Lessons taught by the woman to goon | मागे लागलेल्या गुंडाला महिलेने शिकविला धडा
मागे लागलेल्या गुंडाला महिलेने शिकविला धडा

ठळक मुद्देभेटायला बोलवून केली बेदम धुलाई : बेलतरोडीत गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलेसोबत सलगी साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुंडाला त्याच्या मित्रासह पळवून नेऊन महिलेच्या साथीदारांना या दोघांची बेदम धुलाई केली. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास मनीषनगरात ही घटना घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्याचे नाव हिमांशू चंद्रकार (वय २३, रा. त्रिमूर्तीनगर) आहे तर त्याचा मित्र धीरज दयाशंकर बघेल (वय २१, रा. लोखंडेनगर) जुजबी जखमी झाला.
कुख्यात गुंड बादल शंभरकर याची गेल्या वर्षी हत्या झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादलसोबत अपूर्वा नागपूरकर (वय २४, रा. जयताळा) ही पत्नी म्हणून राहत होती. त्यावेळी हिमांशू चंद्रकार हा देखील बादलसोबत अनेक गुन्ह्यात सहभागी होता. बादलची हत्या झाल्यानंतर हिमांशू याने अपूर्वाशी सलगी साधण्याचे आटोकाट प्रयत्न चालविले. ती त्याला दाद देत नव्हती. काही दिवसांपूर्वी हिमांशू चंद्रकारला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करून कारागृहात डांबले. दोन दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आणि त्याने अपूर्वाला भेटण्याचा हट्ट धरला. तो ऐकत नसल्याचे पाहून अपूर्वाने त्याला गुरुवारी रात्री मनीषनगरातील ताजश्री शोरूमच्या मागच्या गल्लीत बोलविले. त्यानुसार हिमांशू चंद्रकार आणि धीरज बघेल तेथे पोहचले. तेथे अपूर्वा नागपूरकर आणि तिचा भाऊ उभा होता. हिमांशू धीरजला दुचाकीजवळ ठेवून अपूर्वाजवळ गेला. तो तिच्यासोबत २० ते २५ मिनिटे बोलत उभा राहिला. त्यानंतर अचानक अपूर्वाचे सहा साथीदार लाठ्या काठ्या घेऊन आले. त्यांनी हिमांशूला बेदम मारहाण केली. ते पाहून धीरज त्याला वाचविण्यासाठी गेला असता दोघांनी धीरजला पकडून ठेवले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी जमली असता आरोपींनी एका दुचाकीवर धीरजला तर दुसऱ्या दुचाकीवर हिमांशूला जबरदस्तीने बसविले आणि जयंतीनगरी-२ जवळच्या निरंजन नगरात नेले. तेथे त्यांनी हिमांशूला गंभीर दुखापत केली तर, धीरजला धमकी देऊन जखमी अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले. धीरजने कंट्रोल रुमच्या माध्यमातून बेलतरोडी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी हिमांशू चंद्रकारला मेडिकलमध्ये दाखल केले. धीरजच्या तक्रारीवरून हवलदार कृष्णा काळमेघ यांनी अपूर्वा व तिच्या साथीदारांविरुद्ध अपहरण तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी पोलिसांनी अपूर्वासह तिघांना ताब्यात घेतले.


Web Title: Lessons taught by the woman to goon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.