नागपुरात उकिरड्यांवर स्वच्छतेचे दीप उजळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 08:40 PM2018-11-06T20:40:27+5:302018-11-06T20:42:22+5:30

वस्त्यांमध्ये जागोजागी असलेले उकिरडे कुणालाच नको असतात. मात्र ते वस्तीमधून नामशेष व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकता कुणाचीच नसते. धरमपेठ परिसरात मात्र हे परिवर्तन घडले. येथील काही नागरिकांच्या सिव्हिक अ‍ॅक्शन गिल्ड (सीएजी) या टीमने स्वत: सहभागी होत सातत्यपूर्ण प्रयत्नांनी परिसरातील बहुतेक उकिरडे स्वच्छ केले. या स्वच्छ झालेल्या जागेवर सडा शिंपडून, त्यावर सुबक रांगोळ्या काढून दिवे लावण्यात आले. नागरिकांनाही जागृत करण्यासाठी ढोलताशांच्या गजरात स्वच्छतेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

In Nagpur, the light of cleanliness on garbage heap | नागपुरात उकिरड्यांवर स्वच्छतेचे दीप उजळले

नागपुरात उकिरड्यांवर स्वच्छतेचे दीप उजळले

Next
ठळक मुद्देस्वच्छतेच्या संकल्पातून दिवाळीचे स्वागत : सीएजीच्या परिश्रमाला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वस्त्यांमध्ये जागोजागी असलेले उकिरडे कुणालाच नको असतात. मात्र ते वस्तीमधून नामशेष व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकता कुणाचीच नसते. धरमपेठ परिसरात मात्र हे परिवर्तन घडले. येथील काही नागरिकांच्या सिव्हिक अ‍ॅक्शन गिल्ड (सीएजी) या टीमने स्वत: सहभागी होत सातत्यपूर्ण प्रयत्नांनी परिसरातील बहुतेक उकिरडे स्वच्छ केले. या स्वच्छ झालेल्या जागेवर सडा शिंपडून, त्यावर सुबक रांगोळ्या काढून दिवे लावण्यात आले. नागरिकांनाही जागृत करण्यासाठी ढोलताशांच्या गजरात स्वच्छतेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
उकिरड्यांची समस्या शहरातील सर्वच वस्त्यांमध्ये आहे. धरमपेठसारख्या उच्चभ्रू आणि बाजारपेठ असलेल्या वस्तीमध्येही अस्वच्छता होतीच. लोकांनी कचरा टाकून जागोजागी तयार झालेले उकिरडे आणि त्यावर पसरलेली घाण सर्वांनाच अस्वस्थ करणारी. या घाणीच्या दुर्गंधीमुळे प्रसंगी नाक दाबून चालणारेही येथे कचरा टाकताना विचार करीत नव्हते. दुसरीकडे स्वच्छतेची जबाबदारी असलेले महापालिकेचे आरोग्य सेवकही नेहमीची बाब म्हणून फार गांभीर्याने घेत नव्हते. अशा मानसिकतेत सीएजीच्या सदस्यांनी सकारात्मक पाऊल उचलले. तसे सीएजीचे कार्य वेगवेगळ्या समस्या हाताळत दीड वर्षापासून सुरुच होते. परिसरातील कचरा आणि उकिरड्यांची समस्या दूर करण्याचा निर्धार या टीमच्या सदस्यांनी केला. त्यानुसार सदस्यांनी स्वत:च झाडू, पावडे, घमेले घेऊन साफसफाईचे काम सुरू केले. मात्र ‘चमकोगिरी’ म्हणून काही नागरिकांनी नाक मुरडत कचरा टाकणे सुरुच ठेवले. त्यामुळे सीएजीच्या प्रयत्नांना हवे तसे यश मिळत नव्हते. त्यामुळे सदस्यांनी दोन महिन्यांपूर्वी कठोर पावले उचलणे सुरू केले.
स्वच्छता करण्यासाठी लोकांच्या डोक्यातून कचरा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी निष्काळजी नागरिकांना धडा देण्याची गरज आहे, हे ओळखून काम सुरू करण्यात आले. स्वच्छता केल्यानंतर सीएजीचे सदस्य त्या भागात देखरेख ठेवत. कुणी कचरा टाकताना दिसल्यास त्याला एकतर समजावले जाई आणि मानले नाही तर त्यांच्यावर मनपा प्रशासनाच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाई. अशा जवळपास १०० नागरिकांवर कारवाईसाठी सीएजीने पुढाकार घेतला. यापुढे जाऊन एक नवीनच मोहीम सुरू करण्यात आली. स्वच्छ केलेल्या उकिरड्यांवर कचरा आढळल्यास सीएजीच्या सदस्यांद्वारे तो निवडला जाई. कचरा निवडतात. यामध्ये कचरा फेकणाऱ्यांचा पत्ता किंवा खूण आढळल्यास तो कचरा परत फेकणाऱ्यांच्या घरी पोहोचवणे सुरू करण्यात आले.
अरेरावी केली की प्रत्यक्ष कचऱ्यातील पत्ता दाखवून त्यांची बोलती बंद केली जाई. अशा १२५ च्यावर लोकांच्या घरचा कचरा परत त्यांच्याच घरी टाकण्यात आला. यामुळे नागरिकांच्या मनात एक धास्ती निर्माण झाली आणि हळुहळू आसपाच्या नागरिकांनी उकिरडयावर कचरा टाकणेच बंद केले. परिसरातील १२ उकिरडे स्वच्छ झाले. मनपा प्रशासनालाही जे शक्य झाले नाही ते नागरिकांच्या प्रामाणिक प्रयत्नातून शक्य झाले.

दसऱ्याला कचरा दहन, दिवाळीला दीपप्रज्वलन
उकिरडे म्हणजे अस्वच्छतेचा रावण होय. त्यामुळे अभियान सुरू केल्यापासून सीएजीने दोन महिने लक्ष ठेवले होते. आधी स्वच्छता मोहीम राबवून या उकिरड्यांमधून १६ ट्रक कचरा बाहेर काढण्यात आला. एक महिन्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सदस्यांनी याच उकिरड्यांवर पुन्हा जमा झालेल्या कचऱ्याचे दहन केले. कचरा न टाकण्याची मानसिकता निर्माण केली. हे उकिरडे आता नामशेष झाल्याची खात्री झाल्यानंतर दिवाळीला याच जागांवर दीप उजळून दिवाळीचे स्वागत करण्यात आले.

सीएजीचे ६०० सदस्य


दीड वर्षांपूर्वी काही उपक्रमशील नागरिकांच्या पुढाकाराने हा ग्रुप तयार करण्यात आला. येथील सदस्यांनी हॉकर्स, पार्किंग आणि स्वच्छतेच्या समस्यांविरोधात एक अभियानच धरमपेठ परिसरात सुरू केले. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर परिसरातील नागरिकांना जोडण्यात आले. आज सीएजीच्या तीन ग्रुपवर ६०० च्यावर नागरिक सदस्य म्हणून जुळले आहेत. परिसरातील कुठलीही समस्या व्हॉट्सअ‍ॅपवर टाकली जाते व त्यावर सामूहिकरीतीने काम केले जाते. अगदी नागरिकांच्या वैयक्तिक समस्यांवरही मानवीयतेने मदत केली जाते. त्यामुळे एक नाते या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे विवेक रानडे यांनी सांगितले.

Web Title: In Nagpur, the light of cleanliness on garbage heap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.