नागपूर पावसाळी अधिवेशन; सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:50 AM2018-07-03T11:50:15+5:302018-07-03T11:52:49+5:30

बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे.

Nagpur Monsoon Session; Preparations for opponents to surround the government | नागपूर पावसाळी अधिवेशन; सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

नागपूर पावसाळी अधिवेशन; सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

Next
ठळक मुद्देशेतकरी प्रश्नांवरून विरोधक करणार ‘हल्लाबोल’घोटाळे, कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला घेरणार

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. नवी मुंबई येथील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस व सत्ताधारी यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची सावली या अधिवेशनावर राहणार आहे. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. सोबतच कर्जमाफी झाल्यानंतर दीड लाखांवरील कर्जाच्या वसुलीसाठी ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांमागे बँकांचा तगादा, पीक विमा, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था स्थिती इद्यादी मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.
४ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाची नेमकी रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक मंगळवारी सकाळी नागपुरात होणार आहे. नागपुरात झालेले हिवाळी अधिवेशन कर्जमाफीच्या मुद्यावरूनच गाजले होते. यंदा पावसाळी अधिवेशन विदर्भातच होत असल्यामुळे विरोधकांची भूमिका शेतकरीकेंद्रित राहण्याची शक्यता राहणार असून कर्जमाफीतील गोंधळ, बोंडअळी नुकसानभरपाई, प्लॅस्टिकबंदी, ‘डिजिटल महाराष्ट्र’मधील त्रुटी, मंत्र्यांवर लागलेले घोटाळ्यांचे आरोप, इत्यादी मुद्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहेत. राज्यातील व विशेषत: उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्यावरूनदेखील शासनाला विरोधकांकडून ‘टार्गेट’ करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी सत्ताधारीदेखील तयारीत आहेत. मंत्र्यांनी आकडेवारीसह सर्व उत्तरे तयार ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री राहणार ‘टार्गेट’
विरोधकांकडून मंत्र्यांवरदेखील हल्लाबोल करण्यात येणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात आरक्षित जागेवर केलेल्या बंगल्याच्या बांधकामाचा मुद्दा, संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे काम केलेल्या खासगी अंगरक्षकाने घेतलेली हत्येची सुपारी हे मुद्देदेखील विरोधक उचलण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जनतेचे प्रश्न मांडणार
सरकारला सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. जनता हैराण असताना त्याचे मंत्र्यांना काहीही सोयरसूतक नाही. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने विविध समस्यांना वाचा फोडण्याचा आमचा प्रयत्न असेल. नेमक्या कुठल्या मुद्यांना प्राधान्यक्रम द्यायचा हे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात येईल.
-राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा
सरकारला जाब विचारणार
राज्य शासनाच्या कारभाराचा फटका जनतेला बसतो आहे. शेतकºयांची कर्जमाफीच्या नावावर थट्टा करण्यात आली. शेतकरी, सामान्य माणूस, नोकरदार, दलित, आदिवासींपैकी कुणालाही हे सरकार आपलेसे वाटत नाही. सर्वसामान्य जनतेच्या मुद्यांवर अधिवेशनात आम्ही शासनाला जाब विचारू.
-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Web Title: Nagpur Monsoon Session; Preparations for opponents to surround the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.