लोकमत सखी सन्मान अवॉर्ड; कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:06 AM2018-10-23T10:06:46+5:302018-10-23T10:10:35+5:30

आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांची विदर्भाच्या भूमीत कमतरता नाही. अशा प्रतिभावान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना लोकमत सखी सन्मान अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

Lokmat Sakhi Samman Award; Salute to the talent of women | लोकमत सखी सन्मान अवॉर्ड; कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वाला सलाम

लोकमत सखी सन्मान अवॉर्ड; कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वाला सलाम

googlenewsNext
ठळक मुद्देदेखण्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरणपुष्कर जोगने सखींशी साधला संवाद ‘झिंगाट’ नृत्याने उडविली धमाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्त्रीशक्तीचे कार्य, कर्तृत्व अतुलनीय आहे. स्वत:चे कुटुंब ते समाजकारणापासून राजकारणापर्यंत त्यांच्या कर्तृत्वाची महती सर्वमान्य आहे. समाजाच्या प्रवाहात चालताना स्वत:ची निश्चित दिशा ठरवून आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांची विदर्भाच्या भूमीत कमतरता नाही. अशा प्रतिभावान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना लोकमत सखी सन्मान अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. सोमवारी एका देखण्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
लक्ष्मीनगरस्थित हॉटेल अशोका येथे पार पडलेल्या या समारंभात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक, क्रीडा, कला व साहित्य तसेच शौर्य गाजविणाऱ्या प्रतिभावंत सखींना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, मराठी बिग बॉस फेम व अभिनेता पुष्कर जोग, महापौर नंदा जिचकार, जिल्हापरिषद अध्यक्षा निशा सावरकर, शहर पोलीस विभागाच्या डीसीपी (क्राईम) श्वेता खेडकर, वाघमारे मसालेचे संचालक प्रकाश वाघमारे, उमंग गीताई वूमन्स कॉलेजच्या संचालिका वैशाली फुले व लोकमतचे संपादक दिलीप तिखिले प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत सखी मंच व वाघमारे मसाले यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमंग गीताई कॉलेज व हॉटेल अशोका यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला. या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातून अर्ज मागविण्यात आले होते व या अर्जांमधून पुरस्कारांची निवड समितीकडून निवड करण्यात आली. त्यापैकी डॉ. रोहिणी पाटील व सविता देव-हरकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमतने कायमच पुढाकार घेतला आहे. लोकमत सखी मंचच्या माध्यमातून गेल्या १८ वर्षांपासून विविध उपक्रम राबवीत यातून महिलांमधील कलागुणांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध केले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंत आणि आरोग्य क्षेत्रापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत आपल्या प्रतिभेतून आकाश गाठणाऱ्या स्त्रीशक्तीला वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. हा सखी सन्मान सोहळा त्याचेच प्रतीक होय. सरीता राघोर्ते यांनी गणेशवंदना सादर केली. प्रास्ताविक सविता देव-हरकरे यांनी केले तर सूत्र संचालन नेहा जोशी यांनी केले. सोहळ्यात सखी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

...तेव्हाच साजरा करीन महिला दिन
सखी सन्मान सोहळ्याच्या वेळी अभिनेता पुष्कर जोग यांनी उपस्थित सखींशी संवाद साधला. मराठी बिग बॉसच्या घरातील प्रवासापासून चित्रपट क्षेत्र व वैयक्तिक आयुष्यावर त्याने गप्पा मारल्या. बिग बॉसच्या घरात महिलांना आदर मिळत नाही, अशी टीका केली. प्रत्येक पुरुषाने आपल्या आयुष्यात महिलांचा आदर बाळगायला हवा. हा आदर बाळगला जात नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. केवळ सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांचा सन्मान होणार नाही. या देशात ज्या दिवशी महिलांवर अत्याचार बंद होतील त्या दिवशी महिलांचा सन्मान झाला असे समजावे आणि त्याच दिवशी मी महिला दिन साजरा करीन, असेही त्याने आवर्जून सांगितले. मराठी बिग बॉसबाबत बोलताना तो म्हणाला, बिग बॉसचा प्रवास खूप खडतर होता. टीव्हीवर पाहताना प्रेक्षकांना याबाबत जाणीव होत नाही. मात्र बिग बॉसच्या घरात चार महिने घरापासून दूर राहावे लागते, जे अतिशय कठीण आहे. मात्र या घरात राहून माणूस म्हणून बदल झाला. भांडी घासले, स्वयंपाक शिकलो आणि आवरसावर करण्याची सवय लागली. संयम हा गुणही शिकलो. मात्र पुन्हा संधी आली तर कधीही जाणार नाही, असेही त्याने आवर्जून सांगितले. या घरात होणारे भांडण, रोमान्स पूर्वनियोजित नसतो. होय येथे वावरताना विरोधक असलेल्यांच्या भांडणात आगीत तेल टाकण्याचे काम मात्र बिग बॉस करीत असल्याचे त्याने येथे नमूद केले. यावेळी ‘झिंगाट...’ गाण्यावर सखींसोबत डान्स करीत त्याने धमाल उडवून दिली.

राजेश चिटणीस यांनी उडविले हास्याचे कारंजे
यावेळी प्रसिद्ध नकालाकार राजेश चिटणीस यांनी विनोदी नकला सादर करीत उपस्थितांना भरभरून हसविले. प्रेक्षकांमधूनच आजीबाईच्या वेशातील त्यांच्या प्रवेशाने धमाल उडविली. आजीच्या रूपातील संवादातून त्यांनी हास्याचे कारंजे उडविले. दुसऱ्या एन्ट्रीत महिलांच्या आवाजात कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली.

यांचा झाला सन्मान
प्रभाताई मुठाळ (चंद्रपूर) - जीवन गौरव पुरस्कार
वर्षा बाकरे-पाटील (अकोला) - कला व साहित्य
डॉ. मंजूषा प्रमोद गिरी (नागपूर) - वैद्यकीय क्षेत्र
अभिलाषा सोनटक्के (चंद्रपूर) - शौर्य पुरस्कार
नीरज जैन (नागपूर) - उद्योग व व्यवसाय
प्रज्ञा गिरडकर (उमरेड) - सामाजिक क्षेत्र
विजया मारोतकर (नागपूर) - शैक्षणिक क्षेत्र
मालविका बनसोड (नागपूर) - क्रीडा क्षेत्र

Web Title: Lokmat Sakhi Samman Award; Salute to the talent of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.