लोकमतने खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजवली; प्रल्हाद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:42 AM2018-02-07T11:42:51+5:302018-02-07T11:43:04+5:30

खेळाडू ते क्रीडा संघटक या माझ्या पाच दशकांहून अधिक काळाच्या वाटचालीत लोकमतचा मोठा वाटा आहे. अर्थात खेळाडू म्हणून पहिली थाप पडली ती नागपूर लोकमतची.

Lokmat literally sports culture in Nagpur; Prahlad Sawant | लोकमतने खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजवली; प्रल्हाद सावंत

लोकमतने खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजवली; प्रल्हाद सावंत

Next
ठळक मुद्देआॅलिंपिकसाठी खेळाडू घडविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
खेळाडू ते क्रीडा संघटक या माझ्या पाच दशकांहून अधिक काळाच्या वाटचालीत लोकमतचा मोठा वाटा आहे. अर्थात खेळाडू म्हणून पहिली थाप पडली ती नागपूर लोकमतची. त्यावेळच्या पुणे विभागीय संघातून नागपूरला आम्ही ‘शेरे पंजाब’ स्पर्धेसाठी गेले असताना विजयी झालो. बाबूजी दर्डा प्रमुख पाहुणे होते. त्यांनी आमचा लोकमतमध्ये छापलेला फोटो क्रीडा आयुष्यातील पहिला होता. साधारण सत्तरीचा काळ होता. वर्तमानपत्रात खेळाच्या चार ओळी येणे मुश्कील होते. त्या काळातील ही आठवण.
त्यानंतर लोकमतने खेळाला भरभरून साथ दिली. ती देताना स्पर्धा कोण भरवते? जिंकते कोणते गाव? त्याचा कधीच विचार केला नाही, अशी निर्भेळ पत्रकारिता आता तर अवघड आहे. लोकमतने खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजवली. मग ती क्रिकेटमध्ये असो किंवा मॅरेथॉन. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच नागपूरसारख्या शहरात १६ आंतरराष्ट्रीय महिला धावपटू निर्माण झाल्या, असे म्हटले तर गैर ठरू नये. नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सतत तीन वर्षे भरवली गेली. तिला दिलेली प्रसिद्धी कौतुकास्पद होती.
राष्ट्रकुल युवा क्रीडा बॅटन किंवा १९९४ सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची ज्योत असो लोकमत नागपूरने संपूर्ण विदर्भात एखाद्या झंझावातासारखा प्रचार व प्रसार केला होता. त्यामुळे गावोगावी स्वागतासाठी क्रीडारसिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आता महाराष्ट्रात औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा नवा उपक्रम लोकमत समूहाने हाती घेतला आहे. लाखो रुपयांची पारितोषिके, करंडक, टीशर्ट अशा खेळाडूंसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामधून आॅलिम्पिक वीर घडावे, अशी धारणा नाही. पण समाजात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी. तळागाळापर्यंत क्रीडाभावना जोपासली जावी. आजचा युवा वर्ग जो दूरचित्रवाणीला खिळून मैदानापासून दूर गेला आहे, तो पुन्हा मैदानावर परतावात्यांची अपेक्षा असावी. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने ग्रामीण भागातील आॅलिम्पिकवीर ललिता बाबर, कविता राऊत, आशियायी कुमार विजेती पूजा वऱ्हाडे, भाग्यश्री बिले, चारुलता नायगावकर आदी पुढे येऊन आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये चमकल्या. तशाच लोकमतच्या मॅरेथॉन स्पर्धेतून विदर्भातील १३ जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी खेळाडू पुढे याव्यात लोकमत नागपूरने त्यांना एक नवे क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्या क्रीडा व्यासपीठाच्या विदर्भातील युवकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आता सिंथेटीक ट्रॅकही नागपूरात उपलब्ध झाला आहे. अमरावतीसारख्या गावातून १९५५ च्या दरम्यान पुण्यात गेलेला युवक १९६४ सालच्या टोकिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय उच्चांक करून प्रतिनिधित्व करतो. ही गुणवत्ता विदर्भाच्या प्रगतीत आहे. तेव्हा युवकांनो लोकमत मॅरेथॉनची संधी घेऊन विदर्भातून भारताचे आॅलिम्पिक मॅरेथॉन वीर घडवू, हीच सर्वांनी शपथ घेऊ या.

Web Title: Lokmat literally sports culture in Nagpur; Prahlad Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.