लोकसभा नागपूर २००४; काँग्रेसची अनोखी ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:05 AM2019-03-28T11:05:48+5:302019-03-28T11:06:20+5:30

एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले.

Lok Sabha Nagpur 2004; Congress's unique 'hat-trick' | लोकसभा नागपूर २००४; काँग्रेसची अनोखी ‘हॅटट्रिक’

लोकसभा नागपूर २००४; काँग्रेसची अनोखी ‘हॅटट्रिक’

Next

 योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकीत देशाचे वातावरण बदलायला लागले होते. ‘शायनिंग इंडिया’चे वारे देशभरात वाहत होते. शिवाय १९९६ ते १९९९ या काळातील राजकीय अस्थिरतादेखील संपली होती. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज राजकीय धुरिणांकडून वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले. विलास मुत्तेमवार यांनी सलग तिसऱ्यांदा नागपुरातून विजय मिळविला. अशा प्रकारची ‘हॅटट्रीक’ करणारे ते पहिलेच उमेदवार ठरले.
१९९९ ते २००४ या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल भाजपाला प्रचंड विश्वास होता. देशात ‘इंडिया शायनिंग’ची मोहीम राबविण्यात आली होती. वाजपेयी सरकारने सात महिने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेचा कालावधी आॅक्टोबर २००४ पर्यंत असताना, मे महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. देशात ‘फील गुड फॅक्टर’चा फायदा घेण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले होते.
नागपुरात काँग्रेसने परत एकदा विलास मुत्तेमवार यांनाच उमेदवारी दिली. मात्र खरी गोची झाली होती ती भाजपाची. विलास मुत्तेमवार यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत अनेक दिवस बैठकांचा जोर चालला. अखेर भाजपाचे साधे सदस्यही नसलेले माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंह यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी हा संघभूमीत एक नवा प्रयोगच होता. तर नागपुरातून तीनदा खासदार राहिलेले तसेच काँग्रेस व भाजपावासी राहिलेल्या बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील विदर्भ राज्य पार्टीतर्फे आव्हान उभे केले. त्यामुळे नागपुरात तिरंगी लढत असल्याचे मानण्यात येत होते. याशिवाय बसपातर्फे जयंत दळवी, अपक्ष म्हणून प्रकाश निमजे हेदेखील उभे झाले होते. नागपूर लोकसभेच्या रणधुमाळीत एकूण १४ उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.
विलास मुत्तेमवार यांनी कार्गो हब, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिहान या मुद्यांवर प्रचार सुरू केला होता. विलास मुत्तेमवार यांना नेमकी यंत्रणा, जातीय समीकरणे यांची चांगलीच जाण होती. तर अटलबहादूर सिंह यांची प्रामाणिक छबी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचे काम या मुद्यांवर भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात उतरले. अटलबहादूर सिंह हे तीन दशकांपासून नागपूरच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे नाव सर्वांनाच परिचित होते. त्यांची हयात ही धर्मनिरपेक्ष संघटनांसाठी काम करण्यात गेली होती. मात्र ते मूळचे भाजप व संघाचे नसल्यामुळे पक्षातील ‘कमिटेड’ मतांची नाराजी कुठेतरी भोवेल का असा प्रश्नदेखील उपस्थित होत होता. एकेकाळी महानगरपालिकेत ‘किंगमेकर’ राहिलेले अटलबहादूर आता स्वत:च ‘किंग’ बनण्यासाठी सरसावले होते. बनवारीलाल पुरोहित यांनी विदर्भ हाच प्रचाराचा मुद्दा बनविला होता व विदर्भवादी त्यांच्या पाठीशी होते.
लोकसभेचे निकाल जाहीर झाले तेव्हा विदर्भात सगळीकडे युतीचा झेंडा होता. मात्र नागपुरात परत एकदा भाजपा-शिवसेनेला अपयशाचा सामना करावा लागला. ४७.१६ टक्के मतांसह मुत्तेमवार यांनी परत एकदा विजय मिळविला. अटलबहादूर सिंह यांच्या वाट्याला ३४.६१ टक्के मतं आली. मुत्तेमवार यांचे मताधिक्य हे सुमारे एक लाखाचे होते. बनवारीलाल पुरोहित हे ३.५२ टक्के मतांसह थेट पाचव्या स्थानावर घसरले.

‘अटल’साठी ‘अटल’जींची सभा
१६ मार्च २००४ रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वाजपेयी यांची कस्तूरचंद पार्कवर झालेली सभा ‘हाऊसफुल्ल’ ठरली होती. यावेळी त्यांनी अमेरिकेसह कुणासमोरही झुकणार नाही, असे म्हणत ‘न दैन्यम्, न पलायनम्’ या शब्दांत आपली भूमिका मांडली होती. अर्जुनासारखा मी मैदानात कायम राहील, कुणाच्या दबावाखाली येणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, असे म्हणत ‘पोखरण’ येथे केलेल्या अणूचाचण्यांवर भाष्य केले होते. या सभेत भाषण संपवून बसण्याअगोदर वाजपेयी यांनी अटलबहादूर सिंग यांना हात धरून समोर आणले. ‘मी समजत होतो केवळ अटल असणेच पुरेसे असते. पण येथे अटल बहादूर झाले आणि वरून सिंह’, अशी शाब्दिक कोटी करताच मैदानात खसखस पिकली होती. याच सभेत मी कधीही इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’ म्हटले नाही, अशी त्यांनी स्पष्टोक्ती केली होती.

Web Title: Lok Sabha Nagpur 2004; Congress's unique 'hat-trick'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.