नागपूरच्या तेजश्रीला ‘आयआयएम’मध्ये दोन सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 08:34 PM2018-04-04T20:34:10+5:302018-04-04T20:34:22+5:30

‘आयआयएम’ सारख्या संस्थेत प्रवेश मिळविणे हीच मुळात कठीण बाब. त्यात सुवर्णपदक मिळविणे ही तर डोंगराएवढी गोष्ट. परंतु नागपूरच्या तेजश्री दाऊतपुरे हिने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता अन् अथक परिश्रमाने ‘आयआयएम’ इंदोर येथे दोन सुवर्णपदक पदरात पाडून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

Nagpur's Tejashree gets two gold medals in 'IIM' | नागपूरच्या तेजश्रीला ‘आयआयएम’मध्ये दोन सुवर्णपदक

नागपूरच्या तेजश्रीला ‘आयआयएम’मध्ये दोन सुवर्णपदक

Next
ठळक मुद्देकर्तृत्वाने गाठले यश : ‘सीएफए’परीक्षेतही मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ‘आयआयएम’ सारख्या संस्थेत प्रवेश मिळविणे हीच मुळात कठीण बाब. त्यात सुवर्णपदक मिळविणे ही तर डोंगराएवढी गोष्ट. परंतु नागपूरच्या तेजश्री दाऊतपुरे हिने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता अन् अथक परिश्रमाने ‘आयआयएम’ इंदोर येथे दोन सुवर्णपदक पदरात पाडून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
तेजश्री ही नागपुरातील ‘ईएसआयएस’मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आणि एलआयटीमधील गणित विभागप्रमुख डॉ. शुभा दाऊतपुरे यांची कन्या आहे. तेजश्रीने नागपुरातील व्हीएनआयटी संस्थेतून २०१५ मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने इंदोरच्या ‘आयआयएम’मध्ये प्रवेश मिळविला. आपल्या कठोर परिश्रमाने तेजश्रीने ‘आयआयएम’मध्ये दोन सुवर्णपदक प्राप्त केले आहेत. यातील एक सुवर्णपदक पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये तृतीय क्रमांकासाठी तर दुसरे मुलींमधून प्रथम येण्याबद्दल तिने पटकावले. केवळ ‘आयआयएम’मध्येच नव्हे तर जागतिक स्तरावरील ‘सीएफए’ (चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट) परीक्षेतही तिने बाजी मारली आहे. इंडिगो एअरलाईन्सचे अध्यक्ष आदित्य घोष यांच्या हस्ते इंदोर येथे ‘आयआयएम’च्या भव्य दीक्षांत समारंभात तिला हे दोन्ही सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय तेजश्रीने आईवडील, शिक्षक आणि मित्रांना दिले आहे. हे भव्य यश मिळविल्यानंतर तेजश्री मुंबई येथील जे. पी. मॉर्गन या मल्टिनॅशनल कंपनीत इन्व्हेस्टमेंट बँकर या पदावर रुजु होत आहे. तेथे चार वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर स्वत:चा उद्योग सुरू करण्याची इच्छा तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
ध्येय ठरवून वाटचाल करा
‘आयआयएम’सारख्या कठीण परीक्षेत मिळविलेल्या भरघोस यशाचे रहस्य तेजश्रीला विचारले असता तिने कुठल्याही कामाप्रती आपले समर्पण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचाल करताना आधी आपले ध्येय निश्चित करावे आणि ते प्राप्त करण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असा सल्ला तिने दिला आहे.

Web Title: Nagpur's Tejashree gets two gold medals in 'IIM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.