नागपुरात सहायक मोटर वाहन निरीक्षक लाचेच्या सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 09:34 PM2018-04-24T21:34:12+5:302018-04-24T21:35:39+5:30

तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक (एआरटीओ) तसेच एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले.

Nagpur Assistant Motor Vehicle Inspector trapped | नागपुरात सहायक मोटर वाहन निरीक्षक लाचेच्या सापळ्यात

नागपुरात सहायक मोटर वाहन निरीक्षक लाचेच्या सापळ्यात

Next
ठळक मुद्देदोन हजाराची लाच भोवली : दलालही गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक (एआरटीओ) तसेच एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले. मिथून डोंगरे (वय ३८, एआरटीओ) आणि मुकेश रामटेके (वय ३६, दलाल), अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार झिंगाबाई टाकळीत राहतात. त्यांनी दुचाकीचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी सिव्हिल लाईनमधील आरटीओ कार्यालयात रीतसर अर्ज दिला होता. संबंधित कागदपत्रेही जोडली होती. लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी तक्रारदार प्रयत्नरत असताना त्यांना मुकेश रामटेके भेटला. तुम्हाला अर्जंट लर्निंग लायसन्स मिळवून देतो, त्यासाठी दोन हजार रुपयाची लाच द्यावी लागेल, असे रामटेके म्हणाला. ही लाच एआरटीओ मिथून डोंगरे यांच्यासाठी असल्याचेही मुकेश म्हणाला. तक्रारदारकर्त्यांनी मिथून डोंगरेची भेट घेतली असता त्यानेही दोन हजाराची लाच दिल्यास तात्काळ लायसन्स देतो, असे म्हटले. आवश्यक कागदपत्रे सादर केली असताना नाहक दोन हजार रुपये उकळू पाहणाºया या दोघांची तक्रार तक्रारदारांनी एसीबीकडे केली. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एसीबीच्या पोलीस निरीक्षक भावना धुमाळे, पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, पोलीस निरीक्षक गणेश कदम, हवालदार सुनील कळंबे, नायक रविकांत डहाट, सरोज बुधे, राजेश तिवारी यांनी सोमवारी दुपारी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार एआरटीओ डोंगरेकडे गेला. त्याने ही रक्कम रामटेकेला द्यायला सांगितली. रामटेकेने रक्कम स्वीकारताच साध्या वेशात बाजूलाच दबा धरून बसलेल्या डोंगरे आणि रामटेकेला एसीबीच्या पथकाने जेरबंद केले. या दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्यालयात भूकंप
सिव्हिल लाईनमधील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला आधी दलालाचाच सामना करावा लागतो. या दलालाला त्याने मागितल्याप्रमाणे रक्कम दिल्यास तात्काळ काम होते; अन्यथा छोट्या छोट्या त्रुटींवरून संबंधितांना हेलपाटे मारायला भाग पाडले जाते. दलालांशी अनेक अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने सहजपणे काम होते. आज एआरटीओसह दलालही पकडला गेल्याने कार्यालय परिसरात भूकंपासारखे वातावरण झाले. पाच मिनिटातच या कार्यालयातील बरेचसे दलाल पळून गेले.

Web Title: Nagpur Assistant Motor Vehicle Inspector trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.