नागपुरातील स्पेअरपार्ट घोटाळा; महानगरपालिकेतील तीन अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:46 PM2017-12-08T18:46:38+5:302017-12-08T18:47:36+5:30

महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कारखाना विभागातील स्पेअरपार्ट खरेदी घोटाळा प्रकरणात अखेर तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात आसीनगर झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, कारखाना विभागातील यांत्रिकी अभियंता राजेश गुरमुळे व उज्ज्वल लांजेवार आदींचा समावेश आहे.

Nagpur's Sparepart scam; Three municipal officials suspended | नागपुरातील स्पेअरपार्ट घोटाळा; महानगरपालिकेतील तीन अधिकारी निलंबित

नागपुरातील स्पेअरपार्ट घोटाळा; महानगरपालिकेतील तीन अधिकारी निलंबित

Next
ठळक मुद्देमहापौरांचे आदेश विजय हुमणे, उज्ज्वल लांजेवार व राजेश गुरमुळे यांचा समावेश

आॅनलाईन लोकमत
नागपूर : महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कारखाना विभागातील स्पेअरपार्ट खरेदी घोटाळा प्रकरणात अखेर तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात आसीनगर झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, कारखाना विभागातील यांत्रिकी अभियंता राजेश गुरमुळे व उज्ज्वल लांजेवार आदींचा समावेश आहे. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निलंबनाचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची आयुक्त स्तरावर १५ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कारखाना विभागाने खरेदी के लेल्या स्पेअरपार्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँगे्रसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी केला आहे. हा आरोप गंभीर स्वरुपाचा आहे. तसेच अनेकांच्या तक्रारी आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पेअरपार्ट खरेदीत गडबड केल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने यातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्याची सूचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केली. त्यानुसार कार्यकारी महापौरांनी सभागृहात घोषणा केली. संदीप सहारे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता.
महापालिकेची लहानमोठी २०१ वाहने आहेत. या वाहनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कारखाना विभागावर आहे. दुरुस्तीसाठी खरेदी करण्यात आलेल्या स्पेअरपार्टची (साहित्य) किंमत आणि याचीच खुल्या बाजारातील किंमत यात प्रचंड तफावत आहे. वाहनांसाठी लागणारे टायर, ट्युब, बॅटरी, कपलिंग, एक्सव्हेटर अशा साहित्याची खरेदी दामदुप्पट किमतीत केली जात आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दोन वर्षात २ कोटी ३१ लाखांच्या साहित्याची चढ्याभावाने खरेदी करण्यात आली. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला. टाटा कंपनीच्या गाडी इएक्स -२५१५ चे एमआरएफ कंपनीचे टायर ३५,९५० रुपये दराने खरेदी केले. परंतु खुल्या बाजारात याच टायरची किंमत १४ हजार ८०० रुपये आहे. एमआरएफचा रिडायल टायर ८५ हजार ४५६ रुपये दराने खरेदी करण्यात आला आहे. बाजारात याच टायरची किंमत १८ हजार ४०० रुपये आहे. टाटा सुमोसाठी लागणारी बॅटरी (१२होल्ट) १८ हजार ५०० रुपये दराने खरेदी केली आहे. बाजारात याच बॅटरीची किंमत ५ हजार ३९० रुपये आहे. अन्य साहित्याचीही अशीच दामदुप्पट भावाने खरेदी के ल्याचे सहारे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.


कारखाना विभाग बनला पांढरा हत्ती
कारखाना विभागात भ्रष्टाचार झाला असल्याने विभागातील अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली. कारखाना विभागात वाहने दुरुस्तीसाठी लागणारी यंत्रणा आहे. मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. परंतु महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये एकाही वाहनाची दुरुस्ती केली जात नाही. खासगी गॅरेजमध्ये वाहने दुरुस्त केली जातात. कमी किमतीच्या वस्तू जादा भावाने खरेदी केल्या जातात. हा विभाग पांढरा हत्ती बनला आहे. घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्याची मागणी सतीश होले यांनी केली. अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनीही गैरप्रकाराला आळा घालण्याची मागणी केली. विजय हुमणे यांनी दरकरारानुसार स्पेअरपार्टची खरेदी के ल्याचे सांगितले. परंतु बाजारातील दर व दरकरारातील किंमत यांच्यात प्रचंड तफावत असल्याने हुमणे यांच्या माहितीवर सदस्यांनी आक्षेप घेतला. भाजपाचे सुनील अग्रवाल यांनी दरकरार निश्चित क रण्यात आलेले आहेत का, अशी विचारणा केली. मात्र सदस्यांनी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती. सभागृहाच्या निर्णयामुळे कारखाना विभागातील गैरप्रकार कमी होतील अशी अपेक्षा आहे.

 

 

Web Title: Nagpur's Sparepart scam; Three municipal officials suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा