नागपूर पवनकर हत्याकांड: मेव्हण्यानेच केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:56 PM2018-06-11T15:56:09+5:302018-06-11T15:56:22+5:30

नंदनवनमधील पवनकर कुटुंबावर आज पहाटे त्यांच्या कुटुंबातील सदस्यानेच काळ बनून घाव घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कमलाकर पवनकर यांचा साळा विवेक पालटकर याने हे खून केल्याचे पोलिस तपासात आता समोर आले आहे.

The Nagpur Pavanakar murder case; brother in law did the murder | नागपूर पवनकर हत्याकांड: मेव्हण्यानेच केला घात

नागपूर पवनकर हत्याकांड: मेव्हण्यानेच केला घात

googlenewsNext
ठळक मुद्देझोपेत असताना बत्त्याने केले वारस्वत:च्या मुलालाही संपविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नंदनवनमधील पवनकर कुटुंबावर आज पहाटे त्यांच्या कुटुंबातील सदस्यानेच काळ बनून घाव घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कमलाकर पवनकर यांचा साळा विवेक पालटकर याने हे खून केल्याचे पोलिस तपासात आता समोर आले आहे. नागपूर पोलीस त्याचा कसून शोध घेत असून तो सध्या फरार आहे.
या भीषण हत्याकांडातून बचावलेल्या वैष्णवी आणि मिताली आज भल्या सकाळी जवळच राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी पोहचल्या. त्या घाबरलेल्या अवस्थेत व काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्यामुळे नातेवाईकांमार्फत पोलिसांनी रात्री घरात कुणी आले होते का, अशी त्यांना विचारणा केली. मितालीने मामा (आरोपी विवेक) होता, असे सांगितले. तो रात्री मुक्कामी थांबला होता, मात्र भल्या सकाळीच तो निघून गेल्याने पोलिसांना संशयाची कडी मिळाली. त्याआधारे तपास सुरू झाला. त्यानंतर पवनकर यांच्या नातेवाईकांनी आरोपीची हिस्ट्रीच पोलिसांना सांगितली. त्यानुसार, कमलाकरची पत्नी अर्चना हिचा सख्खा भाऊ असलेल्या विवेक पालटकरची गावाकडे वडिलोपार्जित जमीन आहे. त्याला पत्नीच्या हत्येच्या आरोपात न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी कमलाकर यांनी बरीच धावपळ केली. त्याची मुले मिताली अन् कृष्णा यांना पोटच्या मुलांप्रमाणे वाढविले. स्वत:च्या मुलींना जे घ्यायचे द्यायचे ते सर्व आरोपीच्या मुलांनाही कमलाकर घेत, देत होते. आरोपी विवेकला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी तसेच कोर्टकचेरीच्या कामात त्यांनी सुमारे पाच लाख रुपये खर्ची घातले. कमलाकर यांनी केलेल्या या धावपळीमुळेच उच्च न्यायालयातून आरोपी विवेकची सुटका झाली अन् तो बाहेर आला.

कारागृहातून बाहेर पडताच दाखवले आरोपीने खरे रूप
कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरोपी विवेकचे बहिण अर्चना आणि जावई कमलाकर यांच्या घरी जाणे येणे होते. साधारणत: दर रविवारी ‘गरम पार्टी’ होत होती. याच दरम्यान, कोर्ट कचेरीसाठी खर्च झालेले सुमारे पाच लाख रुपये परत मिळावे म्हणून कमलाकर यांनी आरोपीला त्याची वडिलोपार्जित १० एकर शेती विकण्यास सांगितले होते. कारागृहात असेपर्यंत ‘तुम्हीच विका, तुम्हीच ठरवा. माझी कुठे सही पाहिजे ते सांगा’, असे म्हणणा-या आरोपी विवेकने कारागृहातून बाहेर पडताच आपले खरे रुप दाखवणे सुरू केले होते. त्याने शेती विकण्यासाठी टाळाटाळ चालवली. वेगवेगळे कारण सांगू लागला. शेती विकण्याऐवजी त्याने ती दुस-या एकाला मक्तयाने दिली. त्यातून मिळणा-या रकमेतून तुमचे थोडे थोडे पैसे देईल, असे तो म्हणू लागला. पाच लाखांची रक्कम अशा प्रकारे परत करण्यास खूप वर्षे निघून जातील, मला पैशाचे काम आहे, असे म्हणत कमलाकर आरोपी विवेकवर दबाव टाकत होते. त्यातून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. कमलाकरने हा विषय आपल्या पक्षातील काही जवळच्या पदाधिका-यांनाही सांगितला होता. मात्र, घरगुती विषय असल्याने त्यात कुणी हस्तक्षेप करण्याची तसदी घेतली नाही. या पार्श्वभूमीवर, रविवारी रात्री आरोपी त्याच्या स्प्लेंडरने (एमएच ४०/ ५७०९) कमलाकर यांच्या घरी आला. रात्री जेवणादरम्यान पुन्हा पैशाचा विषय निघाला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कमलाकर, पत्नी अर्चना आणि वेदांती तसेच चिमुकल्या कृष्णाला घेऊन शयनकक्षात झोपले. वृद्ध मिराबाई, वैष्णवी, मिताली या तिघी हॉलमध्ये खाली झोपल्या. तर, नराधम विवेक हॉलमध्येच दिवाणवर पडला. मध्यरात्र उलटल्यानंतर विवेकमधील सैतान जागा झाला. त्याने घरातील लोखंडी टोकदार जाडजूड बत्ता घेऊन एकापाठोपाठ कमलाकर, पत्नी अर्चना आणि वेदांती तसेच चिमुकल्या कृष्णा या सर्वांच्या डोक्यात वार केले. गाढ झोपेत असलेल्या कुणालाच साध्या प्रतिकाराचीही संधी या नराधमाने दिली नाही. त्यांच्या किंकाळ्या ऐकून वृद्ध मीराबाई झोपेतून उठल्या. त्यांनी कमलाकरच्या रूममध्ये डोकावले असता त्यांना हा सैतान चौघांचेही डोके ठेचताना दिसला. ते पाहून मीराबाई किचनच्या दाराकडे पळाल्या. तर, नराधमाने लगेच त्यांना ओढून खाली पाडले अन् त्यांच्याही डोक्यात बत्त्याचे घाव घालून त्यांनाही ठार मारले. त्यानंतर तो पळून गेला. नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

परिसरात तीव्र शोककळा
हे निर्घृण हत्याकांड उघड झाल्यानंतर केवळ आराधनानगर, नंदनवनच नव्हे तर पंचक्रोशीत थरार निर्माण झाला. परिसरात तीव्र शोककळा पसरली. कमलाकर सुस्वभावी होते. कुणाच्याही मदतीला धावून जायचे. त्यामुळे परिसरातील प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता.

श्वान घुटमळले अन् परत फिरले
पोलिसांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथक बोलवून घेतले. श्वानाने घरातील आतल्या भागाचा कानोसा घेतला. त्यानंतर घराच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत बराच वेळ घुटमळल्यानंतर ते रिंगरोड टी पॉर्इंटपर्यंत गेले आणि तेथून काही अंतर इकडे तिकडे फिरल्यानंतर पुन्हा कमलाकर यांच्या घराकडे परतले.

Web Title: The Nagpur Pavanakar murder case; brother in law did the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून