नागपूर आरटीओ : ३०९ स्कूल बसला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:48 PM2019-06-18T23:48:56+5:302019-06-18T23:50:30+5:30

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७१७ स्कूल बस व व्हॅन फेरतपासणीसाठी हजर झाल्या. उर्वरित ३०९ स्कूल बसेस तपासणीला आल्याच नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Nagpur RTO: notices to 309 school buses | नागपूर आरटीओ : ३०९ स्कूल बसला नोटीस

नागपूर आरटीओ : ३०९ स्कूल बसला नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देफेरतपासणीसाठी आलेच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७१७ स्कूल बस व व्हॅन फेरतपासणीसाठी हजर झाल्या. उर्वरित ३०९ स्कूल बसेस तपासणीला आल्याच नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्कूल बसची फिटनेस चाचणी घेण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध आहे, त्यांनासुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्कूल बस फेरचाचणीकरिता सादर करणे बंधनकारक केले. फेरतपासणीत वाहनात दोष आढळून आल्यास दोषाचे निराकरण केल्यानंतर वाहन तपासणीसाठी पुन्हा सादर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. फेरचाचणीचा कालावधी ३ मे ते ६ जूनपर्यंत होता. परंतु नंतर तो १६ जूनपर्यंत वाढविण्यात आला. नागपूर शहर आरटीओअंतर्गत येणाऱ्या स्कूल बस व व्हॅनची संख्या ८५६ आहे. यातील ७१७ वाहने फेरतपासणीस आली, उर्वरित १३९ वाहने तपासणीसाठी आलीच नाहीत. नागपूर ग्रामीण आरटीओअंतर्गत १६२० स्कूल बस व व्हॅनची संख्या आहे. यातील १४५० वाहने तपासणीसाठी आली, तब्बल १७० वाहने अद्यापही तपासणीपासून दूर आहेत. तपासणीसाठी न आलेल्या ३०९ वाहनांना नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच या वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
फेरतपासणी न झालेल्या वाहनांवर कारवाई
वाढीव मुदत देऊनही फेरतपासणीसाठी न आलेल्या स्कूल बस व व्हॅन चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाईची मोहीमही हाती घेतली जाईल.
श्रीपाद वाडेकर
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण)

Web Title: Nagpur RTO: notices to 309 school buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.