नागपूरच्या गरीब आॅटोचालकाने उभारला दीडशे कोटींचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:41 PM2018-04-24T23:41:58+5:302018-04-24T23:46:37+5:30

आईचे दागिने विकून कसातरी एक आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला व त्यातून हाती आलेल्या चार-दोन पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव निर्माण करणार हाच माणूस आज दीडशे कोटीच्या व्यवसायाचा मालक ठरला आहे. जिथे दोनवेळच्या भाकरीसाठी झगडावे लागायचे त्याच घराच्या अंगणात आज १२५ ट्रेलरचा ताफा उभा आहे. प्यारे खान त्याचे नाव. आॅटोचालक प्यारेच्या जिद्दीची ही यशोगाथा क्षणिक पराभवाने खचून जाणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणावाट ठरेल अशीच आहे.

Nagpur's poor auto driver raise 150 crores business | नागपूरच्या गरीब आॅटोचालकाने उभारला दीडशे कोटींचा व्यवसाय

नागपूरच्या गरीब आॅटोचालकाने उभारला दीडशे कोटींचा व्यवसाय

googlenewsNext
ठळक मुद्देजिद्दीची यशोगाथा : भाकर मिळत नव्हती, आज अंगणात उभे आहेत १२५ ट्रेलर

लोकमत न्यूज नेटवर्क
सुमेध वाघमारे
नागपूर : शिक्षण - दहावी नापास. उदरनिर्वाहाचे साधन- गोळ्या-बिस्किटांचे दुकान. घरी आश्रित- आई-वडील, तीन भाऊ, बहिणी. भाकरीचा संघर्ष पाचवीलाच पूजलेला. आईचे दागिने विकून कसातरी एक आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला व त्यातून हाती आलेल्या चार-दोन पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव निर्माण करणार हाच माणूस आज दीडशे कोटीच्या व्यवसायाचा मालक ठरला आहे. जिथे दोनवेळच्या भाकरीसाठी झगडावे लागायचे त्याच घराच्या अंगणात आज १२५ ट्रेलरचा ताफा उभा आहे. प्यारे खान त्याचे नाव. आॅटोचालक प्यारेच्या जिद्दीची ही यशोगाथा क्षणिक पराभवाने खचून जाणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणावाट ठरेल अशीच आहे.
प्रचंड मेहनतीच्या भरवशावर कोट्यवधीचा व्यावसायिक होऊनही श्रीमंतीची हवा प्यारे यांच्या डोक्यात गेलेली नाही. त्यांच्या हाताखाली ३०० कर्मचारी काम करतात. त्या सर्वांना आपल्या जीवाभावाप्रमाणेच मानतो. कामाच्याप्रति प्रामाणिक राहा, श्रम घेण्याची तयारी ठेवा आणि ध्येयपासून विचलित होऊ नका, असाच सल्ला ते सर्वांना देतात. ‘लोकमत’ने त्यांच्या यशाविषयी विचारले असता सुरुवातीला प्रसिद्धी नको म्हणून टाळले, परंतु आपले यश इतरांना प्रेरणादेणारे ठरेल याचे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. प्यारेलाल म्हणाले, घरची स्थिती अत्यंत हलाखीची. अर्धेपोट उपाशी राहून कधी लहानाचा मोठा झालो ते कळलेच नाही. त्यात शिक्षण दहावी नापास. रेल्वे स्टेशनवर संत्री विकण्यापासून ते दुचाकी धुण्याचे काम केले. याचवेळी एकाने आॅटो चालविणे शिकविले. अम्मीने आॅटो विकत घेण्यासाठी १२ हजार रुपये दिले. परंतु हे पैसेही तोकडे होते. ताजबागेत राहतो म्हणून बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. मित्रांकडून उसनवारीने आॅटो विकत घेतला. दिवस-रात्र एक करून आॅटो चालविला. लहानपणापासून हार्माेनियम वाजविण्याची आवड होती. त्याचा उपयोगही पैसे मिळविण्यासाठी केला. ओ.पी. सिंह आॅर्केस्ट्रात १५० रुपये रोजंदारीने ‘की बोर्ड’ वाजवू लागलो. आॅर्केस्ट्राला चांगले दिवस आल्याने त्यांना बाहेर मागणी होऊ लागली. परंतु ये-जा करण्यासाठी बस नव्हती. मी हिंमत दाखविली. आॅटो विकला, सेकंडहॅण्ड बस विकत घेतली. मात्र बसमधून हवी तशी मिळकत होत नव्हती. कुठल्याही स्थितीत पैसा मिळविण्याच्या जिद्दीने ट्रकचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
प्यारे म्हणाले, कर्जासाठी अनेक बँकेचे उंबरठे झिजविले, परंतु कुणीच कर्ज देत नव्हते. अखेर एका बँकेने विश्वास दाखविला आणि ११ लाखांचे कर्ज दिले. परंतु सहा महिन्यातच ट्रकचा मोठा अपघात झाला. ट्रकचा चुराडा झाला. पुन्हा रस्त्यावर आलो. ‘ट्रान्सपोर्ट’चा व्यवसाय माझ्यासाठी लाभदायक नसल्याचा अनेकांनी सल्ला दिला. परंतु हिमंत हारली नाही. ज्याने मला रस्त्यावर आणले त्याच व्यवसायात प्रगती करून दाखवीन, अशी जिद्द ठेवली. पुन्हा उसनवारीतून ट्रकची दुरुस्ती केली. ट्रक चालविण्यास सुरुवात केली. एका अडलेल्या कंपनीला तातडीने मदत केली. त्या कंपनीच्या मालकाने माझा प्रामाणिकपणा व श्रम करण्याची तयारी पाहून पुढे अनेक कामे दिली. यातूनच २००५ मध्ये दुसरा ट्रक घेतला, नंतर एकेक ट्रकची संख्या वाढू लागली. पुढे ट्रक सोडून ट्रेलर विकत घेतले आणि आश्मी रोड कॅरिअर्स प्रा. लिमिटेडच्या नावाने कंपनी स्थापन करून ‘ट्रान्सपोर्ट’चा व्यवसाय सुरू केला. आज १२५ ट्रेलर आहेत. १६० चक्क्यांच्या ट्रेलरचाही यात समावेश आहे. वर्षाचा १५० कोटींचा व्यवसाय आहे.
पेट्रोल पंपासाठी २०१३ मध्ये दिली दहावीची परीक्षा
प्यारे म्हणाले, स्वत:चे पेट्रोल पंप असावे हे स्वप्न होते. परंतु त्यासाठी दहावी पासची अट आड येत होती. २०१३ मध्ये दहावीची परीक्षा दिली. परंतु दोनवेळा नापास झाल्यावर पास झालो. उमरेड रोडवर आज सर्वात मोठा पेट्रोल पंप आहे. २०१६ मध्ये बारावीची परीक्षा दिली. त्यातही दोनदा नापास होऊन गेल्याच वर्षी उतीर्ण झालो, असे म्हणत प्यारेलाल म्हणाले की, जीवनात कितीही अडथळे आले तरी हार मानू नका. हे अडथळेच तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर पोहचवितात. त्या अडथळ्यांमधून स्वत:ला घडवा, प्रचंड मेहनत घ्या, आपल्या लक्ष्याविषयी, कामाविषयी प्रामाणिक राहा. यश नक्कीच मिळेल.

Web Title: Nagpur's poor auto driver raise 150 crores business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर