. संत्रा ‘टेबल फ्रूट’ म्हणून जगात पाठविण्यावर मर्यादा आहेत. पण जेव्हा त्यावर प्रक्रिया होईल तेव्हाच शाश्वत बाजारपेठ मिळेल. यासाठी प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
संत्र्यासोबत इतर कृषी व फलोत्पादनातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. चांगल्या कलमांचा पुरवठा होणार नाही तोवर चांगला संत्रा उपलब्ध होणार नाही. नागपुरात पतंजलीतर्फे ‘फूड पार्क’ उभारण्यात येत आहे. ते सर्वच प्रकारचा संत्रा विकत घेतील.‘सॉफ्टड्रिंक्स’च्या विविध कंपन्यांकडून शीतपेयात संत्र्याच्या ‘पल्प’चे प्रमाण वाढविण्यात येत आहे. काही शीतपेयांमधील संत्र्याचा ‘पल्प’ अमेरिकेतून येतो. मात्र आता हा ‘पल्प’ मोर्शी येथील कारखान्यात तयार केलेलाच वापरण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘कोल्ड स्टोरेज’ची साखळी उभारण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांना फायदाच मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’च्या पुढाकाराचे कौतुक केले. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या माध्यमातून संत्र्याला वैश्विक ओळख देण्याचा प्रयत्न होत आहे. या दिवसाची इतिहासात नोंद होईल.या फेस्टिव्हलला पुढील वर्षीदेखील ‘एमटीडीसी’चे सहकार्य मिळेल, असेही त्यांनी जाहीर केले.
संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. खासदार अजय संचेती यांनी आभार मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांमार्फत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी करून माहिती घेतली.

Web Title: 'NOGA' will be rejuvenation on international level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.