नागपूर ग्रामीण भागातील फिरते आरोग्य पथक अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:48 PM2019-06-12T22:48:37+5:302019-06-12T22:50:31+5:30

शहरालगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे जि.प.चे फिरते आरोग्य पथक अचानक बंद करण्यात आले आहे. पथक बंद झाल्यामुळे गरोदर माता, बालके व महिलांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, जि.प. प्रशासनाने पथकात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कुठलेही अधिकृत पत्र वा सूचना न देताच कार्यमुक्त केले आहे.

Mobile Health Squad suddenly closed in Nagpur rural | नागपूर ग्रामीण भागातील फिरते आरोग्य पथक अचानक बंद

नागपूर ग्रामीण भागातील फिरते आरोग्य पथक अचानक बंद

Next
ठळक मुद्देगरोदर माता, बालकांच्या तपासणीवर परिणाम: अधिकृत पत्र न देताच डॉक्टरांना केले कार्यमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शहरालगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे जि.प.चे फिरते आरोग्य पथक अचानक बंद करण्यात आले आहे. पथक बंद झाल्यामुळे गरोदर माता, बालके व महिलांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, जि.प. प्रशासनाने पथकात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कुठलेही अधिकृत पत्र वा सूचना न देताच कार्यमुक्त केले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील स्थलांतरित मजुरांना व मजुरांच्या कुटुंबीयांना ‘आरसीएच’ सेवा व लसीकरण सेवा पुरविण्यासाठी एकात्मिक जिल्हा आरोग्य सोसायटी नागपूरकडून मोबाईल मेडिकल युनिट २०१२ रोजी स्थापन करण्यात आले. एका आरोग्य पथकात एक महिला वैद्यकीय अधिकारी व एक आरोग्यसेविका असते. हे पथक गावोगावी भेट देण्यासह गरोदर माता, बालकांच्या आरोग्याची तपासणी करते. जि.प.च्या आरोग्य विभागाकडून एक वाहन, औषधीसाठा व इतर साहित्य मिळते. २०१२ पासून ही आरोग्यसेवा निरंतर सुरू होती. पथकातील डॉक्टर मानधन तत्त्वावर कार्यरत असून, त्यांना दरवर्षी ११ महिन्यांचा करार करावा लागतो. मिहान, वाडी व नरसाळा हे मोठे क्षेत्र आहे. येथील अंगणवाड्यांंना फिरते पथक भेट देऊन त्या त्या गावातील गरोदर माता व बालकांची तपासणी करते. मात्र, २०१९-२० च्या कार्यक्रम कृती आराखड्यामध्ये ही योजना प्रस्तावित करण्यात येणार नसल्याने शासनाने ही योजना बंद करण्यात यावी, असे पत्र १९ जानेवारी २०१९ रोजी काढले. मार्च २०१९ मध्ये जि.प.च्या आरोग्य विभागाने ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर संबंधितांना पत्र पाठविले. परंतु, अधिकृत पत्र वा कोणतीही सूचना न देता आरोग्य पथक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पथकातील डॉक्टर व आरोग्यसेविकांचे समायोजन करण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्तांना २७ मार्च २०१९ रोजी पत्र लिहिले; मात्र अद्यापही डॉक्टर व परिचारिकांचे समायोजन झाले नाही.
वरिष्ठांच्या चुकीचा पथकातील डॉक्टरांना फटका
फिरते पथक सुरू झाले तेव्हापासून डॉक्टर व आरोग्यसेविका दर महिन्याला संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला व जिल्हा आरोग्य अधिकाºयांना कार्याचा अहवाल सादर करतात. हा अहवाल वरिष्ठ अधिकाºयांना शासनाकडे पाठवावा लागतो. मात्र, आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी १७ जानेवारी २०१९ रोजी ‘डीएचओं’ना पत्र पाठवून योजनेचा भौतिक व आर्थिक अहवाल वारंवार सूचित करूनही आपल्या कार्यालयाकडून पाठविण्यात येत नसल्याचा ठपका ठेवून योजना बंद करावी, असे निर्देश दिले आहे. यावरून चूक वरिष्ठांची फटका मात्र पथकातील डॉक्टरांना बसल्याचे सूत्रांनी सांगितले.
शासनस्तरावर पथक बंद केले
पथक सुरू ठेवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र शासनस्तरावरूनच पथक बंद करण्यात आले. पथकातील डॉक्टर व आरोग्यसेविकांचे आठवडाभरात समायोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.
डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Mobile Health Squad suddenly closed in Nagpur rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.