गर्भाशय प्रत्यारोपण मातृत्वासाठी नवी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 01:15 AM2017-11-06T01:15:58+5:302017-11-06T01:16:23+5:30

जगात सुमारे १.५ दशलक्षपेक्षा जास्त महिला गर्भाशयाच्या वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. काही स्थितीमध्ये मुलींचा गर्भाशयविनाच जन्म होतो किंवा गर्भाशयातील .....

New hope for uterine transplantation maternity | गर्भाशय प्रत्यारोपण मातृत्वासाठी नवी आशा

गर्भाशय प्रत्यारोपण मातृत्वासाठी नवी आशा

Next
ठळक मुद्देशैलेश पुनतांबेकर यांची माहिती : ‘एमएसआर-२०१७’ वंध्यत्व परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात सुमारे १.५ दशलक्षपेक्षा जास्त महिला गर्भाशयाच्या वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. काही स्थितीमध्ये मुलींचा गर्भाशयविनाच जन्म होतो किंवा गर्भाशयातील रक्तस्राव किंवा काही आजाराच्या दोषामुळे गर्भाशय काढण्याची वेळ येते. अशा महिलांसाठी गर्भाशय प्रत्यारोपण मातृत्वासाठी एक नवी आशा आहे, अशी माहिती पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. शैलेश पुनतांबेकर यांनी येथे दिली.
महाराष्टÑ चॅप्टर आॅफ इंडियन सोसायटी आॅफ असिस्टेड रिप्रोडक्शन आणि नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक्स अ‍ॅण्ड गायनाकॉलॉजिकल सोसायटी (एनओजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ‘एमएसआर-२०१७’ वंध्यत्वावर वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी या परिषदेचा समारोप झाला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
डॉ. पुनतांबेकर म्हणाले, देशातले पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात झाले. सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय ट्रान्सप्लान्ट करण्यात आले. या प्रत्यारोपणामुळे मातृत्वाची इच्छा ठेवणाºया महिलांसाठी हे एक आशेचे किरण ठरले. असे म्हटले जाते की, ५०० मध्ये एका महिलेला गर्भाशयाचा आजार असतो.
अशा महिलांकडे दोन पर्याय असतात एक तर मूल दत्तक घेणे किंवा सरोगेटची (भाड्याने गर्भ) मदत घेणे. परंतु आता गर्भाशय प्रत्यारोपण हा तिसरा पर्याय म्हणून समोर येत आहे. ही खूप किचकट शस्त्रक्रिया आहे, असेही ते म्हणाले.
या वार्षिक परिषदेच्या आयोजनासाठी आयोजन अध्यक्ष डॉ. साधना पटवर्धन, सचिव डॉ. चैतन्य शेंबेकर, ‘एनओजीएस’च्या सचिव डॉ. वर्षा ढवळे यांच्यासह इतरही पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.
आईचे दूध स्टेमसेलचे एक नैसर्गिक स्रोत
प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की म्हणाले, स्टेमसेल म्हणजे मूलपेशी. आईचे दूध हा मूलपेशींचा एक नैसर्गिक स्रोत आहे, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत आईच्या दुधात मूलपेशी खूप प्रमाणात म्हणजे एक एम.एल. दुधामध्ये जवळपास ५०-५० हजार मूलपेशी असतात; नंतर मात्र त्याचं प्रमाण कमी कमी होत अगदी ५० किंवा १०० पेशींपर्यंत येतं. थोडक्यात ही नैसर्गिक स्टेमसेल थेरपीच आहे. आईच्या या मूलपेशी बाळाला तोंडावाटे जातात. हा निसर्गानं दिलेला उपचार असल्याने दुसºया मुलाला जरी छातीवर घेतले तर त्याचा तोटा होत नाही. यामुळे प्रत्येक आईने मुलाच्या सुदृढ आरोग्यासाठी योग्य स्तनपान करणे नितांत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
कृत्रिम गर्भधारणा वैद्यकक्षेत्रासाठी वरदान
गायनॉकॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष व या वार्षिक परिषदेचे आयोजन सचिव डॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले, कृत्रिम गर्भधारणा हे वैद्यक क्षेत्रासाठी वरदान असले तरी त्यात काही गुंतागुंत असते. पाश्च्यात्त्य स्त्रीच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये रजोनिवृत्तीचा कालावधी सहा वर्षांनी घटला आहे. वैद्यकीय परिभाषेत याला ‘ओव्हरियन एजिंग’ म्हणतात. अशावेळी गर्भधारणेत मोलाची भूमिका बजावणारा पुरुषातील शुक्राणू आणि स्त्रियांतील बीजांडाचे कृत्रिम मिलन घडवून तयार झालेला ‘एम्ब्रिओ’ जतन करता येतो. तो कृत्रिम गर्भधारणेच्यावेळी गर्भपिशवीत सोडताना गर्भपेशी अतिक्रियाशील होण्याची जोखीम असते, असेही ते म्हणाले. डॉ. दीपक मोदी, डॉ.पी.सी. महापात्र, डॉ. प्रदीप कुमार, डॉ. कानन येलीकर यांनीही महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला.

Web Title: New hope for uterine transplantation maternity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.