Mayo: The weight of 40 patients on a Nurse | मेयो :  एका परिचारिकेवर ४० रुग्णांचा भार
मेयो :  एका परिचारिकेवर ४० रुग्णांचा भार

ठळक मुद्देखाटा ८३३, परिचारिका ४७५ : कामाचा वाढला ताण

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मेयो प्रशासन ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’सारखे नवे विभाग निर्माण करीत आहे. खाटांची संख्या ५९० वरून ८३३ वर गेली आहे. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची पदे निर्माण करण्यात आली नाहीत. सध्या रुग्णालयात परिचारिकांची ४७५ पदे मंजूर आहेत. यातील साधारण ३० टक्के सुट्यांवर असल्याने एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे.
परिचारिका आरोग्य सेवेचा कणा आहे. विशेषत: रु ग्ण, रु ग्णांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांच्यातील परिचारिका हा एक मोठा दुवा आहे. रुग्णाला औषध देण्यासोबतच आपुलकीचे नाते परिचारिकेमुळे जुळते. रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालते. परंतु शासनाचे या परिचारिकांकडेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. मेयोमध्ये पूर्वी खाटांची संख्या ५९० व परिचारिकांची संख्या ४७५ एवढी होती. यामुळे रुग्णसेवेचा फारसा ताण नव्हता. परंतु गेल्या तीन वर्षांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या १५०० वरून अडीच ते तीन हजारावर गेली आहे. यातच एप्रिल २०१७ पासून ‘सर्जिकल्स कॉम्प्लेक्स’ रुग्णसेवेत रुजू झाले. मेयोच्या जुन्या ५९० खाटांमध्ये वाढीव २५० खाटांची भर पडली. अस्थिरोग, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया कक्षासोबतच वॉर्डही उपलब्ध करून देण्यात आले. वाढीव खाटांमुळे जमिनीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना खाट मिळाली. मात्र, जुन्या खाटांच्या तुलनेत मंजूर पदांमधील परिचारिकांची ७३ पदे, चतुर्थ कर्मचाऱयांची २०० पदे, फार्मसिस्टची सहा पदे , तंत्रज्ञची पाच पदे याशिवाय इतरही रिक्त पदांकडे दुर्लक्ष झाले. या जागा न भरताच नव्याने २५० नव्या खाटांचा भार पडल्याने सर्वांवरच कामाचा ताण पडला आहे. याची माहिती मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) दिली. नव्या खाटांना मंजुरी देऊन त्या दृष्टीने वाढीव पदांची मागणी केली. परंतु ‘डीएमईआर’कडून अद्यापही उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. कामाच्या ताणामुळे परिचारिकांचे सुट्यांवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना अटेंडंटसह अनेकवेळा परिचारीकेचेही काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. सध्या ३० ते ४० खाटांच्या वॉर्डात एक परिचारिका रुग्णसेवा देत आहे.


Web Title: Mayo: The weight of 40 patients on a Nurse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.