नागपुरात कळसूत्री बाहुल्यांनी रंगविल्या पौराणिक कथा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:48 PM2019-03-25T23:48:17+5:302019-03-25T23:49:14+5:30

कळसूत्री अर्थात कठपुतली (पपेट) हा तसा सर्वांसाठी कुतुहलाचा विषय. हाताच्या बोटांनी किंवा धाग्याने चालविलेला बाहुल्यांचा खेळ मजेशीर आणि तेवढाच गहनही आहे. असाच अनोखा पपेट शो सोमवारी नागपूरच्या रसिकांनी अनुभवला. राधा-कृष्णाच्या कथेसह इतर पारंपरिक पात्रांच्या आणि भुतांच्याही रोमांचक कथा या कळसूत्रीद्वारे कलावंतांनी रंगविल्या, ज्यातून या पारंपरिक कलेची विलक्षण अनुभूती रसिकांना मिळाली.

Legendary story painted by the puppets in Nagpur | नागपुरात कळसूत्री बाहुल्यांनी रंगविल्या पौराणिक कथा 

नागपुरात कळसूत्री बाहुल्यांनी रंगविल्या पौराणिक कथा 

Next
ठळक मुद्देरसिकांना पपेट शोची अनोखी मेजवानी : सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कळसूत्री अर्थात कठपुतली (पपेट) हा तसा सर्वांसाठी कुतुहलाचा विषय. हाताच्या बोटांनी किंवा धाग्याने चालविलेला बाहुल्यांचा खेळ मजेशीर आणि तेवढाच गहनही आहे. असाच अनोखा पपेट शो सोमवारी नागपूरच्या रसिकांनी अनुभवला. राधा-कृष्णाच्या कथेसह इतर पारंपरिक पात्रांच्या आणि भुतांच्याही रोमांचक कथा या कळसूत्रीद्वारे कलावंतांनी रंगविल्या, ज्यातून या पारंपरिक कलेची विलक्षण अनुभूती रसिकांना मिळाली.
युनेस्कोद्वारे घोषित जागतिक कळसूत्री दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात कळसूत्री शोचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालिका अल्का तेलंग, एससीझेडसीसीचे कार्यक्रम अधिकारी दीपक पाटील, शशांक दंडे, श्रीकांत देसाई प्रामुख्याने उपस्थित होते. कळसूत्रीकार मीना नाईक यांच्या प्रयत्नातून हा अनोखा कळसूत्री शो खास नागपूरकरांसाठी आयोजित करण्यात आला.
आधुनिक आक्रमणाने या पारंपरिक कळसूत्री खेळाला अवकळा आली असली तरी काही कलावंत आजही ती जिवंत ठेवून आहेत. त्यातील एक नाव म्हणजे पश्चिम बंगालच्या मिदनापूर भागातील पारंपरिक कळसूत्री कलावंत बसंत कुमार घोराई होत. भारतात पुरातन काळापासून वेगवेगळ्या प्रकारचे कळसूत्री खेळ प्रसिद्ध आहेत जे लोकांच्या मनोरंजनाचा भाग होते. त्यातील एक म्हणजे ग्लोव्हज (हातमोजे) कळसूत्री. यामध्ये कळसूत्री (पपेट्स) हाताच्या बोटांमध्ये फसविल्या जातात. या बहुतेक लाकडाच्या, कापडाच्या किंवा पेपर मॅशेचा वापर करून तयार केल्या जातात. या बोटात फसवून कलावंत त्यांचा खेळ दाखवितो. बंगाली किंवा हिंदी गीतांवर विविध पौराणिक कथा मांडत कळसूत्रीद्वारे प्रेक्षकांसमोर सादर केल्या जातात. मिदनापूर हा भाग या कळसूत्री खेळांसाठी आजही प्रसिद्ध आहे. बसंतकुमार घोराई यांनी लोकप्रिय असलेल्या ‘बेनी पुतुल’च्या माध्यमातून राधा-कृष्णाची पारंपरिक कथा गुंफत कळसूत्रीचा खेळ सादर केला. महाराष्ट्रीय महालक्ष्म्याप्रमाणे त्यांच्या बाहुल्या पारंपरिक पद्धतीने दागदागिने घालून सजवलेल्या होत्या आणि घोराई त्या बाहुल्या बोटांच्या सहायाने खेळवत होते. प्रेक्षकांनाही त्यांची कला विस्मयित करून गेली. यादरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, ज्यात घोराई यांनी बेनी पुतुल कळसूत्रींच्या निर्मिती, रचना व सादरीकरणाविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे पपेटद्वारे सादर झालेली गणेश वंदना. गणपतीच्या तीन फुटाच्या पपेट्सच्या खेळातून ही गणेशवंदना कलावंतांनी सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. कळसूत्रीवरील ही सुरुवात खरोखरच प्रेक्षकांसाठी विलक्षण अनुभूती देणारी ठरली. बहुतेकांना भुतांची भीती वाटत असली तरी या कथा ऐकण्याची उत्सुकता प्रत्येकांमध्ये असते. कळसूत्री कलावंत रिंटी सेनगुप्ता यांनी या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातून भुतांच्या कथा सादर करीत उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मोठ्या संख्येने उपस्थित बालगोपाल आणि कलारसिकांनी या पारंपरिक कळसूत्री कलेचा आनंद घेतला.

Web Title: Legendary story painted by the puppets in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.